अमोल परांजपे

युक्रेनच्या डॉनेत्स्क प्रांतातील मुख्य शहर बाख्मुत हे रशिया आणि युक्रेनमधील तीव्र संघर्षाचे केंद्र बनले आहे. या शहरावर संपूर्ण ताबा मिळविण्याचा रशियाचा प्रयत्न आहे, तर युक्रेनचे सैनिक त्यांना रोखण्यासाठी जिवाची बाजी लावत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्हीकडील शेकडो सैनिक मारले गेल्याचे सांगितले जात आहे. बाख्मुतचा प्रत्येक रस्ता लढविला जात आहे. हे शहर जिंकणे रशियासाठी एवढे महत्त्वाचे का आहे, युक्रेन शहराचा पाडाव होऊ नये, यासाठी प्राणपणाने का लढत आहे, याविषयीचे विश्लेषण.

hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?

सामरिकदृष्ट्या बाख्मुत शहराचे महत्त्व किती आहे?

खरे म्हणजे युद्धतज्ज्ञांच्या मते बाख्मुत या शहराला सामरिकदृष्ट्या फारसे महत्त्व नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वी युक्रेनमधील या औद्योगिक शहराची लोकसंख्या अवघी ७० हजार होती. शहरात मोठ्या दळणवळण सुविधा नाहीत किंवा तेथे तळ ठोकून युक्रेनच्या अन्य प्रांतावर हल्ला करता येईल, असे त्याचे भौगोलिक स्थानही नाही. गेले सात महिने रशियाचे प्रखर हल्ले या शहराने झेलले आहेत. शहरातील एकही इमारत अशी नाही, की तिला युद्धाची झळ बसलेली नाही. शहरातील भूमिगत भुयारांमध्ये केवळ काही हजार नागरिक जीव मुठीत धरून राहात आहेत. असे असताना रशिया प्रचंड नुकसान सहन करून बहुधा प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून शहर ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.

बाख्मुतच्या लढाईमध्ये आजवर किती नुकसान झाले आहे?

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बाख्मुतमध्ये गेल्या काही दिवसांत रशियाचे १ हजार १०० सैनिक ठार केल्याचा दावा अलीकडेच केला. यापेक्षा कितीतरी जास्त सैनिक गंभीर जखमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे या शहरात २४ तासांत युक्रेनचे दोनशेहून अधिक सैनिक मारल्याचा दावा रशियाने दोन दिवसांपूर्वी केला. अर्थात, हे दावे सिद्ध झाले नसले तरी दोन्ही बाजूंनी प्रचंड जीवितहानी होत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. एका अंदाजानुसार बाख्मुतच्या लढाईत रशियाचे २० ते ३० हजार सैनिक एकतर मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत. तरीही युद्धनीतीमध्ये अत्यंत कमी महत्त्वाचे असलेले हे शहर दोन्ही बाजूंनी निकराने लढविले जात आहे.

विश्लेषण : फ्रान्सच्या रस्त्यांवर हजारो टन कचरा साठला; फ्रान्समध्येही नवी पेन्शन योजना बनली सरकारची डोकेदुखी

बाख्मुत जिंकण्यासाठी रशियाचे एवढे प्रयत्न का?

एक वर्षानंतरही रशियाच्या सैन्यप्रमुखांना एकही भरीव यश संपादन करता आलेले नाही. अवघ्या काही दिवसांत कीव्हसह युक्रेन ताब्यात घेण्याचे रशियाचे मनसुबे एव्हाना धुळीला मिळाले आहेत. त्यामुळे युद्धभूमीवर एकतरी यशस्वी मोहीम आपले राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दाखविण्याच्या खटपटीत रशियाचे जनरल आहेत. असा एखादा प्रतीकात्मक विजय मिळविणे रशियन सैन्यदलाचे मनोबल उंचावण्यासाठी आवश्यक आहे. शिवाय बाख्मुतचा पाडाव झाल्यास बहुतांश डॉनेत्स्क प्रांतावर ताबा मिळविणे रशियाला शक्य होणार आहे. त्यामुळेच सैनिक गमावूनही बाख्मुतच्या आघाडीवर माघार घेण्याची रशियाची तयारी नाही. तर रशियाला प्रत्येक आघाडीवर रोखणे, हे युक्रेनलाही क्रमप्राप्त आहे.

युक्रेनने माघार न घेण्याची कारणे काय?

यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे रशियाला मानसिक यश मिळू न देणे, हे आहे. बाख्मुतसारखे छोटे, बिनमहत्त्वाचे शहरही आपण सहजरीत्या शत्रूला मिळू देणार नाही, हा संदेश यानिमित्ताने झेलेन्स्की यांनी देशवासीयांना दिला आहे. यात युक्रेनचा आणखी एक फायदा म्हणजे बाख्मुतमध्ये रशियाचे सैन्य अडकून पडल्यामुळे अन्य महत्त्वाची शहरे आणि भागावर त्यांना लक्ष केंद्रित करणे अशक्य झाले आहे. बाख्मुत लढवीत ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे रशियाचे पुतिनधार्जिणे खासगी लष्कर ‘वॅग्नर ग्रुप’…

विश्लेषण : ‘तोशखाना प्रकरणा’मुळे इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय?

‘वॅग्नर ग्रुप’ला जागा दाखविण्याचा युक्रेनचा प्रयत्न?

या लष्कराचे प्रमुख येग्वेनी प्रिगोझिन यांनी बाख्मुतची लढाई प्रतिष्ठेची केली आहे. रशियाच्या नियमित सैनिकांपेक्षा आपले सैन्यदल अधिक सक्षम असल्याचा त्यांचा दावा आहे. बाख्मुतमध्ये रशियापेक्षा वॅग्नरचे सैनिक अधिक आहेत. असे असतानाही तुलनेने कमी संसाधने असलेल्या युक्रेनने त्यांना रोखून धरले आहे. प्रिगोझिन यांच्या या अपयशाचे दूरगामी परिणाम मॉस्कोमधील राजकारणात दिसतील, असे मानले जात आहे. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांच्यासोबत सत्तासंघर्षात प्रिगोझिन यांचे पारडे हलकेच राहिले आहे. दुसरीकडे बाख्मुतमध्ये आपल्या सैनिकांना पुरेसा दारुगोळा मिळत नसल्याचे सांगत शोइगू यांनीही आपले हात झटकले आहेत. एकूणच वॅग्नर ग्रुप आणि रशियासाठी बाख्मुतची लढाई प्रतिष्ठेची बनली आहे, तर युक्रेन आपली इंच-इंच भूमी वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या छोटेखानी शहराचा लढा नजीकच्या काळात संपण्याची चिन्हे नाहीत.

amol.paranjpe@expressindia.com