छत्तीसगडमधील अबुझमाड जंगल परिसरात २१ मे रोजी झालेल्या चकमकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस, पॉलिटब्युरो सदस्य, सेंट्रल मिलिट्रीचा प्रमुख, केंद्रीय समिती सदस्य आणि नक्षलवादी चळवळीचा क्रमांक एकचा नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू उर्फ गंगन्ना ठार झाला. नक्षल चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा नेता चकमकीत मारल्या गेला आहे. यामुळे नक्षलवादी चळवळीचा कणा मोडला का आणि बसवराजूची जागा कोण घेणार, याविषयी. 

नक्षल चळवळीची रचना काय? 

पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावातून सुरू झालेल्या या हिंसक नक्षलवादी चळवळीने मधल्या काळात वीसहून अधिक राज्यात आपली पाळेमुळे रोवली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेच्या कारवाईमुळे ही चळवळ आता काही राज्यांपुरती मर्यादित झाली आहे. प्रतिबंधित भारतीय काम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) देखरेखीत चालणाऱ्या या चळवळीत विविध तुकड्या कार्यरत आहेत. पक्षातील सरचिटणीस पद सर्वोच्च असते. यातील पहिल्या क्रमांकाची तुकडी म्हणजे ‘पॉलिटब्युरो’. ५ ते ७ सदस्य असलेली ही तुकडी चळवळीचा मेंदू म्हणून ओळखली जाते. त्यानंतर ‘सेंट्रल कमिटी’चा क्रमांक लागतो. यात प्रत्येक राज्यातील सदस्य घेतल्या जाते. चळवळीतील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत ही समिती काम करीत असते. यानंतर ‘रिजनल कमिटी’ क्रमांक लागतो. याचे कार्यक्षेत्र राज्यापुरते मर्यादित असते. या खालोखाल झोनल आणि एरिया कमिटी काम करीत असते. या व्यतिरिक्तही गरजेनुसार विविध विभागदेखील तयार करण्यात आले आहेत. नंबाला केशव राव उर्फ बसवराजू या सर्वांचा प्रमुख होता. वरिष्ठ नक्षल नेता गणपतीने आजारपणामुळे २०१८ साली ही जबाबदारी बसवराजूवर सोपवली होती. 

‘बसवराजू’च्या प्रवासाची चर्चा का? 

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेठ गावात १९५५ साली नंबाला केशव राव उर्फ बसवराजूचा जन्म झाला. बसवराजूने आंध्र प्रदेशातील वरंगळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून बी.टेक.ची पदवी संपादन केली. १९८० पासून तो नक्षल चळवळीत सक्रिय होता. तत्पूर्वी महाविद्यालयीन जीवनात त्याने डाव्या विचारसरणीच्या विध्यार्थी संघटनेत काम केले होते. १९८७ च्या सुमारास त्याने थेट श्रीलंकेला जाऊन तेथील लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलमच्या (एलटीटीई) सैनिकांकडून ‘अ‍ॅम्बुश’ रणनीती, गनिमी युद्ध (गेरिला वॉरफेअर), जिलेटिन, स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतेला उच्चशिक्षित बसवराजूला १९९२ साली भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (मार्क्सवादी-लेनिनवादी) केंद्रीय समितीवर घेण्यात आले. यादरम्यान त्याने अनेक हिंसक योजना आखून पोलीस तसेच राजकारण्यांवर हल्ले घडवून आणले. २००४ साली पार्टीच्या विलिनीकरणानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) उदय झाला. यात बसवराजूची नियुक्ती सेंट्रल मिलिटरी कमिशनचा प्रमुख आणि पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून करण्यात आली. दरम्यान, तत्कालीन पार्टी सरचिटणीस मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती याने आजारपणामुळे राजीनामा दिला. त्यानंतर १० नोव्हेंबर २०१८ साली बसवराजूची पार्टीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. हे पद पार्टीत सर्वोत्तम समजले जाते. आपल्या ७० वर्षांच्या जीवनात त्याने एक उच्चशिक्षित विध्यार्थी नेता ते हिंसक नक्षल चळवळीचा प्रमुख असा प्रवास केला. 

त्रिस्तरीय सुरक्षा कशी होती?

नक्षल चळवळीतील रचनेप्रमाणे नेत्यांना सुरक्षादेखील दिली जाते. पॉलिटब्युरो व केंद्रीय समिती सदस्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. सोबतच वरिष्ठ नेत्यांनाही संरक्षण दिले जाते. बसवराजू पार्टीचा सर्वोच्च नेता असल्याने त्याला त्रिस्तरीय सुरक्षा होती. यात एके-४७ अत्याधुनिक बंदूकधारी तब्बल ४० नक्षलवादी होते. बसवराजूचा मुक्काम असलेल्या स्थळापासून ३ किलोमीटरपर्यंत अत्याधुनिक शस्त्रधारी नक्षलवादी तैनात करण्यात येत होते. बसवराजू स्वतः एके-४७ रायफल बाळगत होता. त्यामुळे गेली चार दशके तो पोलिसांच्या हाती लागला नाही. काही महिन्यांपूर्वी त्याच्या सुरक्षेतील चार नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासूनच बसवराजूला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी योजना आखली होती. करेगुट्टा टेकडीवर राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानात मोठे नेते सापडतील अशी अशा होती. मात्र, तसे झाले नाही. सुरक्षा यंत्रणेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही खेळी खेळली होती. परंतु छत्तीसगड पोलिसांनी त्यांनंतर लगेच ‘ऑपरेशन ब्लॅकफॉरेस्ट’ राबवून ५५ तासांत थेट नक्षलवाद्यांच्या प्रमुखालाच ठार केले. यात आणखी २६ नक्षलवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे बसवराजूला असलेले त्रिस्तरीय सुरक्षा कवच जवानांनी कसे भेदले यावरही चर्चा सुरू झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता ठार झाल्याने चळवळीला आजपर्यंत बसलेला हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.

५०० हून अधिक जवानांच्या मृत्यूस जबाबदार 

बसवराजूने नक्षल चळवळीतील सर्वाधिक काळ छत्तीसगड, आंध्र प्रदेश तेलंगणा, झारखंड आणि महाराष्ट्रात घालवला. ५०० हून अधिक जवानांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या बसवराजूने ९० च्या दशकात चळवळीत मोठ्या प्रमाणात आदिवासी तरुणांना भरती केले. त्याच्यावर सेंट्रल मिलिट्री कमांडची जबाबदारी असल्याने अनेक मोठ्या हल्ल्याचा तो सूत्रधार होता. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या ताफ्यावर तिरुपती जवळ नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. त्यात ते थोडक्यात बचावले. गृहमंत्री माधव रेड्डी यांची भूसुरुंगस्फोट घडवून नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. तसेच २०१३ साली सुकमामध्ये काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. या सर्व हल्ल्यांची रणनीती बसवराजू यानेच तयार केली होती. दंतेवाड्यामध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात ७६, राणी बुधलीत ५० तर गडचिरोलीत ५२ जवान शहीद झाले होते. हे हल्लेदेखील त्याच्याच इशाऱ्यावर केले गेले. २०१९ साली गडचिरोलीतील जांभूळखेडामध्ये भूसुरुंगस्फोट घडवून १५ जवानांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. हा हल्लासुद्धा बसवराजूनेच केला होता. युद्ध रणनीतीत निष्णात आणि तितकाच क्रूर असल्याने इतकी वर्षे तो सुरक्षा यंत्रणेच्या हाताला लागला नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बसवराजूनंतर आणखी किती नेते शिल्लक? 

बसवराजू चकमकीत ठार झाल्यानंतर आता माओवाद्यांचा सर्वोच्च नेता कोण असेल, याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. पॉलिट ब्युरोमध्ये मुप्पाला लक्ष्मण राव उर्फ गणपती, कटकम सुदर्शन उर्फ आनंद, मलोजुल्ला उर्फ भूपती, मिशिर बेसरा व थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी हे सहा प्रमुख नेते आहेत. यातील थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी याच्यावर १ कोटी रुपयांचे, तर उर्वरित पाचही जणांवर दीड कोटी रुपयांचे बक्षीस शासनाने जाहीर केले आहे. या सहा नक्षल नेत्यांपैकी गणपतीने आजारपणामुळे महासचिवपद आधीच सोडले आहे, तर बसवराजू चकमकीत ठार झाला आहे. कटकम सुदर्शन याचा ३ मे २०२३ रोजी हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे मलोजुल्ला उर्फ भूपती, मिशिर बेसरा व थिप्पारी तिरुपती या तिघांपैकी एकाकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. भूपती व थिप्पारी हे तेलंगणातील, तर मिशिर बेसरा हा झारखंडमधील नक्षल चळवळीत सक्रिय आहे. या व्यतिरिक्त काही सेंट्रल कमिटी सदस्य चळवळीचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, चळवळीत नव्याने होणारी भरती जवळपास बंद झाली आहे. त्यात मोठे नेते मारले जात असल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.