Donald Trump H 1B visa alternative अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसासाठी अर्जाची रक्कम ८८ लाखांपर्यंत वाढवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. हे शुल्क एकाच वेळी आकारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या निर्णयानंतर हजारो भारतीय आयटी व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वारे निर्माण झाले आहे. त्यानंतर अनेक जण अतिशय कमी प्रचलित असलेल्या L-1 व्हिसाचा पर्याय विचारात घेत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या आपले अधिकारी आणि कर्मचारी परदेशांतील कार्यालयांमधून अमेरिकेतील कार्यालयांमध्ये पाठविण्यासाठी L-1 व्हिसाचा वापर करतात. काय आहे हा व्हिसा? व्हिसाचे फायदे आणि तोटे काय? याचा आयटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार का? जाणून घेऊयात…

L-1 व्हिसा म्हणजे काय आणि अर्ज करण्यास पात्र कोण?

  • L-1 हा कंपनीतील अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या हस्तांतरासाठी असलेला ‘नॉन-इमिग्रंट वर्क व्हिसा’ आहे.
  • एखाद्या कर्मचाऱ्याने मागील तीन वर्षांत कमीत कमी एक वर्ष परदेशातील बहुराष्ट्रीय कंपनीची मूळ शाखा, उपकंपनी किंवा संलग्न कंपनीत कार्यकारी / व्यवस्थापकीय भूमिकेत (L-1A) किंवा विशेष ज्ञान असलेल्या भूमिकेत (L-1B) काम केलेले असावे.
  • पहिला L-1A, हा व्हिसा व्यवस्थापक किंवा उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांसाठी असतो. दुसरा L-1B व्हिसा हा विशेष ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असतो.
  • या व्हिसासाठीचा अर्ज केवळ कंपनीच दाखल करू शकते, व्यक्ती स्वतःहून अर्ज करू शकत नाहीत.
L-1 हा कंपनीतील अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या हस्तांतरासाठी असलेला ‘नॉन-इमिग्रंट वर्क व्हिसा’ आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

टेक्सासस्थित वकील चंद पर्वथनेनी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “हा व्हिसा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो, ज्यांना भारतीय शाखेतून अमेरिकेच्या शाखेत हस्तांतरित केले जाते. जर तुम्ही भारतात ‘X’ कंपनीसाठी एक वर्ष काम करीत असाल, तर तुम्हाला त्याच ‘X’ कंपनीच्या अमेरिकेतील शाखेत हस्तांतरित केले जाऊ शकते; पण तुम्ही ‘Y’ किंवा ‘Z’ कंपनीत जाऊ शकत नाही. हा या व्हिसाच्या अंतर्गत असणारा नियम आहे.”

दरवर्षी किती L-1 व्हिसा दिले जातात आणि किती नाकारले जातात?

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, करोना महामारीच्या काळात व्हिसा देण्याचे प्रमाण घटले होते; पण ते लगेच पूर्ववत झाले. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ७६,९८८ व्हिसा देण्यात आले, २०२१ मध्ये त्यांची संख्या २४,८६३ पर्यंत कमी झाली आणि नंतर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पुन्हा त्यांची संख्या ७६,६७१ पर्यंत वाढली. त्यात व्हिसा अर्ज नाकारण्याचे प्रमाण सुमारे १० टक्के होते, जे आता तीन ते चार टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. मात्र, पर्वथनेनी यांनी सावध करीत सांगितले की, “गैरवापराच्या शक्यतेमुळे L-1 व्हिसा नाकारण्याचे प्रमाण H-1B पेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतातील वाणिज्य दूतावासाकडून त्यांची खूप बारकाईने तपासणी केली जाते.”

L-1 व्हिसाचे फायदे आणि तोटे काय आहेत?

सर्वांत मोठा फायदा म्हणजे यात कोणतीही लॉटरी किंवा कोटा नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या वर्षभर अर्ज करू शकतात आणि मोठ्या कंपन्या प्रक्रियेला गती देण्यासाठी ‘ब्लँकेट पेटीशन’ वापरू शकतात. हे व्हिसाधारक त्यांची स्थिती धोक्यात येऊ न देता, ग्रीन कार्डासाठीही अर्ज करू शकतात आणि L-2 व्हिसावर असलेल्या जोडीदारांना अमेरिकेत आपोआप काम करण्याची परवानगी मिळते. हा व्हिसा फक्त अशा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यांनी त्याच कंपनीत परदेशात एक वर्ष काम केले आहे.

तसेच, L-1B आणि L-1A साठी या व्हिसांना अनुक्रमे पाच वर्षे आणि सात वर्षे, अशी निश्चित कालमर्यादा आहे. H-1B धारकांप्रमाणे L-1 कर्मचाऱ्यांना ग्रीन कार्डाची वाट पाहण्यासाठी व्हिसाची मुदत वाढवता येत नाही. ह्युस्टनस्थित वकील राहुल रेड्डी म्हणाले की, कंपन्या या गोष्टीचा विचार करतात. जर एखादी व्यक्ती L-1 साठी अधिक पात्र असेल, तर कंपन्या त्यांना L-1 वर आधीच आणतात. कारण- त्यात खर्च कमी असतो आणि ते कंपनीशी बांधील राहतात. पण, हे सोपे नाही. यात व्हिसा नाकारण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण- सरकारला त्यांच्यात खरोखर कौशल्य आहे का याबाबत खात्री करायची असते.”

