scorecardresearch

विश्लेषण : नवीन सरकारच्या सुरुवातीलाच मंत्र्यांचा राजीनामा! नितीशकुमार यांच्या कार्यकाळात नित्याची प्रथा?

भाजपशी काडीमोड करून नितीशकुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर हातमिळवणी करीत सरकार स्थापन केले.

विश्लेषण : नवीन सरकारच्या सुरुवातीलाच मंत्र्यांचा राजीनामा! नितीशकुमार यांच्या कार्यकाळात नित्याची प्रथा?
सरकार स्थापन दोन आठवडे होत नाहीत तोच कार्तिककुमार यांना राजीनामा द्यावा लागला

-संतोष प्रधान

नवीन सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री व मंत्र्यांचे कौतुक, स्वागत समारंभ, कार्यकर्त्यांची होणारी गर्दी हे चित्र नेहमी असते. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करून स्थापन होणाऱ्या नवीन सरकारची सुरुवातच मंत्र्यांच्या राजीनाम्याने होते. नितीशकुमार यांच्या कारकिर्दीत ही जणू काही प्रथाच पडली आहे. भाजपशी काडीमोड करून नितीशकुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर हातमिळवणी करीत सरकार स्थापन केले. या नव्या महागठबंधन सरकारमधील विधि व न्यायमंत्री कार्तिककुमार उर्फ कार्तिकेय सिंह यांच्यावर अपरहरणाचा गुन्हा दाखल असून, या प्रकरणी त्यांच्यावर समन्स बजाविण्यात आले आहेत. यामुळेच सरकार स्थापन दोन आठवडे होत नाहीत तोच कार्तिककुमार यांना राजीनामा द्यावा लागला. 

राजीनामा दिलेल्या मंत्र्याच्या विरोधातील प्रकरण काय आहे? 

राष्ट्रीय जनता दलाचे आमदार असलेल्या कार्तिककुमार यांचा नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आणि त्यांच्याकडे विधि व न्याय हे खाते सोपविण्यात आले. २०१४मध्ये अपहरणाच्या प्रकरणात कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयात हजर होण्याचे समन्स बजाविण्यात आले. विधि व न्यायमंत्र्याला अपहरणाच्या प्रकरणात न्यायालयात हजर राहावे लागणार असल्याने नितीशकुमार व तेजस्वी यादव यांच्यावर भाजपने टीका सुरू केली. सरकारची बदनामी नको म्हणून नितीशकुमार यांनी कार्तिककुमार यांच्याकडील विधि व न्याय हे खाते काढून घेतले व त्यांच्याकडे साखर उत्पादन हे खाते सोपविले. पण भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याने शेवटी मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पडले. 

नितीशकुमार आणि मंत्र्यांचे राजीनामे हे समीकरण काय आहे? 

भाजप वा राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करून सरकार स्थापन केल्यावर नितीशकुमार यांना मंत्र्यांवरून टीकेचे धनी व्हावे लागले. यातून मंत्र्याचे राजीनामे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर सातत्याने येत गेली. २००५मध्ये नितीशकुमार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. सरकार स्थापन होताच थोड्याच दिवसांत जितन राम मांझी यांना शिक्षण खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांवरून राजीनामा द्यावा लागला होता. पुढे मांझी हे काही काळ राज्याचे मुख्यमंत्री होते. २०१०मध्ये भाजपचे रामधार सिंह यांच्या विरोधात न्यायालयाने बजाविलेल्या वाॅरन्टवरून त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. २०१७मध्ये नितीशकुमार यांनी लालूंच्या पक्षाशी आघाडी तोडून भाजपशी युती केली. नव्या मंत्रिमंडळातील महिला मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. या महिला मंत्र्याच्या पतीच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. २०२० मध्ये नितीशकुमार – भाजप आघाडीला पुन्हा सत्ता मिळाली. नवीन सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेले मेवालाल चौधरी हे बिहार कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी केलेला घोटाळा समोर आल्याने त्यांना लगेचच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या वेळी कार्तिककुमार यांच्या मंत्रिपदावर संकट आले.

तरीही नितीशकुमार यांची प्रतिमा  चांगली कशी?

नितीशकुमार हे मुख्यमंत्रीपदावर येण्यापूर्वी बिहार व विशेषत: राजधानी पाटण्यातील कायदा आणि सुव्यवस्था फारच चिंताजनक होती. रात्री-अपरात्री एकटे घराबाहेर पडणे अवघड होते. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर प्रथम गुंडगिरीला आळा घातला. कायदा व सुव्यवस्था सुधारली. यामुळे पाटण्यात आजही पूर्वीए‌ढी गंभीर परिस्थिती नाही. लोकांमध्ये नितीशकुमार यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण तयार झाले. या एका कामामुळे नितीशकुमार यांची प्रतिमा चांगली झाली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bihar minister kartik kumar resigns hours after cm nitish kumar changes his portfolio print exp scsg

ताज्या बातम्या