Afghanistan Earthquake News Today : पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व अफगाणिस्तानमध्ये रविवारी (३१ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत ८०० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू नांगरहार प्रांतातील जलालाबादपासून २७ किलोमीटर उत्तर-पूर्वेला होता आणि त्याच्या गाभ्याची खोली केवळ आठ किलोमीटर होती, अशी माहिती तालिबान प्रशासनाने दिली. याआधीही २०२२ आणि २०२३ मध्ये अफगाणिस्तानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपांमध्ये हजारो लोकांना आपले प्राण गमावावे लागले होते. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये वारंवार विनाशकारी भूकंप का होतात? त्यामागची नेमकी कारणं कोणती? त्याबाबत जाणून घेऊ…

अफगाणिस्तान या देशाचं क्षेत्र भूकंपप्रवण मानलं जातं. यापूर्वीही तिथे अनेकदा मोठमोठे भूकंप झाले आहेत. जून २०२३ मध्ये अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात सलग तीन मोठे भूकंप आले होते. या भूकंपात जवळपास १,३०० लोकांचा मृत्यू आणि सुमारे १,७०० जण जखमी झाले होते. त्याआधी २०२२ मध्ये आलेल्या ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपात आग्नेय भागात किमान २,००० हून लोकांना आपले प्राण गमावावे लागले होते. रविवारी मध्यरात्री झालेल्या भूकंपामुळे अफगाणिस्तानातील हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या प्रशासनाकडून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू आहे.

भूकंप नेमका का आणि कोणत्या कारणांमुळे होतो?

भूकंप म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील हालचालींमुळे जमिनीला बसणारे तीव्र हादरे. परिणामी जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यांसारख्या घडना घडतात आणि यालाच भूकंप, असे म्हणतात. ही आपत्ती नेमकी का उदभवते हे जाणून घेण्यासाठी पृथ्वीची रचना समजून घेणे आवश्यक आहे. भूगर्भशास्त्रानुसार- पृथ्वी १२ टेक्टोनिक प्लेट्सवर (खडक) वसलेली आहे. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत असतात. कधी कधी प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा त्यांची टक्कर होते. या घर्षणामुळे तयार होणारी ऊर्जा जमिनीच्या वर आल्यामुळे भूकंपाचे धक्के बसतात.

आणखी वाचा : इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला अबू ओबैदा कोण होता? तो हमासचा चेहरा कसा झाला?

भूकंपाचा केंद्रबिंदू कसा ठरवला जातो?

भूकंपाचे धक्के बसल्यावर तो जेथे सुरू झाला आहे, त्या ठिकाणाला भूकंपाचा केंद्रबिंदू, असं म्हटलं जातं. या केंद्रबिंदूच्या आसपासच्या परिसरामध्ये त्याचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो. उदाहरणार्थ- एका शांत तळ्यामध्ये दगड टाकल्यानंतर काही लहरी निर्माण होतात. जसजशा या लहरी दूरवर पसरत जातात, तसतशी अंतरानुसार पुढे पुढे त्यांची तीव्रता कमी होत जाते. त्याचप्रमाणे भूकंपाच्या केंद्रबिंदूकडून भूकंपाचे धक्के जमिनीच्या पृष्ठभागावर काही अंतरापर्यंत पसरत जातात. भूकंपाची चाहूल सर्वांत आधी- प्राणी तसेच पक्ष्यांना लागते, असं मानलं जातं. खडकांच्या घर्षणामुळे तयार झालेली ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्याआधीच त्या कंपनांचा अंदाज प्राण्यांना येऊ शकतो. कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी जमिनीवर झोपतात. त्यामुळे त्यांना आधीच हालचाल जाणवते, असाही समज आहे.

Afghanistan earthquake news today
रविवारी झालेल्या भूकंपानंतर अफगाणिस्तानमधील घरांची अशी परिस्थिती झाली होती (छायाचित्र रॉयटर्स)

भूकंपाची तीव्रता आणि खोली का महत्त्वाची असते?

भूकंपाची खोली (Depth) हा त्याच्या धोकादायकपणाचा मोठा घटक मानला जातो. उथळ भूकंप हे साधारणपणे अधिक धोकादायक असतात. कारण- ते जमिनीच्या पृष्ठभागावर येताना जास्त ऊर्जा घेऊन येतात. त्याउलट जमिनीखाली अधिक खोलवर झालेले भूकंप जास्त अंतरापर्यंत पसरतात; पण प्रवासादरम्यान त्याची ऊर्जा कमी होते. साधारणपणे शून्य ते ७० किलोमीटर खोलीच्या भूकंपांना उथळ भूकंप मानले जाते. भूकंपाची तीव्रता हाही त्याच्या विध्वंसक क्षमतेचा एक महत्त्वाचा घटक आहे. अमेरिकेतील यूएसजीएस (USGS) च्या मते- भूकंपाच्या तीव्रतेत प्रत्येकी एका पूर्णांकानं वाढ झाली की, लहरींचा आकार १० पटींनी वाढतो; तर बाहेर पडलेल्या ऊर्जेमध्ये ३२ पटींनी वाढ होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्यावर निर्माण होणाऱ्या लाटा ४.० तीव्रतेच्या भूकंपापेक्षा १० पट मोठ्या असतात. त्याच्या ऊर्जेतला फरकही प्रचंड असतो. म्हणजेच ३२ पट जास्त ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळेच भूकंपाची खोली आणि त्याची तीव्रता, असे दोन्ही घटक मिळून, त्याभूकंपाचा किती विध्वंसक परिणाम होईल हे ठरवले जाते.

हेही वाचा : रशियाकडून तेल खरेदी केल्याने भारताला किती झाला फायदा? आकडेवारी काय सांगते?

अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप का होतात?

अफगाणिस्तान हा भूगर्भीय दृष्टीने अतिशय संवेदनशील भाग आहे. कारण- तिथे भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सची टक्कर होते. या प्लेट्स सतत एकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर भूगर्भीय हालचाली घडतात. “भारत दरवर्षी सुमारे ४५ मिमी वेगाने युरेशियाकडे सरकत असल्यामुळे हा प्रदेश पृथ्वीवरील सर्वाधिक भूकंपीय हालचाली असलेल्या भागांपैकी एक आहे. जगातील एकूण भूकंपीय ऊर्जेच्या सुमारे १५ टक्के ऊर्जा याच भागात मुक्त होते. त्यामुळे हा प्रदेश अतिशय उच्च भूकंपप्रवण धोकादायक स्वरूपाचा आहे आणि येथे नियमितपणे मोठे भूकंप होत असतात,” असं ब्रिटिश जिओलॉजिकल सर्व्हेचे भूकंपशास्त्रज्ञ ब्रायन बॅप्टी यांनी ‘सायन्स मीडिया सेंटर’ला सांगितलं. म्हणूनच अफगाणिस्तानला विध्वंसक भूकंपांचा इतिहास आहे, विशेषतः हिंदू कुश प्रदेशात. बॅप्टी यांच्या मते, १९०० पासून या भागात सातपेक्षा जास्त रिश्टर स्केलचे १२ भूकंप झाले आहेत. भारतीय आणि युरेशियन प्लेट्समधील टकरीमुळे हिमालयाची निर्मिती झाली आहे, हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे.