– अन्वय सावंत

भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी लाभली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर करंडकाची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. त्याच वेळी श्रीलंकेला पहिल्या कसोटीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताचा ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतरही भारताला न्यूझीलंडवर का अवलंबून राहावे लागले आणि श्रीलंकेची संधी का हुकली, याचा घेतलेला आढावा.

Thomas Cup Badminton Tournament Indian men team in quarterfinals
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा: भारतीय पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीत
Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी समीकरण काय होते?

भारताने गेल्या वर्षीच्या अखेरीस बांगलादेशमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्याच वेळी ऑस्ट्रेलियाने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका विजय साजरा केला होता. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर करंडक मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ ७५.५६ अशा गुण सरासरीसह ‘डब्ल्यूटीसी’च्या गुणतालिकेत अग्रस्थानी होता. दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाची गुण सरासरी ५८.९३ अशी होती. मात्र, गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांवर असूनही दोन्ही संघांचे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झाले नव्हते. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर मालिका अत्यंत महत्त्वाची होती.

मालिकेचा निकाल भारतासाठी महत्त्वाचा का ठरला?

‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या मालिकेतील एक सामना जिंकणेही पुरेसे ठरणार होते. तर भारताने ही मालिका ३-० किंवा ३-१ अशा फरकाने जिंकल्यास त्यांचे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित होते. भारताने मालिकेची दमदार सुरुवात करताना नागपूर आणि दिल्ली येथे झालेले पहिले दोन कसोटी सामने प्रत्येकी अडीच दिवसांतच जिंकले. मात्र, इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील विजयासह ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळवली. त्यानंतर अहमदाबाद येथे सपाट खेळपट्टीवर झालेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्याच वेळी न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेला यजमानांकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठता आली.

न्यूझीलंडची कशी मदत झाली?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीपूर्वी श्रीलंकेला ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्याची संधी होती. त्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना अनिर्णित राहणे किंवा भारताचा पराभव होणे, तसेच श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशा फरकाने जिंकणे गरजेचे होते. भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला, पण न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर दोन गडी राखून सनसनाटी विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे भारताचे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले.

न्यूझीलंड-श्रीलंका पहिला कसोटी सामना कसा रंगला?

न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचे आव्हान मिळाले होते आणि याचा पाठलाग करताना त्यांची चौथ्या दिवसअखेर १ बाद २८ अशी धावसंख्या होती. अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी आणखी २५७ धावांची आवश्यकता होती. पावसामुळे पहिल्या दोन सत्रांचा खेळ होऊ शकला नाही. मात्र, पाऊस थांबल्यानंतर अखेरचे सत्र खेळवण्याचा पंचांनी निर्णय घेतला. न्यूझीलंडने सुरुवातीला ठरावीक अंतराने गडी गमावले. मात्र, विल्यम्सन (नाबाद १२१) आणि डॅरेल मिचेल (८१) यांनी शतकी भागीदारी रचत न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. मग मिचेल बाद झाला. अखेरीस न्यूझीलंडला विजयासाठी एका चेंडूत एका धावेची गरज होती. या वेळी उसळी घेणारा चेंडू मारण्यात विल्यम्सन अपयशी ठरला आणि चेंडू यष्टिरक्षक डिकवेलाकडे गेला. मात्र, विल्यम्सन आणि निल वॅग्नर यांनी चोरटी धाव काढण्याचा निर्णय घेतला. डिकवेला चेंडू यष्टींवर मारण्यात चुकला, पण चेंडू गोलंदाजी करणाऱ्या फर्नांडोकडे गेला. फर्नांडोने मग नॉन-स्ट्राईकवरील यष्टींचा अचूक वेध घेतला. मात्र, विल्यम्सनने सूर मारला आणि चेंडू यष्टींना लागण्यापूर्वी तो क्रीजमध्ये पोहोचला. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय निश्चित झाला.

या निकालांनंतर गुणतालिकेतील स्थिती कशी झाली?

भारताने बॉर्डर-गावस्कर करंडकाची मालिका २-१ अशी जिंकली. या निकालानंतर ‘डब्ल्यूटीसी’च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया ६६.६७ गुण सरासरीसह अव्वल, तर भारत ५८.८ गुण सरासरीसह दुसऱ्या स्थानी राहिला. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्याने श्रीलंकेचे ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना जिंकला, तरी आता श्रीलंकेची गुण सरासरी ५३ इतकीच होऊ शकते.

हेही वाचा : विश्लेषण : तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव कशामुळे? जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या प्रवासात काय असतील अडथळे?

‘डब्ल्यूटीसी’चा अंतिम सामना कधी होणार?

यंदा ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांदरम्यान ७ ते ११ जून या कालावधीत इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होईल. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली होती. यंदा मात्र अधिक दर्जेदार कामगिरीचा भारताचा प्रयत्न असेल. तसेच ऑस्ट्रेलियन संघ पहिल्याच प्रयत्नात ‘डब्ल्यूटीसी’चे जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे. या सामन्याच्या अवघा एक आठवडा आधी आयपीएल समाप्त होत आहे. त्यामुळे दोन्ही संघांतील, विशेषतः भारतीय संघातील खेळाडू पुरेसे तंदुरुस्त असतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.