पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा करूनही अखेरीस पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानने या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघात मोठे बदल केले आहेत. प्रमुख फलंदाज बाबर आझमला वगळण्यात आले आहे, तसेच वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना ‘विश्रांती’ देण्यात आल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (पीसीबी) सांगण्यात आले. मात्र, बाबरला वगळण्यात आले, तर शाहीन आणि नसीम यांनी स्वत:च माघार घेतल्याचे ‘पीसीबी’ सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे बराच संभ्रम निर्माण झाला आहे.

अनुभवी खेळाडूंना का वगळले?

‘‘प्रमुख खेळाडूंची लय आणि तंदुरुस्ती लक्षात घेता, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आगामी कार्यक्रम पाहून निवड समितीने बाबर आझम, नसीम शाह, सर्फराज अहमद आणि शाहीन आफ्रिदी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला,’’ असे ‘पीसीबी’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, शाहीन आणि नसीम यांनी रविवारी सकाळी दुखापतीचे कारण देत स्वत:च मालिकेतून माघार घेतल्याची माहिती आहे. कर्णधार शान मसूद, मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी आणि ‘पीसीबी’चे दोन सल्लागार बाबरला कसोटी संघातून वगळण्याच्या विरोधात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ‘पीसीबी’ अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून निवड समिती आणि मिस्बा उल हक, शोएब मलिक, वकार युनीस, साकलेन मुश्ताक आणि सर्फराज अहमद यांच्यासह मुलतानमध्ये कसोटी संघाच्या निवडीसाठी शनिवारी झालेल्या बैठकीत कर्णधार आणि प्रशिक्षक यांची उपस्थिती नसल्याचेही कळते आहे.

हेही वाचा – विश्लेषण: ‘विस्कोस’ कापड खरेच पर्यावरणपूरक असते का? पर्यावरणवाद्यांकडून वेगळेच निष्कर्ष?

गच्छंती की विश्रांती?

आम्ही खेळाडूंची लय पाहिली. मालिकेत दोन कसोटी सामने शिल्लक असून आम्हाला दोन्हीत विजय मिळवायचा आहे. त्यातच आम्हाला २०२४-२५ हंगामाचाही विचार करावा लागला. या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही काही अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याचे ठरवले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मिळालेल्या या विश्रांतीमुळे या खेळाडूंना तंदुरुस्ती चांगली राखण्यास मदत मिळेल. तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढेल, ज्याचा फायदा त्यांना भविष्यात होईल, असे ‘पीसीबी’च्या निवड समितीचे सदस्य अकिब जावेद म्हणाले. मात्र, जावेद आणि अलीम दार यांच्यासह नवी निवड समिती बाबरला संघाबाहेर करण्याच्या बाजूने होती असे समजते.

बाबरची कामगिरी खालावली…

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बाबरची तुलना विराट कोहली, जो रूट, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन यांच्याशी केली जात होते. क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम चार फलंदाज हेच, असे बोलले जायचे. त्यातही बाबरच कसा सर्वोत्तम याविषयी पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी आणि विश्लेषक दावे करायचे. बाबरचा मनगटी, शैलीदार खेळ खरोखरच सुंदर असतो. पण तो संघाऐवजी स्वतःसाठी खेळतो, असे त्याच्याविषयी गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना वाटू लागले आहे. पाकिस्तानच्या पराभवातही बाबरच्या नावावर अर्धशतक लागलेले असते, पण त्याच्या खेळीचा संघाला कधीच उपयोग होत नाही असे आकडेवारीच सांगते. त्याच्या या स्वार्थी खेळाविषयी पाकिस्तानमध्ये प्रचंड नाराजी आहे. बाबरची बिघडलेली लय संघासाठी चिंतेचा विषय बनत चालली आहे. बाबरचे कसोटीतील अखेरचे अर्धशतक हे डिसेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आले होते. त्यानंतर खेळलेल्या नऊ कसोटी सामन्यांतील त्याची सर्वोत्तम कामगिरी ही ४१ धावांची आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत ०-२ अशा पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेत बाबरची कामगिरी ०, २२, ३१, ११ अशी राहिली. त्याचबरोबर, बाबर हा मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी अशा काही खेळाडूंना घेऊन गटबाजी करतो, असाही आरोप होत आहे. या गटबाजीमुळे पाकिस्तानची कामगिरी कितीही खराब झाली, तर बाबरसह तिघाचौघांचे स्थान अढळ असते, असे दिसून आले आहे.

