इंग्रज येण्यापूर्वी लाहोरमध्ये गणिकांचे मंत्रमुग्ध करणारे जग होते असे चित्रण संजय लीला भन्साली यांनी त्यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सिरीजमध्ये केलं आहे. परंतु त्यांनी हीरामंडीचे जे काही चित्रण केले आहे, त्यात कल्पनाविस्तारच अधिक असल्याचे मत इतिहासकार याकूब खान बंगश यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. ते म्हणतात ही सिरीज पाहताना असे काही क्षण आहेत जेंव्हा मला वाटले काहीतरी खरे दाखवायला हवे होते. तवायफ ज्या महालात राहतात तो महाल शेजारच्या किल्ल्यातील किंग चेंबर्सपेक्षा मोठा आहे, उर्दू शब्दलेखन लखनऊ आणि अलाहाबादच्या वंशजांना लाजवेल इतके चपखल आहे आणि लाहोरमधील मुस्लिम नवाबांची संख्या पाहून इतके नवाब होते कुठे हे शोधण्याची इच्छा होते. नशीब असे की, लाहोरमधील स्थळांची नाव तरी खरी आहेत. ‘हीरामंडी,’ किंवा ‘हिरा मंडी’ असं गुगलवर सर्च केलं तर त्याचा या सिरीजमध्ये दाखवलेल्या स्त्रियांच्या सौंदर्याशी काहीही संबंध नसल्याचे उघड होते.

महाराजा रणजित सिंग (१८४३-४४) यांच्या हिरा सिंग डोगरा या मंत्र्याच्या नावावरून हीरामंडी हे नाव पडले हे सर्वश्रुत आहे. खरंतर हीरामंडी हे ठिकाण धान्याचा बाजार म्हणून प्रसिद्ध होते. गणिका किंवा वेश्याव्यवसाय या बाजारातील लहानसा भाग होता. हीरामंडीचा इतिहास कमी तथ्य आणि अधिक काल्पनिक आहे.

अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

जे लोक भूतकाळाची शांतता, सौहार्द आणि प्रेमाची अखंड कथा म्हणून हीरामंडीची कल्पना करतात ते असे मानतात की, हीरामंडी हे मुघल काळापासून उच्च संस्कृती, कला, कविता आणि शास्त्रीय नृत्याचे ठिकाण होते आणि या सांस्कृतिक ठिकाणाला ब्रिटिशांची दृष्ट लागली. त्यांनी या क्षेत्राला वेश्यालय बनवले आणि या ठिकाणाचे सांस्कृतिक अवमूल्यन केले.

हे खरं आहे की, मुघलकालीन काही प्रसिद्ध गणिकांची घरे या भागात होती. आणि राजघराण्यातील तसेच दरबारींपैकी अनेकांचा वावर या भागात होता. परंतु औरंगजेबाच्या कालखंडात या भागातील मुघलांचे प्रस्थ संपुष्टात आणले गेले. औरंगजेब कट्टर धर्मप्रेमी होता आणि नृत्य, संगीत, दारू यांचा विरोधक होता. औरंगजेबाच्या राजवटीत लाहोरचा ऱ्हास झाला. १८ व्या शतकातील दस्तऐवजांमध्ये म्हटल्याप्रमाणे या कालखंडात लाहोरचे वैभव ओसरले होते. राजघराणी येथून स्थलांतरित झाली होती. पूर्व पंजाबमधील पटियाला आणि पूर्वेला रामपूर अशी कला आणि संस्कृतीची इतर केंद्रे उदयास आली आणि लाहोर पूर्वीसारखे राहिले नाही.

१८४९ साली ब्रिटिशांनी पंजाबवर ताबा मिळवला तोपर्यंत, हीरामंडी वेश्याव्यवसायाचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जात होते. संस्कृती आणि कलेचे उल्लेख केवळ स्मृतीत शिल्लक राहिले होते. मौलवी नूर मोहम्मद चिश्ती यांनी १८५८ साली लिहिलेल्या लाहोरच्या सुरुवातीच्या उल्लेखात, हीरामंडी हे व्यभिचाराचे केंद्र – दुसऱ्या शब्दांत, “वेश्याव्यवसायाचे” केंद्र म्हणून नमूद केले आहे.

‘हिस्ट्री ऑफ लाहोर’ (१८८२) या कन्हैया लाल लिखित पुस्तकात लाहोरचा एक तपशील देण्यात आलेला आहे: “इतर कोणत्याही शहरापेक्षा” मोठ्या प्रमाणात “तवायफ” या भागात होत्या. लाल यांनी या भागातील उच्च संस्कृती आणि कलेचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी या ठिकाणाचे वर्णन करताना म्हटले आहे की, काश्मीर आणि इतर डोंगराळ भागातून अपहरण करून सुंदर मुलींना नृत्य, गायनाचे प्रशिक्षण देऊन या भागात विकले जात असे.

भन्साली यांची वेब सिरीज आपल्यापैकी अनेकांना मोहक वाटू शकते परंतु आपण तेच सत्य म्हणून स्वीकारू शकत नाही. ब्रिटिश येईपर्यंत सर्वकाही छान होते का? आपण इतिहासाकडे आपल्याच चष्म्यातून पाहतो. परंतु कल्पनेतील जगापेक्षा वास्तव वेगळे असते.

अधिक वाचा: काळी सापासारखी वेणी, दुर्दैवी शाप; ‘या’ नवाबाने हिंदू पुरोहितांच्या मदतीने केला होता शाप दूर;काय घडले होते नेमके?

इतिहासकार याकूब खान बंगश लिहितात संजय लीला भन्साली यांना गणिका ही एक शक्तिशाली व्यवस्था म्हणून दाखवायची आहे. ही व्यवस्था ब्रिटिशांच्या विरोधात लढली. इतिहासाला तडे देऊन हा केलेला अट्टहास कशासाठी? प्रेमकथाच दाखवायची तर १८५० च्या दशकात या भागातील गणिकांनी विवाहाचा अधिकार जिंकला आणि हजारोंच्या संख्येने आपल्या प्रियकरांसह गेल्या असे चित्रण केले असते तर कोणते नुकसान झाले असते? – खरं तर ही वस्तुस्थिती चिश्ती आणि लाल दोघांनीही प्रमाणित केली आहे. प्रेमासाठी आणखी प्रभावी यशोगाथा असू शकते का?

याउलट, १९३० च्या दशकापासून परिस्थिती बदल्याचे चित्र आहे. या भागातील उत्कृष्ट गायिकांना राष्ट्रीय कीर्ती मिळू लागली. फिल्म इंडस्ट्रीतील त्यांचे महत्त्व सहज अधोरेखित करता येऊ शकते. मलिका पुखराज, नसीम बेगम, तस्वर खानम आणि सुरैया खानम या सारख्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यातून समृद्धीचा उपभोग घेतला. त्यामुळे हीरामंडीचा हाही चेहरा समोर येणे गरजेचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फाळणीपूर्वीच्या लाहोरमध्ये मोहक राजवाडे, महागड्या दागिन्यांनी भरलेल्या खोल्या आणि कविता लिहिण्यात आणि पाठ करण्यात घालवलेले दिवस, मंत्रमुग्ध करणारे गणिकांचे जग यावर भन्साळींचा विश्वास असेल. काही निवडक लोकांसाठी ही वस्तुस्थिती असली तरी, हीरामंडीतील बहुतेक रहिवाशांसाठी स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचे वास्तव अधिक गडद होते. भन्सालींच्या उत्तम सिनेमॅटोग्राफीचा आस्वाद घेत असताना, जिवंत वास्तवाशी त्याचा भ्रमनिरास करू नका. किमान, या तत्परतेने, आपल्या प्रदेशाचा खरा इतिहास वाचण्याचा प्रयत्न करा जो वेगाने विकृत होत आहे.