काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा सुरू आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने समन्वयासाठी १४ चमू स्थापन केले आहेत. बिहारमध्ये तिसरा पर्याय स्थापन करण्याच्या प्रयत्नात असलेले रणनीतीकार प्रशांत किशोर राज्यभर झंझावाती दौरे करत आहेत. या घडामोडी पाहता बिहारमध्ये विधानसभेला तिरंगी सामना होईल हे स्पष्ट झाले.

दोन दशके नितीशबाबूंचे राज्य

बिहारमध्ये मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून वादंग सुरू असतानाच राजकीय पक्षांमध्ये आरोपांची राळ सुरूच आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहेत. ही यात्रा १६ दिवस चालेल. आयोगानेही आपली बाजू पत्रकार परिषदेत मांडली. एकूणच बिहारचा मुद्दा देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. नोव्हेंबरअखेर राज्यात विधानसभा निवडणूक होईल. संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार गेली दोन दशके मुख्यमंत्रीपदी आहेत. मात्र आता ७४ वर्षीय नितीशबाबूंच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तरीही आजच्या घडीला बिहारच्या राजकारणात त्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. दारूबंदीमुळे महिला मतदार किंवा अतिमागास मतदारांचा विश्वास त्यांच्यावर आहे. त्यामुळे जिकडे नितीशबाबू तिकडे यश हे समीकरण दोन दशके टिकून आहे. ते कधी भाजपकडे तर कधी राष्ट्रीय जनता दलाच्या बाजूला गेले, तरी मतदार नितीशबाबूंच्या मागे कायम आहे. मात्र आता राजकीय समीकरणे बदलत असून, वीस वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिल्याने काही प्रमाणात त्यांच्याबाबत नाराजी आहे. यामुळे भाजप यंदा सावध आहे. नाराजीचा फटका बसू नये म्हणून रणनीती आखली जातेय.

‘रालोआ’च्या समन्वय बैठका

बिहारमधील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघात समन्वय बैठका घेण्याचा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीने घेतला. पहिल्या दोन टप्प्यांत ८४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी १४ चमू स्थापन करण्यात आले असून, सात पथकांचे नेतृत्व संयुक्त जनता दलाकडे आहे. यामध्ये भाजप, चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष, जितन राम मांझी यांची हिंदुस्थान अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) तसेच उपेंद्र कुशवा यांचा राष्ट्रीय लोकमंच हे रालोआतील पक्ष समाविष्ट आहेत. दोन दिवस ८४ मतदारसंघांत संयुक्तपणे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. त्यांच्याकडून मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नितीश कुमार यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करणे ही घोषणा देण्यात आली. विरोधकांमध्ये दुही असताना अशा बैठका राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील एकजूट दाखवून देते असे जनता दलाचे प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री चिराग पासवान आघाडीत राहणार काय, हे जागावाटपानंतर स्पष्ट होईल असे वाटते. हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल.

तेजस्वी यांच्याकडून मोर्चेबांधणी

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या गेल्या वेळी मुख्यमंत्रीपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. या वेळी ते सावध असून, विरोधकांच्या आघाडीत समन्वय राहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. आताही राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकार यात्रेच्या उद्घाटनाला वाहनाचे सारथ्य तेजस्वी यांनी करत काँग्रेसबरोबर सौहार्द कायम राहील याची खबरदारी घेतली. गेल्या वेळी काँग्रेसला जागावाटपात ७० पेक्षा जास्त जागा देण्यात आल्या. मात्र काँग्रेसला वीस जागाही जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे यंदा ५८ ते ६० जागाच दिल्या जातील असे चित्र आहे. राज्यात काँग्रेसकडे जनाधार असलेला मोठा नाही. आता राहुल यांच्या यात्रेला सुरुवातीला उत्तम प्रतिसाद मिळाला. तेजस्वी यांनी प्रचारात रोजगाराच्या मुद्द्यावर भर दिला आहे. मुस्लीम-यादव ही राष्ट्रीय जनता दलाची हुकमी मतपेढी मानली जाते. हे दोन्ही समुदाय मिळून तीस टक्क्यांच्या आसपास आहेत. मात्र यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी तसेच किशोर यांचा जनसुराज किती फूट पाडणार त्यावर निकाल अवलंबून आहे.

किशोर यांचा मुद्दा भावणारा

राजकीय रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी राज्यातून नागरिकांचे स्थलांतर रोखणे महत्त्वाचे असल्याची घोषणा करत बिहारच्या राजकारणाला कलाटणी दिली. राज्यात राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्त्वातील ‘इंडिया ’आघाडी तसेच भाजपच्या पुढाकारातून वाटचाल करणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यात सामना होईल असे चित्र असताना जनसुराजच्या प्रशांत किशोर यांना दिवसेंदिवस प्रतिसाद लाभत आहे. स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणे तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना २०२५ पासून प्रतिमाह दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन यातून पाठिंबा लाभत आहे. गेली चार दशके कधी राजद तर कधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेत आहे. यातून आता नागरिकांना वेगळा पर्याय गरजेचा वाटत असल्याचे अनेक सर्वेक्षणांतून दिसते. प्रशांत किशोर यांची लोकप्रियता दहा ते बारा टक्क्यांच्या आसपास असल्याचे यातून दिसते. उत्तरोत्तर ही वाढत आहे. आता किशोर कोणाची मते घेणार हा कळीचा मुद्दा आहे. तिरंगी-चौरंगी लढतीत जर पंधरा टक्क्यांच्या पुढे मते मिळाली तर विधानसभेत यश मिळू शकते. या निकषावर प्रशांत किशोर यांचा पक्ष किती जागा जिंकणार यावर राष्ट्रीय जनता दल तसेच भाजपचे भवितव्य ठरेल.

तेजप्रताप यांची टीका

अपक्ष आमदार व तेजस्वी यांचे ज्येष्ठ बंधू तेज प्रताप यादव यांनी भावाला आजूबाजूच्या जयचंदांपासून सावध रहाण्याचा सल्ला समाजमाध्यमाद्वारे दिला. व्होटर अधिकार यात्रेत औरंगाबाद येथे राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार व पत्रकाराला मारहाण करण्यात आली. हा मुद्दा उपस्थित करत, तेजप्रताप यांनी ही यात्रा लोकशाही वाचविण्यासाठी आहे, की नष्ट करण्यासाठी असा सवाल करत आसपासच्या अपप्रवृत्तींच्या व्यक्तींपासून सावध राहा, वेळ गेलेली नाही अन्यथा निकाल वेगळा लागेल असा इशाराच तेज प्रताप यांनी दिला. एकूणच तेज प्रताप यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबतही उत्सुकता आहे.

राष्ट्रीय राजकारणावर परिणाम

बिहारमध्ये मतदार याद्यांवरून घमासान सुरू आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील हे महत्त्वाचे राज्य मिळवण्यासाठी इंडिया आघाडी तसेच राखण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी इरेला पेटली आहे. बिहार हातातून गेल्यास भाजपसाठी धक्का ठरेल. तर सत्ता मिळाली नाही तर राष्ट्रीय जनता दलाच्या राजकारणावर परिणाम होईल. परिणामी हिंदी पट्ट्यात नवसंजीवनी मिळवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न धुळीस मिळतील. त्यामुळे बिहारचा निकाल राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करणारा ठरणारा आहे.