नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाला बाद फेरी गाठण्यात अपयश आले. संघाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर बाबर आझमला कर्णधारपद सोडावे लागले. यासह पाकिस्तान क्रिकेट मंडळात (पीसीबी) प्रशासकीय पातळीवरही बदल झाले. तसेच, संघाचे प्रशिक्षकही बदलण्यात आले. ‘पीसीबी’च्या निर्णयाचा संघाला किती फायदा होईल, आगामी काळात या बदलांचा संघाच्या कामगिरीवर किती फरक पडेल, याचा आढावा.

बाबरने कर्णधारपद का सोडले? ही हकालपट्टी होती का?

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील संघाच्या खराब कामगिरीनंतर बाबरने कर्णधारपद सोडले. पण स्पर्धा सुरू असतानाच विशेषतः भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाल्यानंतर त्याच्या हकालपट्टीची चर्चा पीसीबीतच सुरू झाली. मात्र, खेळाडू म्हणून बाबर संघाकडून तिन्ही प्रारूपांत खेळत राहणार आहे. त्याने कर्णधारपद सोडत असल्याचे समाजमाध्यमांवर सांगितले. पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत नऊपैकी चारच सामने जिंकता आले आणि गुणतालिकेत संघ पाचव्या स्थानी राहिल्याने त्यांना उपांत्य फेरी गाठता आली नाही. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय कठीण होता. मात्र, हा निर्णय घेण्याची योग्य वेळ असल्याचे बाबरने सांगितले. ‘‘मी फलंदाज म्हणून संघासाठी योगदान देत राहीन. नवीन कर्णधार, तसेच संघासाठी मी कायम सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करेन. गरज पडल्यास माझा अनुभव संघाच्या कामी येईल असा प्रयत्न करेन. कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे मनापासून आभार,’’ असे बाबर म्हणाला. २०१९ मध्ये मी पाकिस्तानचा कर्णधार झालो आणि या चार वर्षांत मी अनेक चढ-उतार पाहिले. खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनामुळे संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अग्रस्थानी पोहोचू शकला, असेही बाबरने नमूद केले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर ‘पीसीबी’ने बाबर आझमवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव आणला. स्पर्धेदरम्यानच राष्ट्रीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष इंझमाम-उल-हक यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

हेही वाचा – सॅम अल्टमॅन यांच्या हकालपट्टीचे नेमके कारण काय? OpenAIचे नवे अंतरिम CEO इम्मेट शियर कोण आहेत?

पाकिस्तान संघाच्या प्रशासनात व संघ व्यवस्थापनात कोणते बदल करण्यात आले?

पाकिस्तान संघाने सर्वप्रथम मोहम्मद हाफीझला संघ संचालक आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिली. तसेच, इंझमाम-उल-हकच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या निवड समिती अध्यक्षपदी माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझची नियुक्ती करण्यात आली. रियाझने पाकिस्तानकडून २७ कसोटी, ९१ एकदिवसीय व ३६ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. तर, हाफीझनेही पाकिस्तानकडून ५५ कसोटी, २१८ एकदिवसीय व ११९ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. त्यामुळे या दोघांच्या अनुभवाचा चांगला फायदा संघाला होईल अशी अपेक्षा ‘पीसीबी’ला असेल. यासह माजी गोलंदाज उमर गुल व सईद अजमल यांना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाच्या अनुक्रमे वेगवान व फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उमर आणि अजमल ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान होणारी कसोटी मालिका व त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धची १२ ते २१ जानेवारी दरम्यानची ट्वेन्टी-२० मालिका यामध्ये आपली जबाबदारी सांभाळतील. उमर, अजमल व हाफीझ यांच्या निवडीचा अर्थ असा की, मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्नसह विदेशी प्रशिक्षक आता संघासोबत काम करणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्ने मॉर्केलने यापूर्वीच गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता पाकिस्तानचे माजी खेळाडूच महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असल्याने संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. गुलने २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिकाही पार पाडली आहे आणि अजमलने पाकिस्तानकडून खेळताना तिन्ही प्रारूपांत मिळून ४४७ गडी बाद केले आहेत. पाकिस्तानही भारतीय क्रिकेट संघाचा पायंडा पाडत असल्याचे चित्र आहे. भारतीय संघ व्यवस्थापनात सर्व जण भारतीय असून प्रशिक्षक माजी खेळाडू आहेत. त्यामुळे भारताची कामगिरी गेल्या काही वर्षांत उंचावलेली पाहायला मिळाली आहे.

शाहीन शाह आफ्रिदी व शान मसूद यांच्यासमोर कर्णधार म्हणून कोणती आव्हाने?

बाबर आझमने तीन प्रारूपांमधील कर्णधारपद सोडल्याने ‘पीसीबी’ने नवे कर्णधार नियुक्त केले. शाहीन शाह आफ्रिदीला ट्वेन्टी-२० संघाचे तर शान मसूदला कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मात्र, एकदिवसीय संघाच्या कर्णधाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या निर्णयानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. कसोटीची जबाबदारी देण्यात आलेल्या मसूदने एक दशकापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, अजूनपर्यंत त्याला संघात आपले स्थान भक्कम करता आलेले नाही. त्याला दोन-तीन कसोटी सामन्यानंतर बाहेर केले जात होते. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर मसूदसमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे पहिले आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका आहे. यामध्ये आफ्रिदीच्या नेतृत्वाचा कस लागेल. जून २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानला त्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करण्याची संधी असेल. आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्स संघासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : पुन्हा मंजूर केलेले विधेयक राज्यपालांना रोखता येते का?

पाकिस्तान क्रिकेटची सध्याची स्थिती काय आहे?

‘पीसीबी’ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच चर्चेत असतात. श्रीलंका व पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्यात श्रीलंकन संघ अडचणीत सापडला होता. यानंतर कोणताही संघ पाकिस्तानला जाऊन क्रिकेट खेळत नव्हता. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघही ‘आयसीसी’ स्पर्धा सोडल्यास पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाही. त्यामुळे पाकिस्तानला काही वर्षे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आपले घरचे सामने खेळावे लागले. दरम्यान, ‘पीसीबी’चे घरच्या मैदानांवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्याचे प्रयत्न सुरू होते. वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तानला खेळण्यास गेला. यानंतर २०१९ मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तानात गेला. यानंतर इंग्लंड संघानेही पाकिस्तानचा दौरा केला. तसेच, आशिया चषकाचे यजमानपद असूनही भारत पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार नव्हता. त्यामुळे स्पर्धेतील काहीच सामने पाकिस्तानमध्ये झाले. ‘पीसीबी’मध्ये अंतर्गत वादही नेहमीच चव्हाट्यावर येत असतात. नजम सेठी व सध्याचे अध्यक्ष झाका अश्रफ यांची व्यक्तव्येही चर्चेत असतात. पाकिस्तानला सर्वाधिक फटका आंतरराष्ट्रीय संघ त्यांच्या देशात न खेळल्याने बसतो आहे. तसेच, स्थानिक क्रिकेटमध्ये सुविधांच्या अभावाचा फटकाही संघाला बसत आहे. पाकिस्तान सुपर लीगलाही चाहत्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मजल मारायची झाल्यास स्थानिक क्रिकेट आणखी भक्कम करण्याची गरज आहे. यासह ‘बीसीसीआय’प्रमाणे ‘पीसीबी’नेही आर्थिकदृष्ट्या स्वत:ला अधिक सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे.