तडाखेबंद खेळीसाठी प्रसिद्ध माजी खेळाडू आणि इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी इंग्लंड संघाला आक्रमक पवित्र्याची दीक्षा दिली. खेळपट्टी कशीही असो, वातावरण कोणतंही असो, मैदानाचा आकार कितीही असो- प्रतिस्पर्धी अचंबित होतील अशा पद्धतीने खेळ करायचा हा मंत्र मॅक्युलम यांनी दिला. मॅक्युलम यांचं टोपणनाव बॅझ त्यामुळे याला बॅझबॉल असं नाव मिळालं. हे तंत्र यशस्वीही होऊ लागलं. भारत दौऱ्याची विजयी सुरुवातही पाहुण्यांनी केली मात्र त्यानंतर बॅझबॉलचा प्रभाव ओसरत गेला आणि भारताने ४-१ फरकाने मालिका जिंकली. धरमशाला कसोटी संपताच बॅझबॉलचं बूमरँग इंग्लंडवर उलटल्याची चर्चा सुरू झाली.

फलंदाजीत हाराकिरी
इंग्लंडचा भारत दौरा जाहीर झाल्यापासून बॅझबॉलची चर्चा सुरू झाली. इंग्लंडचा संघ ज्या पद्धतीने मॅक्युलम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे ते डावपेच भारतात यशस्वी ठरणार का यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला. त्यावेळी बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याला इंग्लंडचे प्रशिक्षक मॅक्युलम यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. ते या सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमात फिरकीपटूला रवीचंद्रन अश्विनला बक्षीसाने गौरवण्यात आलं. त्यावेळी निवेदक आणि समालोचक हर्षा भोगले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अश्विनने बॅझबॉलकडे लक्ष असेल असं सांगितलं. त्यावेळी कॅमेरा मॅक्युलम यांच्या चेहऱ्यावर स्थिरावला, त्यांनी मिश्कील हास्य केलं.

Argentina beat Canada by 20 points in the first match
अर्जेंटिना संघाची दमदार सुरुवात; पहिल्याच सामन्यात कॅनडावर २० अशी सरशी; मेसीची चमक
Ravindra jadeja Lifts Rahul Dravid After Wins Best Fielder Medal
IND v AFG: भारताच्या विजयानंतर जडेजाने ड्रेसिंग रूममध्ये राहुल द्रविडला थेट उचलून घेतलं, पण नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO
Babar Azam's reaction after the match against Ireland
आता काय बाकीच्या १० खेळाडूंच्याही जागी मीच खेळू का? आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर बाबर आझमचे वक्तव्य
IND vs USA Match Updates in Marathi
IND vs USA : भारताविरूद्धच्या सामन्यातून अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलचं बाहेर, समोर आले महत्त्वाचे कारण
Anand Mahindra charges Team India with grave cruelty Here’s why
आनंद महिंद्रा यांनी भारतीय संघावर ‘गंभीर क्रूरतेचा’ आरोप करत दिली शिक्षा, कारण ऐकून बसेल धक्का
Rohit Sharma Statement on India win Over Pakistan
IND vs PAK: “जर आपण ऑलआऊट होऊ शकतो, तर…” रोहितचा मास्टरस्ट्रोक अन् भारताचा विजय, सामन्यानंतर सांगितलं मैदानात काय घडलं?
Australia beat England by 36 runs in Twenty20 World Cup cricket tournament sport news
झॅम्पाची फिरकी निर्णायक; ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर ३६ धावांनी मात ; फलंदाजांचीही फटकेबाजी
In Sunil Chhetri last match India were satisfied with a draw football match sport news
छेत्रीच्या अखेरच्या लढतीत भारताचे बरोबरीवर समाधान

खेळपट्टी कशीही असो, गोलंदाज कितीही दर्जेदार असोत, डाव कोणताही असो- खेळायला उतरल्यापासून जोरदार आक्रमण करायचं, चौकार-षटकारांची लयलूट करायची. पाचच्या धावगतीने धावा करायच्या हे तंत्र इंग्लंडच्या फलंदाजांनी अवलंबलं. सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्राऊले यांनी हे सूत्र अंगीकारत प्रत्येक लढतीत चांगली सलामी दिली. पण फटके मारताना बाद होण्याचा धोका असतो. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा चोख अभ्यास केला होता. त्यामुळे कमी वेळेत भरपूर धावा करण्याच्या नादात इंग्लंडने सातत्याने विकेट्स गमावल्या. काहीप्रसंगी खेळपट्टीवर स्थिरावून संयमाने खेळायची आवश्यकता असते. पण मालिकेत प्रत्येकवेळी इंग्लंडचे फलंदाज फक्त आक्रमणावर भर देताना दिसले.

पहिल्या आणि चौथ्या कसोटीचा अपवाद सोडला तर इंग्लंडचे फलंदाज पुरेशा धावा करु शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या कसोटीत भारताने दोन्ही डावात मिळून ६५१ धावा केल्या. इंग्लंडला ५४५ धावाच करता आल्या. तिसऱ्या कसोटीत भारताने दोन्ही डावात मिळून ८७५ धावा केल्या. इंग्लंडला दोन्ही डावात मिळून ४४१धावाच करता आल्या. भारताने इंग्लंडच्या जवळपास दुप्पट धावा केल्या. पाचव्या कसोटीत भारताला एकदाच फलंदाजी करावी लागली. भारताने ४७७ धावा केल्या. इंग्लंडला दोन्ही डावात मिळून ४१३ धावाच करता आल्या.

बेन डकेट, ऑली पोप यांनी मालिकेत एकेक शतकी खेळी केली पण बाकी डावात त्यांची कामगिरी यथातथाच राहिली. झॅक क्राऊलेची फलंदाजी हा इंग्लंडसाठी भारत दौऱ्यातली सकारात्मक गोष्ट म्हणता येईल. क्राऊलेने चार अर्धशतकी खेळी करताना इंग्लंडला चांगली सलामी मिळवून दिली पण त्यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही क्राऊलेने विकेट गमावल्यामुळे डावाची लय बिघडलेली पाहायला मिळाली. कर्णधार बेन स्टोक्सकडून इंग्लंडला फलंदाजीत मोठ्या अपेक्षा होत्या. स्टोक्सला पाच कसोटी मिळून केवळ एक अर्धशतक करता आलं. भारताच्या वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही स्वरुपाच्या गोलंदाजांसमोर तो निरुत्तर ठरला.

आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध जॉनी बेअरस्टोसाठी धरमशाला कसोटी शंभरावी कसोटी होती. हॅरी ब्रूकने माघार घेतल्यामुळे बेअरस्टो पाचही सामने खेळला. बेअरस्टोने प्रत्येक डावात जोरदार सुरुवात केली पण एकदाही त्याला मोठी खेळी करता आली नाही. बॅझबॉल तंत्राला जागत अनुभवी जो रूटने खेळात बदल केले होते. मात्र तिसऱ्या कसोटीत रॅम्प शॉटच्या फटक्यावर बाद झाल्यानंतर रूटवर प्रचंड टीका झाली. इंग्लंडच्या पराभवाचं खापर त्याच्यावर फुटलं. यामुळे रूटला नैसर्गिक शैलीकडे परतावं लागलं. रांचीत त्याने शतकही झळकावलं. रूटची भारताविरुद्ध कामगिरी नेहमीच चांगली होती. प्रतिस्पर्धी गोलंदाज आणि खेळपट्टी यांचा आदर करत रुट खेळतो. या मालिकेत बॅझबॉलने रुटच्या शैलीवर परिणाम झालेला पाहायला मिळाला. त्याच्यासारख्या अनुभवी फलंदाजाची परवड झाली.

यशस्वीसाठी योजना नाही
डोमेस्टिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकलेल्या यशस्वी जैस्वालच्या नावावर या मालिकेआधी केवळ चार कसोटी सामने होते. यशस्वीचं जेवढं वय आहे तेवढा अनुभव जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. घरच्या मैदानावर तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध असलेली ही मालिका यशस्वीसाठी मोठं आव्हान होतं. यशस्वीने धावांच्या राशी ओतत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. यशस्वीने आवश्यक असताना संयमी खेळही दाखवला आणि खेळपट्टीची साथ मिळताच षटकारांची आतषबाजीही केली. यशस्वीने अनुभवी रोहित शर्माच्या बरोबरीने दमदार सलामीही दिली. सुनील गावस्कर यांच्यानंतर एका मालिकेत ७००पेक्षा अधिक धावांचा दुर्मीळ विक्रम यशस्वीने नावावर केला. मालिकेदरम्यान यशस्वीने षटकारांचा विक्रमही रचला. ५ सामन्यात तब्बल ७१२ धावांसह यशस्वीने मालिकावीर पुरस्कार पटकावला. यशस्वीने एक द्विशतक, एक शतक आणि ३ अर्धशतकं झळकावली. यशस्वीला बाद करण्यासाठी इंग्लंडकडे कोणतेही डावपेच नसल्याचं स्पष्ट झालं. पाचही कसोटीत यशस्वीने मनमुराद फलंदाजी केली. ही मालिका यशस्वीच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरली यात शंकाच नाही. आधुनिक तंत्रज्ञान हाताशी असतानाही यशस्वीला बाद करण्यासाठी इंग्लंडकडून प्रयत्न झाल्याचंही दिसलं नाही. २२वर्षीय यशस्वीसमोर इंग्लंडने अक्षरक्ष: गुडघे टेकले.

पाच पदार्पणवीरांना रोखण्यात अपयश
प्रमुख खेळाडू दुखापती आणि वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध नसल्यामुळे भारतासाठी ही मालिका मोठं आव्हान होतं. पाच खेळाडूंनी मालिकेदरम्यान भारतासाठी पदार्पण केलं. रजत पाटीदार, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप आणि देवदत्त पड्डीकल यांना भारताची कॅप मिळाली. इतके सारे नवीन खेळाडू असूनही इंग्लंडला भारताला रोखता आलं नाही. रजत पाटीदारला डोमेस्टिक क्रिकेटमधलं सातत्य मालिकेत दाखवता आलं नाही. पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गेली अनेक वर्ष धावांची टांकसाळ उघडलेल्या सर्फराझने नैपुण्याची चुणूक दाखवली. राजकोट कसोटीत पदार्पणातच सर्फराझने दोन अर्धशतकी खेळी साकारल्या. रांची कसोटीत अपयशानंतर सर्फराझने धरमशाला इथे अर्धशतक झळकावलं. ध्रुव जुरेलसाठी ही मालिका स्वप्नवत ठरली. उत्तम यष्टीरक्षणासह ध्रुवने फलंदाजीतही योगदान दिलं. रांची कसोटीत ९० आणि नाबाद ३९ धावा करत भारताच्या विजयाचा पाया रचला. रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव या फिरकीपटूंसमोर ध्रुवने आत्मविश्वासाने यष्टीरक्षण केलं. मूळच्या बिहारच्या आणि पश्चिम बंगालकडून खेळणाऱ्या आकाश दीपनेही आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची चांगली सुरुवात केली. धरमशाला कसोटीत पदार्पणाची संधी मिळालेल्या देवदत्तने अर्धशतक करत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. युवा क्रिकेटपटूंनी खांदेपालटासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. इंग्लंडतर्फे टॉम हार्टले आणि शोएब बशीर यांनी मालिकेत पदार्पण केलं. त्यांनी चांगली गोलंदाजी केली, विकेट्सही पटकावल्या. पण धावा रोखण्यात त्यांना अपयश आलं.

जेम्स अँडरसनला पर्याय मिळेना…
४१वर्षीय जेम्स अँडरसनने मालिकेदरम्यान ७०० विकेट्सचा टप्पा पार केला. ७०० विकेट्स घेणारा अँडरसन हा पहिलाच वेगवान गोलंदाज आहे. ७०० विकेट्सचा टप्पा ओलांडणारा तो केवळ तिसरा गोलंदाज आहे. अँडरसन या मालिकेत पहिली कसोटी खेळला नाही. मात्र त्यानंतर चारही कसोटी खेळला. अँडरसन चाळिशीतही उत्तम गोलंदाजी करत आहे. विकेट्सही मिळवतो आहे. पण दुसऱ्या बाजूने साथ नसल्याचं उघड झालं. अँडरनसचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड निवृत्त झाला आहे. त्यामुळे इंग्लंडने या मालिकेत मार्क वूड आणि ऑली रॉबिन्सन यांना खेळवलं. पण या दोघांनाही अँडरसनला साथ देता आली नाही. अँडरसन २० वर्ष अव्याहत कसोटी क्रिकेट खेळतो आहे. एवढ्या प्रदीर्घ कालावधीत गोलंदाजांची दुसरी फळी तयार होणं अपेक्षित होतं. पण आजही अँडरसनच इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज आहे. तुलनेने खूपच तरुण असलेला रॉबिन्सन केवळ एक कसोटी खेळू शकला. वूड हा वेग आणि बाऊन्सरसाठी ओळखला जातो. पण मालिकेत तो सपशेल निष्प्रभ ठरला. इंग्लंडला जिंकण्यात सातत्य राखायचं असेल तर अँडरसनला पर्याय शोधावा लागेल हा मालिकेचा बोध म्हणावा लागेल.

रोहितचं नेतृत्व बॅझबॉलवर भारी
अनुनभवी संघाचं नेतृत्व करण्याचं आव्हान भारताचा कर्णधार रोहित शर्मासमोर होतं. रोहितने युवा खेळाडूंची मोट बांधत नेतृत्वाचं महत्त्व ठसवलं. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, के.एल.राहुल या खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहितवर फलंदाज आणि कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी होती. रोहितने दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळत इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर दिलं. गोलंदाजीतले बदल, फलंदाजांनुरुप क्षेत्ररक्षणाची सजावट, युवा खेळाडूंशी धमालमस्ती, आणि वैयक्तिक कामगिरी याद्वारे रोहितने मल्टीटास्किंगचं कौशल्य दाखवून दिलं. मालिकेत दोन शतकी खेळी साकारत रोहितने फलंदाजीतही योगदान दिलं. मालिकेपूर्वी बॅझबॉलची चर्चा रंगली होती. पण धरमशालात भारताने कसोटी जिंकताच रोहितच्या नेतृत्वाचं कौतुक होऊ लागलं. मालिकेदरम्यान रोहित सहकाऱ्यांशी संवाद साधतानाचे अनेक व्हीडिओ व्हायरल झाले. दडपणाच्या मालिकेतही रोहितच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहिलं.