इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) जागतिक क्रिकेटवरील प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून याचाच प्रत्यय आता इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ स्पर्धेतही येणार आहे. या स्पर्धेतील ‘ओव्हल इन्व्हिन्सिबल्स’ संघाची सह-मालकी मिळवलेल्या अंबानी समूहाने या संघाचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयपीएल’मधील विक्रमी पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स अर्थात ‘एमआय’ संघाचे मालक असलेल्या अंबानी मंडळींनी आपल्या इंग्लंडमधील संघाच्या नावापुढेही ‘एमआय’ जोडण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या निर्णयामागे नक्की कारण काय आणि ‘आयपीएल’ फ्रँचायझींची जगभरातील लीगवरील पकड क्रिकेटच्या प्रगतीसाठी पोषक आहे की घातक, याचा आढावा.
‘ओव्हल इन्व्हिन्सिबल्स’चे नामकरण…
‘ओव्हल इन्व्हिन्सिबल्स’ हा ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील सर्वांत यशस्वी संघ असून पुरुष आणि महिलांच्या लीगमध्ये त्यांनी प्रत्येकी दोन वेळा जेतेपद पटकावले आहे. अंबानींच्या ‘मुंबई इंडियन्स समूहा’ने यंदाच्या हंगामापूर्वी १२ कोटी ३० लाख पौंड इतक्या किमतीत ‘ओव्हल इन्व्हिन्सिबल्स’ संघाचा ४९ टक्के हिस्सा विकत घेतला. ‘मुंबई इंडियन्स समूह’ आणि सरे कौंटी क्लब यांच्यातील कराराला पुढील वर्षीपासून अधिकृतरीत्या सुरुवात होईल. तेव्हा या संघाचे ‘एमआय लंडन’ असे नामकरण करण्याचा अंबानी मंडळींचा विचार आहे. याबाबतचे वृत्त इंग्लंडमधील ‘द टेलिग्राफ’ वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नाव बदलण्यावरून मतभेद?
‘द टेलिग्राफ’मधील वृत्तानुसार, ‘ओव्हल इन्व्हिन्सिबल्स’ संघाचे नामकरण करण्यावरून ‘मुंबई इंडियन्स समूह’ आणि सरे कौंटी क्लब यांच्यात दुमत आहे. संघाची ‘रीब्रँडिंग’ करण्यास सरेची हरकत नसली, तरी नामकरण करताना आपल्या कौंटीचे नावही त्यात असायला हवे, अशी सरेची धारणा आहे. मात्र, ‘मुंबई इंडियन्स समूहा’च्या विविध लीगमधील संघांच्या नावापुढे ‘एमआय’ लावले जात असल्याने इंग्लंडमधील संघही याला अपवाद ठरू नये असे या समूहाला वाटते.
लंडन नावाने दोन संघ…
‘ओव्हल इन्व्हिन्सिबल्स’चे ‘एमआय लंडन’ असे नामकरण झाल्यास ‘द हंड्रेड’मध्ये लंडन नाव असलेले दोन संघ होतील. ‘लंडन स्पिरीट’ हा संघ आधीपासूनच या स्पर्धेत खेळत आहे. ‘लंडन स्पिरीट’ संघ ‘लॉर्ड्स’वर आपले सामने खेळतो आणि मिडलसेक्स, इसेक्स आणि नॉर्दम्प्टन या कौंटी संघांचे प्रतिनिधित्व करतो. ‘ओव्हल इन्व्हिन्सिबल्स’ संघ केनिंग्टन ओव्हलवर आपले घरचे सामने खेळतो आणि सरेसह केंट कौंटीचे प्रतिनिधित्व करतो.
‘मुंबई इंडियन्स समूहा’कडे अन्य कोणते संघ?
मुंबई इंडियन्स समूहाने विविध देशात आपले पाय रोवले आहेत. ‘मेजर लीग क्रिकेट’मधील (अमेरिका) एमआय न्यूयॉर्क, ‘एसए२०’मधील (दक्षिण आफ्रिका) एमआय केपटाऊन, ‘आयएलटी२०’मधील (संयुक्त अरब अमिराती) एमआय एमिरेट्स या संघांची मालकीही या समूहाकडे आहे. महिला प्रीमियर लीग अर्थात ‘डब्ल्यूपीएल’मधील मुंबई इंडियन्स संघाचेही तेच मालक आहेत.
‘आयपीएल’ फ्रँचायझींचा वाढता प्रभाव
‘आयपीएल’ने क्रिकेटविश्वातील सर्वांत लोकप्रिय आणि श्रीमंत ट्वेन्टी-२० लीग असा लौकिक मिळवला आहे. या स्पर्धेच्या यशानंतर विविध देशांत फ्रँचायझी लीग सुरू करण्यात आल्या. या लीगमध्येही आता ‘आयपीएल’ फ्रँचायझींचा प्रभाव वाढत चालला आहे. दक्षिण आफ्रिकेतील ‘एसए२०’ लीगमधील सर्वच संघ ‘आयपीएल’ फ्रँचायझींनी खरेदी केले असून त्यांची नावेही ‘आयपीएल’ संघांवरच आधारित आहेत. ‘आयपीएल’मधील कोलकाता नाइट रायडर्स (ट्रिनबागो नाइट रायडर्स), राजस्थान राॅयल्स (बार्बाडोस रॉयल्स) आणि पंजाब किंग्ज (सेंट लुसिया किंग्ज) या संघांनी वेस्ट इंडिजच्या कॅरेबियन प्रीमियर लीगमधील संघांची मालकी मिळवली आहे. संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका येथेही ‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या मालकीचे संघ खेळतात.
‘द हंड्रेड’ स्पर्धेवरही पकड?
इंग्लंडमधील कौंटी संघ आपल्या परंपरेला धरूनच चालण्यासाठी ओळखले जातात. बाहेरील व्यक्ती किंवा संस्थेची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही. खासगीकरण नकोच, अशी त्यांची पूर्वी भूमिका असायची. मात्र, आता त्यांनाही ‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या आर्थिक ताकदीपुढे नमते घ्यावे लागले आहे. ‘आयपीएल’ फ्रँचायझींनी विविध काैंटी संघांसह करार करतानाच ‘द हंड्रेड’मधील संघांचीही मालकी मिळवली आहे. सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडने (सनरायजर्स हैदराबादचे मालक) ‘नॉर्दर्न सुपरचार्जर्स’ संघ विकत घेतला आहे. जीएमआर समूहाने (दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक) ‘सदर्न ब्रेव्ह’, तर ‘मुंबई इंडियन्स समूहा’ने ‘ओव्हल इन्व्हिन्सिबल्स’मधील ४९ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. आरपीएसजी समूहाकडे (लखनऊ सुपर जायंट्सचे मालक) मँचेस्टर ओरिजिनल्स संघाची ७० टक्के मालकी आहे.
वाढता प्रभाव पोषक की घातक?
‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या आर्थिक ताकदीचा फायदा विविध देशांतील लीगला झाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये अस्थिरतेचे वातावरण असताना त्यांना ‘आयपीएल’ फ्रँचायझींचाच आधार मिळाला. आता ‘आयपीएल’नंतरची दुसरी सर्वांत मोठी ट्वेन्टी-२० लीग म्हणून नावारूपास येण्यासाठी ते ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगशी स्पर्धा करत आहेत. ‘द हंड्रेड’ ही १०० चेंडूंची स्पर्धा इंग्लंडमध्ये लोकप्रिय असली, तरी अन्य देशांत तिचा फारसा प्रसार झालेला नाही. ‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या प्रभावामुळे हे चित्र बदलू शकेल. मात्र, ‘आयपीएल’ फ्रँचायझी विविध लीगमध्ये पोहोचण्याचे काही दुष्परिणामही आहेत. प्रत्येक देशाची क्रिकेट संस्कृती आणि तेथील चाहत्यांची आवडनिवड भिन्न असते. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणे हे ‘आयपीएल’ फ्रँचायझींसमोरील आव्हान असते. तसेच ते ‘आयपीएल’मधील आपल्या संघाचे नाव विविध लीगमधील संघांनाही देत असल्याने त्याचे वेगळेपण शिल्लक राहत नाही. तसेच तेथील चाहत्यांनाही त्या नावाची भुरळ पडण्यास वेळ लागतो. आता ‘ओव्हल इन्व्हिन्सिबल्स’चे ‘एमआय लंडन’ असे नामकरण करण्याचा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.