शाहीन शाह, नसीमही ढेपाळले…

शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनाही गेल्या काही काळात चांगली कामगिरी करता आलेली नाही. २०२३ मध्ये शाहीनने ११ डावांत केवळ १७ गडी बाद केले. यादरम्यान त्याचा वेगही कमी झाला. नसीमवर २०२३ मध्ये शस्त्रक्रिया झाली आणि त्याने एप्रिल २०२४ मध्ये संघात पुनरागमन केले. मात्र, त्यालाही फारशी चमक दाखवता आलेली नाही.

विराट आणि बाबरची तुलना?

अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी बाबरला संघाबाहेर केल्यानंतर पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान याने ‘ट्वीट’ करत नाराजी व्यक्त केली. ‘‘बाबरला संघाबाहेर करणे हे चिंताजनक आहे. २०२० ते २०२३ दरम्यान विराट कोहलीही लयीत नव्हता. तेव्हा विराटची सरासरी अनुक्रमे १९.३३, २८.२१ आणि २६.५० अशी होती. मात्र, भारताने त्याला कधीही संघाबाहेर केले नाही. जर संघातील प्रमुख फलंदाजाला आपण बाहेर करत असू, तर संपूर्ण संघात नकारात्मक संदेश जाऊ शकतो. आपण प्रमुख खेळाडूंना संघाबाहेर करण्याऐवजी त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे,’’ असे ‘ट्वीट’ फखरने केले आहे. त्यानंतर ‘पीसीबी’च्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्याशी चर्चा केल्याचे समजते.

हेही वाचा – भारत मधुमेहाची जागतिक राजधानी; समोसे आणि केक का ठरत आहेत धोकादायक?

पाकिस्तान क्रिकेटची वाताहत…

पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत निवड समितीसह संघातही अनेक बदल पहायला मिळाले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवरही झाला आहे. मूळातच पाकिस्तान निवड समितीत २०२१ पासून २६ सदस्य बदलण्यात आले आहेत. दहा दिवसांपूर्वीच मोहम्मद युसूफने सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर माजी पंच अलीम दार, अकिब जावेद आणि अझर अली यांचा निवड समितीत समावेश करण्यात आला. अलीम दार यांच्या नियुक्तीवरून पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन निवड समिती तयार करण्यात आली होती. मात्र, पाकिस्तान संघाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर वहाब रियाझ आणि अब्दुल रझाक यांना पद सोडावे लागले होते. बाबरला आता संघातून वगळल्यानंतर शाहीन आणि नसीमनेही तंदुरुस्त नसल्याचे कारण देत माघार घेतल्याची चर्चा आहे. यापूर्वी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघात गटबाजी पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा या गटबाजी डोके वर काढण्याची चिन्हे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी काळात कोणती आव्हाने?

आगामी काळात पाकिस्तानात चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. मात्र, भारताने पाकिस्तानात जाऊन न खेळण्याचा निर्णय घेतल्यास पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट मंडळाची अडचण वाढू शकते. त्यातच क्रिकेटच्या सर्व प्रारूपांत संघाला गेल्या काही काळात सकारात्मक कामगिरी करता आलेली नाही. प्रशासकीय स्तरावरही बरीच आव्हाने आहेत. त्यामुळे पाकिस्तान संघाला पुन्हा उभारी घ्यायची असल्यास सर्वच स्तरांवर योग्य बदल करणे आणि निर्णय घेणे आवश्यक आहे.