Usha Mehta’s role in Quit India Movement ‘ऐ वतन मेरे वतन’ हा चित्रपट गुरुवारी (२१ मार्च) ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट उषा मेहता यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित आहे. उषा मेहता कोण होत्या? स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका काय होती? त्यांनी गुप्त पद्धतीने रेडिओ का चालवला? याबद्दल जाणून घेऊ.

भारत छोडो आंदोलन : ‘करो या मरो’

८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘करो या मरो’ ही घोषणा देत महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. आम्ही एक तर भारताला मुक्त करू किंवा मरू”, असे महात्मा गांधी यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावरील त्यांच्या भाषणात म्हटले होते. भारत छोडो आंदोलन म्हणजे वसाहतवादी राजवटीविरुद्धचा मोठा उठाव होता; ज्यामुळे ब्रिटिशांच्या सत्तेला सुरुंग लागला होता. त्यावेळी ब्रिटिश राजवट संपविण्यासाठी सार्वजनिक निदर्शने, तोडफोड झाली.

Swatantrya Veer Savarkar OTT release
थिएटर्सनंतर आता घरबसल्या पाहता येणार ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
thane advait nadavdekar marathi news, advait nadavdekar painting marathi news
ठाणेकर अद्वैत नादावडेकरच्या कुंचल्यातून साकारली पंतप्रधानांची भेट, तैलचित्र ठरले लक्षवेधी
Rashmika Mandanna on atal setu
रश्मिका मंदानानं अटल सेतूचं कौतुक करताच काँग्रेसची खोचक पोस्ट; ‘गुड जॉब’ म्हणत दिली सविस्तर आकडेवारी!
Manthan Screening at Cannes 2024
प्रदर्शनानंतर ५० वर्षांनी ‘मंथन’चं Cannes मध्ये खास स्क्रीनिंग, ५ लाख शेतकऱ्यांच्या मदतीने तयार झालेला चित्रपट!
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Arun Govil Hema Malini BJP Rajput anger Uttar Pradesh
हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?

दुसऱ्या महायुद्धामुळे आधीच ब्रिटिश राजवटीला सुरुंग लागला होता. ब्रिटिशांनी हजारो आंदोलकांना अटक केली. गांधी, जवाहरलाल नेहरू व वल्लभभाई पटेल यांच्यासह काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना ९ ऑगस्टपर्यंत तुरुंगात टाकण्यात आले होते आणि पक्षावर बंदी घालण्यात आली होती. भारत छोडो आंदोलनात अनेक तरुण चेहरे पुढे आले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.

स्वातंत्र्यलढ्यात रेडिओची ताकद

भारत छोडो आंदोलन सुरू झाले तेव्हा उषा मेहता या केवळ २२ वर्षांच्या होत्या. मुंबईमध्ये त्या कायद्याचे शिक्षण पूर्ण करीत होत्या. त्या महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाल्या होत्या. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. इतर समवयस्कांप्रमाणे त्यांनीही भारत छोडो आंदोलनात स्वतःला समर्पित करण्यासाठी शिक्षण सोडले. “आम्ही (भारत छोडो) चळवळीकडे आकर्षित झालो होतो”, असे मेहता यांनी उषा ठक्कर यांना सांगितले होते. (ठक्कर यांचे पुस्तक काँग्रेस रेडिओ : उषा मेहता अॅण्ड द अंडरग्राउंड रेडिओ स्टेशन ऑफ १९४२, २०२१ पुस्तकात लिहिले आहे)

पण, मेहता यांना सार्वजनिक निदर्शनांमध्ये सहभागी व्हायचे नव्हते. त्यांच्या लक्षात आले की, आपण इतर मार्गानेदेखील या आंदोलनात आपले योगदान देऊ शकतो. मेहता यांनी ठक्कर यांना सांगितले, “इतर देशांच्या इतिहासाचाही माझा अभ्यास होता. त्या आधारावर मी सुचवले की, आपण स्वतःचे एक रेडिओ स्टेशन सुरू करू शकतो. जेव्हा प्रेसवर आणि बातम्यांवर बंदी घातली जाते, तेव्हा ट्रान्स्मीटरच्या मदतीने घडत असलेल्या घटनांची माहिती दिली जाऊ शकते आणि लोकांना जागरूक केले जाऊ शकते.”

१९३० मध्ये ब्रिटिशांनी सर्व रेडिओ परवाने निलंबित केले होते. त्यांच्याविरोधात गेल्यास किंवा नियमांचे पालन न केल्यास कठोर शिक्षा दिली जाईल याची जाणीव मेहता यांना होती. त्यामुळेच रेडिओ स्टेशन उभारणे अत्यंत जोखमीचे काम होते.

काँग्रेस रेडिओची सुरुवात

काँग्रेस रेडिओ सुरू करण्यासाठी निधी मिळविणे हे त्यांचे पहिले कार्य होते. तांत्रिक गोष्टींचे ज्ञान आणि उपकरणे मिळविणे हेही त्यांच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान होते. भारतात रेडिओ प्रक्षेपणाची माहिती असणारे आणि ही उपकरणे चालवू शकणारे लोक फार कमी होते. रेडिओ सुरू करण्यासाठी आणि तो चालविण्यासाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी उषा मेहता यांना साथ दिली. मेहता यांनी नानक मोटवानी, बाबूभाई खाकर, विठ्ठलभाई जव्हेरी व चंद्रकांत जव्हेरी यांचीही मदत घेतली. या कामासाठी लागणारे बरेच साहित्य त्यांच्याकडे उपलब्ध होते. त्यापैकी काही साहित्य त्यांनी उषा मेहता यांना देऊन यंत्रणा उभारण्यास मदत केली. उषा मेहतांनी मुंबईतील अनेक ठिकाणांहून हे केंद्र चालविले.

नरिमन प्रिंटरनेही मेहता यांना मदत केली. अनेकांनी त्यांच्यावर संशय घेतला; परंतु प्रिंटरचा राष्ट्रीय चळवळ किंवा काँग्रेसशी कोणताही वैचारिक संबंध नव्हता. त्याने मेहता यांना केवळ आर्थिक कारणांसाठी मदत केली होती. प्रिंटरच्या मदतीने ऑगस्टच्या अखेरीस चौपाटीच्या सी व्ह्यू अपार्टमेंटमध्ये रेडिओ ट्रान्स्मीटर सुरू झाले. आपल्या पहिल्याच प्रसारणापासून काँग्रेस रेडिओ प्रसिद्ध झाला. काँग्रेस रेडिओ भारतीयांसाठी बातम्यांचा सर्वांत आवडता स्रोत ठरला.

मेहता यांनी ठक्करला सांगितले, “चटगाव बॉम्बहल्ला, जमशेदपूर हल्ला व बलियामधील घडामोडी यांच्या बातम्या सर्वप्रथम आम्ही दिल्या. आष्टी आणि चिमूर येथील अत्याचाराचे वर्णन आम्ही प्रसारित केले. त्या काळी वृत्तपत्रांनी या विषयांना हात लावण्याचे धाडस केले नाही. या सर्व बातम्या केवळ काँग्रेस रेडिओद्वारेच भारतीयांपर्यंत पोहोचू शकत होत्या.” त्यात बातम्यांच्या पलीकडे विद्यार्थी, कामगार व शेतकरी अशा वर्गांना थेट संबोधित करणारी राजकीय भाषणेदेखील प्रसारित केली गेली. त्यात रेडिओ प्रसारण इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांत केले गेले. ठक्कर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले, “… काँग्रेस रेडिओच्या प्रसारणामुळे लोकांचा स्वातंत्र्य मिळवण्याचा संकल्प दृढ राहिला.”

९ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी रेडिओवर एक घोषणा केली; ज्यात म्हटले, “लक्षात ठेवा, काँग्रेस रेडिओ मनोरंजनासाठी नाही, प्रचारासाठीदेखील नाही, तर भारतीय लोकांना स्वातंत्र्यलढ्यात प्रेरित करण्यासाठी चालतो.”

साहसाचे प्रदर्शन

आपली ओळख लपविण्यासाठी काँग्रेस रेडिओ टीम दर काही दिवसांनी प्रसाराची ठिकाणे बदलत असे. चौपाटीवरील सी व्ह्यूपासून ते लॅबर्नम रोडवरील अजित व्हिला, सँडहर्स्ट रोडवरील लक्ष्मी भवन, गिरगावातील पारेख वाडी इमारत व महालक्ष्मी मंदिराजवळील पॅराडाईज बंगला यांसारखी अनेक ठिकाणे त्यांनी बदलली.

परंतु, अधिकाऱ्यांना सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच भूमिगत रेडिओ स्टेशनची माहिती मिळाली होती. १२ नोव्हेंबरला प्रिंटरला अटक केल्याने रेडिओ स्टेशनचे ठिकाण उघड झाले. या ठिकाणावर पोलिस अधिकार्‍यांनी धाड टाकली. हा प्रसंग सांगताना मेहता म्हणाल्या, “पोलिसांनी दरवाजावर धडक दिली आणि ते आत आले. त्यांनी ताबडतोब सर्व कार्यक्रम थांबवण्याचे आदेश दिले.” त्यावेळी उषा मेहतांनी सर्व धैर्य एकवटून राष्ट्रगीत वाजविण्याचा निर्णय घेतला आणि ते राष्ट्रगीत होते, ‘वन्दे मातरम्.’ त्यांनी पोलिस अधिकार्‍याला सांगितले की, रेकॉर्ड थांबणार नाही. हे आपले राष्ट्रीय गीत आहे. सर्व अधिकारी स्तब्ध अवस्थेत उभे राहिले. ‘वन्दे मातरम्’ संपल्यावर उषा मेहता यांना अटक झाली. या प्रसंगातून मेहता यांच्या साहसी वृत्तीचे दर्शन झाले.

हेही वाचा : आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी आणि २४० तुकडे; जाणून घ्या महान वैज्ञानिकाच्या मृत्यूनंतरचे गूढ

काँग्रेस रेडिओ प्रकरणात मेहता यांच्यासह बाबूभाई खाकर, विठ्ठलभाई जव्हेरी, चंद्रकांत जव्हेरी व नानक मोटवानी यांना अटक झाली. विठ्ठलभाई आणि मोटवानी यांची निर्दोष मुक्तता झाली; तर मेहता आणि बाबूभाई यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. मार्च १९४६ मध्ये उषा मेहता यांची पुण्याच्या येरवडा तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची ‘रेडिओ-बेन’ म्हणून प्रशंसा झाली. केंद्र सरकारने १९९८ मध्ये त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ प्रदान केला. २००० मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.