– भक्ती बिसुरे

करोना विषाणू मानवामध्ये कुठून आणि कसा आला, याबाबत संपूर्ण समाधानकारक उत्तर आजही कुणाकडे नाही. त्यामुळेच या विषाणूच्या उत्पत्तीचे सत्यशोधन गुंडाळण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय धक्कादायक ठरला. मात्र, अमेरिकेसारख्या चिवट आणि शक्तिशाली देशाने अद्याप हार मानलेली नसल्याचे आशादायी चित्र आहे.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

विषाणू उत्पत्तीचे सत्यशोधन कशासाठी?

कोणताही विषाणू करोना महासाथीसारखे संकट निर्माण करून संपूर्ण जग अमर्यादित कालावधीसाठी अक्षरश: ठप्प करतो, त्यावेळी त्या विषाणूचा उगम शोधणे हे विषाणूशास्त्राच्या अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. भविष्यातील संभाव्य महासाथी, विषाणू आणि त्यांचे प्रकार, उपप्रकार यांच्या उद्रेकांना तोंड देण्यासाठी प्राथमिक तयारी आणि माहितीचे संकलन (डॉक्युमेंटेशन) म्हणून मुळात विषाणूचे उगमस्थान माहिती असणे आवश्यक असते. त्या उद्देशानेच करोना उद्रेकाच्या अत्यंत प्राथमिक टप्प्याची माहिती असणे आवश्यक आहे.

चीनच्या वुहानमधील मांसविक्री बाजारातून करोनाचा विषाणू पसरला, अशी माहिती आतापर्यंत समोर आली असली तरी करोना विषाणू हा चिनी प्रयोगशाळांमधूनच बाहेर पडल्याचे संदर्भ सुरुवातीपासून पुढे आल्यामुळे त्याची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरते. त्याबरोबरच करोना साथीची सुरुवात झाल्यानंतर चीनचे वर्तन सातत्याने संशयास्पद आणि लपवाछपवीचे दिसते. माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सत्र चीनकडून अवलंबण्यात आले. त्यामुळेच विषाणू प्रयोगशाळेतून आला असण्याची शंका अधिकाधिक गडद होत गेली.

अमेरिकेची भूमिका काय?

महासत्ता अमेरिकेच्या वर्चस्वाला शहा देण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने सुरू आहे. करोना काळातही हे वारंवार दिसून आले. चीनच्या वुहान शहरातील मांसबाजारातील काही नागरिक एकाच प्रकारच्या लक्षणांमुळे आजारी पडले, त्यावेळी तातडीने तो बाजार बंद करण्याचा आणि औषध फवारणी करुन कोणताही पुरावा मागे न ठेवण्याचा खटाटोप चीनकडून करण्यात आला. त्यानंतर चीनवरील संशय अधिक गडद झाला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने विषाणूचा माग काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

शास्त्रज्ञांसह गुप्तहेरांच्या फौजाही या कामी जुंपण्यात आल्या. त्यांच्या संशोधन आणि तपासण्यांमधून – काहीसे संशयास्पद असले तरी विषाणूची गळती प्रयोगशाळेतून झाल्यामुळेच करोना महासाथ आल्याच्या चर्चा सध्या जागतिक वर्तुळात सुरू आहेत. अमेरिकेतील अनेक प्रसिद्ध वर्तमानपत्रे आणि नियतकालिके याबाबतच्या वृत्तमालिका प्रसिद्ध करत आहेत. गुप्तचर यंत्रणा याबाबतचे ठोस पुरावे समोर ठेवण्यास असमर्थ असल्या तरी विषाणू प्रयोगशाळेतून झालेल्या गळतीमुळेच महासाथ निर्माण करु शकला, याबाबत कोणतीही शंका नसल्याचे या यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जानेवारी २०२१ मध्ये सूत्रे स्वीकारली. त्यानंतर महासाथीची चौकशी करण्यासाठी त्यांनी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना ९० दिवसांची मुदत दिली. या चौकशी किंवा तपासाचे निष्कर्ष ऑगस्ट २०२१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. नैसर्गिक उत्पत्ती आणि प्रयोगशाळेतून गळती या दोन्हींबाबत शक्यता या यंत्रणांनी वर्तविली. त्यावेळी बायडेन यांनी चीनला पारदर्शकपणे सहकार्याचे आवाहन केले, मात्र त्याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसले नाही. असे असले तरी अमेरिकन ‘एफबीआय’ मात्र हा विषाणू प्रयोगशाळेतूनच गळती झाल्याचे आजही आत्मविश्वासाने सांगत असल्याचा पुनरुच्चार अमेरिकी माध्यमांकडून करण्यात येत आहे. करोना विषाणूच्या सत्यशोधनाबाबत अमेरिका अद्यापही आग्रही असल्याचे चित्र आहे.

निष्कर्षाप्रत पोहोचणे अवघड का?

करोना विषाणूच्या उत्पत्तीपासूनच चीनची भूमिका नेहमी संदिग्ध आणि असहकाराची राहिली, हे आता संपूर्ण जगाने जाणले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी चीनशी संपर्क साधून वुहान शहरातील सुरुवातीच्या टप्प्यातील करोना रुग्णांबाबत, प्रामुख्याने मानवामध्ये संसर्ग आढळलेल्या घटनांबाबत माहिती मागवली. मात्र, चीनने त्याला प्रतिसाद दिला किंवा नाही हे कधीही स्पष्टपणे समोर आले नाही. जागतिक आरोग्य संघटनेला सहकार्य करण्यातील चीनचा आडमुठेपणा स्पष्टपणे दिसल्याने इतर कोणत्याही एकट्या देशाला चीन सहकार्य करेल ही अपेक्षा बाळगणे अवास्तव आहे.

हेही वाचा : विश्लेषण : करोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली? आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती काय लागले?

प्रयोगशाळेतून झालेल्या अपघाती गळतीमुळे विषाणूचा उद्रेक झाल्याच्या सिद्धांताला पुष्टी देणारा कोणताही अभ्यास चीनकडून बाहेर आला नाही किंवा विषाणूची उत्पत्ती नेमकी कशी झाली, याबाबतचे संशोधनही चीनने कधी प्रकाशात येऊ दिलेले नाही. उलट चीनमधील शास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ यांनाही याबाबत कोणतेही भाष्य न करण्याचे एकप्रकारे आदेशच असल्याचे काही मोजक्या उदाहरणांवरून वेळोवेळी समोर आले. त्यामुळे करोना विषाणू संसर्ग, त्याचा उगम आदींबाबत ज्ञात माहिती मर्यादित आहे. उलट, चीनमधून विषाणूचा उद्रेक झाल्याचे वेळोवेळी नाकारण्यातच आले आहे.

या संपूर्ण साथकाळात चीनची भूमिका संदिग्ध, आडमुठेपणाची आणि असहकाराचीच राहिली. त्यामुळे विषाणू प्रयोगशाळेतून आला, वुहानमधील मांस बाजारांतून आला की इतर कुठून याबाबतच्या संशोधनाला निष्कर्षाप्रत येणे हे नेहमी अवघडच राहणार हे स्पष्ट आहे.