L-1 ची तुलना H-1B शी कशी?

H-1B हा ‘विशेष व्यवसायासाठी’ (Specialty occupation) आहे, ज्यासाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे आणि यात दरवर्षी ८५,००० नवीन व्हिसांची मर्यादा आहे. कंपन्यांना ‘प्रचलित वेतन’ (Prevailing Wage) द्यावे लागते. त्याउलट L-1 ला कोणतीही मर्यादा किंवा प्रचलित वेतनाची अट नाही. कारण- हा व्हिसा केवळ कर्मचाऱ्यांच्या हस्तांतरासाठी आहे.

रेड्डी यांनी H-1B हे स्वस्त कामगार आहेत, या कल्पनेला नकार दिला. “जर मी एका अमेरिकन नागरिकाला कामावर ठेवलं, तर मी त्यांना तांत्रिकदृष्ट्या फक्त किमान वेतन म्हणजेच सुमारे २०,००० डॉलर्स देऊ शकतो. पण जर मी H-1B कर्मचाऱ्याला कामावर ठेवले, तर कामगार विभाग ‘प्रचलित वेतन’ ठरवतो. एका सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी ते सुमारे १,००,००० डॉलर्स असते आणि आम्ही त्यापेक्षा कमी देऊ शकत नाही. त्याशिवाय २,५०० ते १०,००० डॉलर्सपर्यंत अर्ज शुल्क आणि वकिलाचा खर्च असतो. त्यामुळे H-1B व्हिसाधारक कधीही स्वस्त कामगार नसतो. त्याउलट L-1 मध्ये कमी वेतनमर्यादा आहेत.”

L-1 खरोखरच H-1B ला पर्याय आहे का?

पर्वथनेनी म्हणाले, “H-1B मधील बदलांमुळे L-1 व्हिसाची संख्या अचानक वाढणार नाही. इन्फोसिस किंवा टीसीएससारख्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना H-1B व्हिसा न मिळाल्यास हा पर्याय आधीच वापरतात; मात्र प्रत्येकासाठी हा पर्याय नाही.” रेड्डी यांनीही सांगितले की, १,००,००० डॉलर्स शुल्क लागू होण्यापूर्वीही कंपन्या त्यांचे कर्मचारी पात्र असल्यास L-1 व्हिसाचा पर्याय निवडत होत्या. ही काही नवीन गोष्ट नाही.”

F-1 व्हिसावर असलेला विद्यार्थी L-1 साठी पात्र असेल का?

“अमेरिकेत F-1 व्हिसावर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी L-1 हा अजिबात पर्याय नाही. कारण- त्यांनी त्याच कंपनीत परदेशात एक वर्ष काम केलेलं नसतं. L-1 हा अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे, जे आधीच कंपनीच्या कामकाजाचा भाग आहेत,” असे पर्वथनेनी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

L-1 व्हिसाचा त्या व्हिसाधारकांच्या कुटुंबीयांना फायदा होतो का?

L-1 चा एक मोठा फायदा म्हणजे कुटुंबीय त्यांचे स्वतःचे करिअर घडवू शकतात. “या व्हिसाच्या अंतर्गत जोडीदार देशात तर येऊच शकतो, त्याबरोबरच त्यांना काम करण्याचीही परवानगी मिळते,” असे रेड्डी यांनी स्पष्ट केले. “जर मी माझ्या भारतातील कर्मचाऱ्यांपैकी एकाला L-1 वर अमेरिकेला घेऊन जात असेन, तर त्याचा जोडीदारही त्याच्याबरोबर येऊ शकतो आणि काम करू शकतो.” याउलट H-1B मध्ये H-4 व्हिसावर असलेल्या जोडीदारांवर निर्बंध असतात.

L-1 हा H-1B ला पूर्णपणे पर्याय नाही. L-1 व्हिसा विशेषतः बहुराष्ट्रीय हस्तांतरासाठी आहे आणि पात्र असलेल्यांसाठी मोठे फायद्याचे आहे; पण इतरांसाठी त्यावर कठोर मर्यादा आहेत. रेड्डी यांनी म्हटले, “हे खरोखरच कुशल लोक असतात, ज्यांना कंपन्या आपल्या देशात आणण्यासाठी खूप पैसे खर्च करतात.” पर्वथनेनी पुढे म्हणाले, “भारतातील मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा एक पर्याय असू शकतो; पण विद्यार्थी किंवा आधीच अमेरिकेत असलेल्या लोकांसाठी नाही. H-1B हाच मुख्य मार्ग आहे. त्यामुळे H-1B च्या नियमांमधील बदलांचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण- दोन्हीxचे मार्ग आणि आवश्यकता वेगवेगळ्या आहेत.”