त्वरित प्रक्षेपण, अचूकता, जबरदस्त प्रत्याघात आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता, यामुळे आधुनिक काळात क्षेपणास्त्रे पसंतीची शस्त्रे बनली आहेत. क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची स्वत:ची काही वैशिष्ट्ये आहेत. काही दीर्घ अंतरावर प्रभाव पाडण्याचे सामर्थ्य देतात. शक्ती संतुलनात ती महत्त्वाची ठरतात. सामरिक क्षेपणास्त्र शक्तीचे सूचक मानली जातात. त्याचे राजकीय, सामरिक फायदे मिळू शकतात. शत्रूच्या प्रदेशावर प्रहार केल्याचे मानसिक परिणाम होतात. भारत-पाकिस्तान संघर्षात उभयतांच्या शस्त्रागारातील क्षेपणास्त्रे युद्धनीती अधोरेखित करतात. वाढता तणाव पाकिस्ताननेपरेशन सिंदूरविरोधात आखलेल्या ‘बुनयान अल-मार्सूस’ मोहिमेत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर भर दिल्याचे दिसले. परंतु, भारताने मजबूत संरक्षण कवच करून ही क्षेपणास्त्रे रोखली. पाकिस्तानच्या ड्रोन आणि अन्य हवाई धोक्यांना निष्प्रभ केले. या हल्ल्यांना भारताने पाकिस्तानचे प्रमुख लष्करी तळ व अन्य भागात ड्रोन व हवाई हल्ले करीत प्रत्युत्तर दिले. यात पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. मुळात सर्व क्षेपणास्त्रे एकसारखी नसतात. क्रुझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वेगळी आहेत. त्यांची हालचाल, पल्ला व प्रहार पद्धती यामध्ये मूलभूत फरक असतो. दोन्ही क्षेपणास्त्रांचे स्वत:चे काही फायदे असतात. क्रुझ क्षेपणास्त्रे क्रूझ क्षेपणास्त्रात चपळता, गुप्तता आणि लपण्याची क्षमता जास्त असते. पृथ्वीच्या वातावरणात ती मार्गक्रमण करतात. साधारणत: कमी किंवा मध्यम उंचीवर उडतात. त्यांना जेट इंजिनच्या शक्तीवर प्रणोदन मिळते. त्यांचा पल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा कमी असतो. परंतु, अत्यंत अचूक मारा करण्यास ते सक्षम असतात. डावपेच, युक्तीने त्यांचा रडारपासून स्वत:चा बचाव करता येतो . उड्डाणादरम्यान अचूक लक्ष्यभेदासाठी मार्ग समायोजित करू शकतात. त्यांना अचूकता व लवचिकतेचा फायदा मिळतो. हवेतून, समुद्रातून अथवा जमिनीवरून ते डागता येतात. उड्डाण मार्ग तुलनेत कमी असल्याने त्याला शोधणे व रोखणे सोपे होते. भारताचे ब्राम्होस, स्कॅल्प-ईजी स्टॉर्म शॅडो, अमेरिकेचे टॉमहॉक ही त्याची काही उदाहरणे.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रात प्रचंड वेगाचा फायदा मिळतो. प्रगत हवाई संरक्षण प्रणालींना प्रतिकार करणे आव्हानात्मक बनते. अशा क्षेपणास्त्रांनी युद्धभूमीवरील गतिशीलता बदलते. तीव्र, वळणदार मार्गाने मार्गक्रमण करणारी ही क्षेपणास्त्रे लक्ष्याकडे झेपावताना वातावरणाबाहेर जाऊन पुन्हा आत प्रवेश (रिएन्ट्री तंत्रज्ञान) करतात. प्रारंभी रॉकेट इंजिनच्या शक्तीवर ते झेपावतात. नंतर गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली अवकाशातून प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी ती उपयुक्त ठरतात. आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अन्य खंडात मारा करू शकतात. या क्षेपणास्त्रांची डावपेचात्मक क्षमता मर्यादित असते. उड्डाणाच्या मध्यावर ती शोधता येतात. परिणामी, त्यांना रोखण्याची शक्यता बळावते. अनेक वॉरहेड्स, मोठे पेलोड वाहून नेण्यास सक्षम असतात. आंतरराष्ट्रीय भूराजनीतीत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे महत्त्वाची भूमिका निभावतात. लांब पल्ल्याची आण्विक सक्षम क्षेपणास्त्रे ही सामरिक शस्त्रे आहेत. या शस्त्रांच्या वापराचे संभाव्य परिणाम शत्रूला भयग्रस्त करून प्ररोधनाचे काम करतात. कुणी हल्ला केल्यास त्याला तोडीसतोड उत्तर देण्याची जाणीव करून देतात. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे पल्ल्यावरून वर्गीकरण केले जाते. यात आंतरखंडीय (आयसीबीएम), कमी पल्ल्याची (एसआरबीएम), मध्यम श्रेणीची (एमआरबीएम), मध्यवर्ती श्रेणीतील (आयआरबीएम) क्षेपणास्त्रांचा समावेश होतो.

