– पंकज भोसले

अमेरिकेची प्रसिद्ध चित्रनगरी लॉस एंजेलिस मे महिन्यापासून लेखकांनी पर्याप्त वेतन आणि भविष्यकालीन अर्थसुरक्षेसाठी पुकारलेल्या संपामुळे वाईट अर्थाने गाजत असताना आता तेथील चित्रपट आणि मालिकांच्या गिरण्या पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. लेखकांसह तारांकित कलाकार आणि १६ हजार अभिनेता-अभिनेत्रींनीही संपात उडी घेतली असून त्यामागे ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे पुढील काळात येऊ शकणारे रोजगार आव्हान हे तात्कालिक कारण आहे. पण या सगळ्याचा परिणाम येत्या काळात बड्या स्टुडिओजच्या सिनेमा आणि मालिका थांबण्यात होणार असल्याने अपेक्षित असलेले अनेक चित्रपट आणि मालिका अनिश्चित काळासाठी रखडणार आहेत.

नेमके काय झाले?

अमेरिकेमध्ये सध्या उन्हाळी सुट्टीला आरंभ झाला असून त्यामुळे ‘समर ब्लॉकबस्टर’ चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. पण वेतन तसेच स्टुडिओजवळील कामाचा परिसर आणि ‘आर्टिफिशिअल इण्टेलिजन्स’मुळे (चॅट जीपीटीसारख्या प्रमाली) भविष्यकाळात गोष्ट-चित्र (किंवा कण्टेण्ट) यांत कलांची, कलाकारांची कमी होणारी गरज यांमुळे गेल्या ११ आठवड्यांपासून लेखकांनी स्टुडिओजविरोधात संप पुकारला आहे. १९६० नंतर हाॅलीवूडमध्ये चित्रनिर्मितीत पहिल्यांदाच इतका मोठा अडथळा निर्माण झाला असताना आता कलाकारांनीदेखील याच कारणांसाठी संपात उडी घेतली आहे.

आता होणार काय?

‘रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका’च्या ताफ्यातील ११,५०० लेखकांनी संप पुकारला होता. आता ‘स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका’ संघटनेतील

अभिनेता-अभिनेत्री यांसह सहकलाकार अशा १६ हजारांची फौज संपात उतरली असून, शुक्रवारपासून ती कुठल्याही चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी होणार नाही. याशिवाय तयार झालेल्या चित्रपटांची प्रसिद्धी करणार नाही. त्यामुळे चित्रीकरण पूर्ण होऊन प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले सारे चित्रपट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले आहेत. या संपावरजोवर तोडगा निघत नाही, तोवर कलाकार स्टुडिओसाठी कोणतीही कामे करणार नाहीत. या कलाकारांत मेरिल स्ट्रीप, जेनिफर लाॅरेन्स, सिलियन मर्फी, मॅट डेमन, एमिली ब्लण्ट आणि कित्येक महत्त्वाची नावे आहेत.

नव्या संपामागचा मुद्दा काेणता?

कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सध्या कोणत्याही कलाकाराची प्रतिकृती उभी करता येणे शक्य झाले आहे. उदा. एखाद्या कलाकाराच्या ‘स्कॅन’ केलेल्या छबीद्वारे त्याच्याशी केवळ एका दिवसाचा करार करून अनंत काळापर्यंत त्याची प्रतिकृती तो उपस्थित नसताना स्टुडिओजना हवी तशी करता आणि वापरता येणे शक्य झाले आहे. यामुळे कलाकारांना नैसर्गिक अभिनयासाठी मिळणारा रोजगार एआय तंत्रज्ञानामुळे पुढील काळात हिरावून घेतला जाऊ शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर हा नियंत्रणात असावा, याची हमी ॲक्टर गिल्डकडून होत आहे. तसेच आमच्या भविष्यातील रोजगाराची हमी दिली जावी, अशीही मागणी केली जात आहे. चित्रपट आणि मालिकांच्या स्ट्रिमिंगसेवेमुळे होणाऱ्या नफ्यातही कलाकारांना वाटा हवा आहे.

स्टुडिओजचे कलाकारांच्या संपावरचे म्हणणे काय?

लेखक आणि कलाकारांच्या मागण्या या अवास्तव आणि पूर्ण करता येण्याजोग्या नाहीत, असे स्टुडिओजच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करून घेता येणे शक्य असताना तो टाळण्यास कलाकार सांगत आहेत. कलाकार आणि लेखक यांच्या सहभागाशिवाय निर्मिती अवघड असून सध्या सुरू असलेला संप आणि थांबलेले काम यांमुळे कुणाचेही भले होणार नाही, अशी भूमिका स्टुडिओ घेतली आहे.

सध्या संपाचा वाईट परिणाम कोणता?

लेखकांच्या संपामुळे गेल्या तीनेक महिन्यापासून अमेरिकी दूरचित्रवाणीवर रिॲलिटी शोज आणि वृत्तकार्यक्रम वगळता साऱ्या मनोरंजन कार्यक्रमाचे गणित बिघडलेले आहे. फेरप्रसारण आणि जुन्या कार्यक्रमांचे असलेले भागच तेथे पुन्हा पुन्हा दाखविले जात आहेत. निरनिराळ्या ओटीटी माध्यमांवर ‘बिंजवॉच’ सुरू असले तरी पारंपरिक लोकप्रिय शोज थांबले आहेत. येथील मनोरंजन निर्मितीचा व्यवहार पूर्णपणे थंडावला, तर अमेरिकी टीव्ही आणि मोठ्या पडद्यावर इतर देशीय चित्रनिर्मितीच झळकत राहील.

संपामुळे होऊ शकणारा दीर्घकालीन परिणाम कोणता?

कलाकारांनी प्रसिद्धी प्रवास, प्रसिद्धीसाठी उपस्थिती, मुलाखती, महोत्सव आणि कार्यक्रमांतील उपस्थिती, पॉडकास्टमधील सहभाग, समाज माध्यमांवरील प्रसिद्धी, स्टुडिओंच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. मुख्य कलाकारांनी गाणे, नृत्य, कलाबाज्या आणि कॅमेरासमोर येण्यासाठीही नकार दिला आहे. त्यामुळे सर्वार्थाने शुक्रवारपासून स्टुडिओजच्या सर्व कामे ठप्प होणार आहेत. एका बाजूने हॉलीवूडनिर्मितीच बंद झाल्यानंतर ‘ओटीटी‘ माध्यमांवरील मोठ्या कंपन्यांना आपला इतर खंडांतील मनोरंजन कण्टेण्ट हाॅलीवूड स्टुडिओजना विकण्यासाठी वातावरण तयार होईल. पण अमेरिकी चित्रपटगिरणीच्या निर्मितीपासून त्यांचे चाहते वंचित राहतील.

हेही वाचा : विश्लेषण : जगभर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘अवतार २’ला अमेरिकेत मात्र करावा लागतोय ‘बॉयकॉट’चा सामना; नेमकं कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपामुळे रखडलेले हॉलीवूडचे सिनेमे कोणते?

अवतार-३-४-५. पैकी अवतार तीन हा २०२५ पर्यंत पूर्ण होऊ शकेल, असा अंदाज होता. तो अनिश्चित काळ पुढे सरकलेला आहे. ॲव्हेंजर, बीटलज्युस-२, ब्लेड, डेडपूल-३, ग्लॅडिएटर-२, मिशन इम्पाॅसिबलचा पुढील भाग, माय एक्स-फ्रेण्ड वेडिंग, थंडरबोल्ट आदी सिनेमांचे भवितव्यही अंधकारमय आहे.