भारतीय हवाई दलात सहा दशकांहून अधिक काळ सेवा बजावलेले, अनेक युद्धे आणि लष्करी कारवायांमध्ये मोलाची भूमिका बजावलेले मिग – २१ हे लढाऊ विमान येत्या १९ सप्टेंबर रोजी समारंभपूर्वक निवृत्त करण्याचे नियोजित आहे. ‘दि इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, मिग – २१ बायसन प्रकारातील शेवटच्या दोन तुकड्या किंवा स्क्वाड्रन्सना चंडीगड तळावर मानवंदना देण्यात येईल. तत्कालीन सोव्हिएत युनियनकडून १९६३मध्ये या विमानांची पहिली तुकडी हवाई दलात दाखल झाली. यानंतर जवळपास ७०० मिग – २१ विमाने भारताला मिळाली. अखेरच्या कालखंडात मात्र वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ही विमाने उडत्या शवपेट्या किंवा ‘फ्लाइंग कॉफिन्स’ म्हणून बदनाम झाली. त्यांना बदलण्याची मागणी वारंवार होऊ लागली. मात्र अगदी अखेरपर्यंत म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईच्या वेळीदेखील या लढाऊ विमानांचा वापर झाला, यावरून त्यांचे महत्त्व लक्षात येते.
हवाई दलाचा कणा
सन १९६३मध्ये सोव्हिएत युनियनच्या मिकोयान गुरेविच कंपनीकडून त्या देशाच्या सरकारच्या पुढाकाराने भारताला दोन मिग – २१ लढाऊ विमाने मिळाली. मिकोयान आणि गुरेविच या नावातील आद्याक्षरांवरून विमानाचे MiG असे नामकरण झाले होते. सिंगल इंजिन आणि सिंगल सीटर प्रकारातील हे छोटे विमान सुरुवातीस इंटरसेप्टर फायटर म्हणजेच हवाई लढतीसाठी दाखल झाले. पुढे विमानाचे टप्प्याटप्प्याने अद्ययावतीकरण झाले आणि बहुद्देशीय जबाबदारीअंतर्गत बॉम्बर (ग्राउंड अॅटॅक) म्हणूनही ते वापरले जाऊ लागले. गेल्या ६२ वर्षांमध्ये भारताने ७००हून अधिक मिग विमाने खरेदी केली आणि वापरली आहेत. हलके आणि चपळ अशी या विमानाची ख्याती होती. भारतीय हवाई दलाच्या कुशल वैमानिकांनी या चापल्याला कौशल्याची जोड दिली आणि मिग – २१ विमानांनी अनेक लढायांमध्ये आपल्यापेक्षा अधिक बलाढ्य समजल्या जाणाऱ्या विमानांशी यशस्वी टक्कर घेतली. भारताने टाइप ७७, टाइप ९६, बीआयएस असे मिग – २१च्या विविध आवृत्त्या वापरल्या. सध्या मिग – २१ बायसन ही अत्याधुनिक आवृत्ती हवाई दलाच्या सेवेत आहे. अशी जवळपास ३१ विमाने किंवा दोन स्क्वाड्रन्स वापरात आहेत. लवकरच ती निवृत्त केली जातील. मिग – २१चा रशियानंतरचा सर्वांत मोठा वापरकर्ता भारतच ठरला.
अनेक लढायांमध्ये सहभाग
भारत-सोव्हिएत मैत्रीच्या काळामध्ये मिग – २१ विमानांचा भारताला मोठा आधार होता. सुखोई, मिराज, राफेल अशा विमानांवर पुढे भारताचे अवलंबित्व वाढले, पण या काळात मिग – २१ ची उपस्थिती कायम होती. जग्वार आणि मिग – २१ या विमानांवर भारताची भिस्त अनेक वर्षे होती. बांगलादेश युद्धामध्ये या विमानांची कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरली. १९९९मधील कारगिल कारवाईतही मिग – २१ विमानांनी ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये भाग घेतला होता. २०१९मध्ये बालाकोट हल्ल्यांपश्चात ताबारेषेवर भारत आणि पाकिस्तानी हवाई दलांदरम्यान चकमक उडाली. त्यावेळी भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांनी मिग – २१ विमानातून पाकिस्तानच्या अत्याधुनिक आणि अधिक शस्त्रसज्ज एफ – १६ विमानाचा वेध घेतला होता. १९६५मधील भारत – पाकिस्तान युद्ध आणि ऑपरेशन सिंदूर कारवाईत या विमानांचा सहभाग तुलनेने मर्यादित राहिला.
अपघातांची काळी किनार
हवाई दलाचा कणा म्हणून ओळखली गेलेली ही विमाने त्यांच्या आयुर्मानापेक्षा कितीतरी अधिक काळ वापरली गेली आणि याचा परिणाम त्यांच्या टिकाऊपणावर आणि सुरक्षिततेवर झाला. नवीन विमाने खरेदी करणे आणि देशांतर्गत विमानांची निर्मिती करणे या दोन्ही महत्त्वाच्या प्रक्रियांना वेळोवेळीच्या सरकारांनी अक्षम्य विलंब लावला हेही प्रदीर्घ आणि प्रलंबित मिग – २१ वापरामागील एक कारण ठरले. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या ६० वर्षांमध्ये ५००हून अधिक विमाने दुर्घटनाग्रस्त झाली. यात जवळपास १७० हून अधिक वैमानिकांना प्राण गमवावे लागले. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर देखभाल-दुरुस्तीमध्ये काही काळ विलंब झाला. त्यामुळे सदोष सुट्या भागांसह ही विमाने उडवली जात असल्याचा आरोप मध्यंतरी वारंवार झाला होता. अगदी अलीकडे म्हणजे मे २०२३मध्ये एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते.
मिग – २१ ची जागा कोण घेणार?
ही विमाने इतकी प्रदीर्घ काळ हवाई दलात राहिली याचे कारण गुणात्मकतेपेक्षा संख्यात्मकतेमध्ये दडले आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन शत्रूंशी प्रसंगी एकत्रितपणे लढावे लागल्यास लढाऊ विमानांच्या किमान ४२ तुकड्यांची हवाई दलास गरज आहे. प्रत्यक्षात गेली अनेक वर्षे भारताच्या ३० तुकड्याच कार्यरत आहेत. आता मिग – २१च्या दोन तुकड्या निवृत्त होतील, त्यामुळे आणखी कमी विमाने उपलब्ध असतील. या विमानांची जागा तेजस एमकेआय घेतील. पण ही विमाने पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने हवाई दलात दाखल होत आहेत. त्यामुळे दरम्यानच्या काळात तूट भरून काढण्यासाठी राफेलसारखी आणखी काही विमाने घ्यावीत, असा विचार पुढे येत आहे. मिग – २१ विमानांचा एकूण उड्डाणकाल लक्षात घेता, त्यांना झालेल्या अपघातांचे प्रमाण नगण्य असल्याचे मत अनेक आजी-माजी हवाई दल अधिकारी व्यक्त करतात. पण अखेरीस या विमानांना सन्मानाने निवृत्त करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, हे वास्तवही हवाई दलाने स्वीकारलेले दिसते.