भारत, पाकिस्तानकडील क्षेपणास्त्रे

पाकिस्तानच्या भात्यात लहान ते मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. क्रुझ क्षेपणास्त्र विकासावर त्याने लक्ष केंद्रित केले आहे. वाहनावरून डागता येणाऱ्या अब्दाली, गझनवी, शाहीन – एक व नासर यासारख्या कमी पल्ल्यांच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा अंतर्भाव आहे. शाहीन – दोन आणि घौरीसारखी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. शाहीन – तीन आणि अबाबील एमआरबीएम विकसित होत आहे. त्याच्या पुढील आवृत्तीची रचना एकाचवेळी वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा आणि रिएन्ट्री तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे मानले जाते. त्याची क्षमता मात्र तपासली गेलेली नाही. दुसरीकडे भारताचे शस्त्रागार अतिशय विस्तृत व वैविध्यपूर्ण क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. ज्यात बॅलिस्टिक, क्रूझ, हवेतून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचे २९ प्रकार आहेत. सर्वात लांब पल्ल्याचे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारे अग्नी – पाच, भारताच्या धोरणात्मक कार्यक्रमात पृथ्वी – दोन आणि अग्नी – एक सारख्या जमिनीवर आधारित तसेच अग्नी – दोन, अग्नी – तीन सारख्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम

कमी खर्चात, लांब अंतरावर, हवाई दलाच्या जोखमीशिवाय शत्रूूचे नुकसान करण्याचे सामर्थ्य ही क्षेपणास्त्रांची अद्वितीय क्षमता मानली जाते. क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकणारे वॉरहेड्सचे प्रकार आणि श्रेणी कोणत्याही राष्ट्राचे प्रभावक्षेत्र अधोरेखीत करते. चीन, पाकिस्तानच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भारताकडून क्षेपणास्त्र दलाची स्थापना प्रगतीपथावर आहे. त्याअंतर्गत सर्व पारंपरिक क्षेपणास्त्रे एकाच छताखाली आणली जातील. तर अण्वस्त्रे स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांडच्या नियंत्रणाखाली असतील. आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बाळगणाऱ्या चीनला डोळ्यासमोर ठेवून शस्त्रास्त्रांचा विकास होत आहे. भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत अग्नीच्या पुढील आवृत्तीत अधिकचा पल्ला गाठण्याचे नियोजन आहे. सध्या संपूर्ण पाकिस्तान भारतीय क्षेपणास्त्र माऱ्याच्या टप्प्यात आहे. तसेच अवाढव्य चीनलाही या टप्प्यात आणण्यासाठी अग्नीची मारक क्षमता विस्तारली जात आहे. चीन आणि पाकिस्तानकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा विकास होत आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचावासाठी दुसऱ्या टप्प्यातील स्वदेशी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (फेज टू) विकसित होण्याच्या मार्गावर आहे.