scorecardresearch

Premium

विश्लेषण : दक्षिण विजयासाठी भाजपची देवेगौडांशी हातमिळवणी, लोकसभेसाठी किती जागा सोडणार?

कर्नाटकमध्ये २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. दक्षिणेतील हे महत्त्वाचे राज्य हातातून गेले. आता आगामी लोकसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी भाजप घेत आहे.

BJP with Deve Gowda
विश्लेषण : दक्षिण विजयासाठी भाजपची देवेगौडांशी हातमिळवणी, लोकसभेसाठी किती जागा सोडणार? (image – indian express/file photo/loksatta graphics)

कर्नाटकमध्ये २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. दक्षिणेतील हे महत्त्वाचे राज्य हातातून गेले. आता आगामी लोकसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी भाजप घेत आहे. गेल्या वेळी म्हणजे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातून २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. तर अपक्ष, काँग्रेस तसेच धर्मनिरपेक्ष जनता दलाला (जेडीएस) प्रत्येकी एक जागा मिळाली होती. आता विधानसभा निकालानंतर बदलती समीकरणे पाहता भाजपने माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलापुढे मैत्रीचा हात पुढे केला. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने गणेशोत्सवानंतर भाजप-जनता दल आघाडीवर शिक्कामोर्तब होईल. दोन्ही पक्षांसाठी ही आघाडी फायद्याची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कर्नाटकमध्ये ५१ टक्के मते मिळाली. तर काँग्रेसला ३१ टक्के व जनता दलाला साडेनऊ टक्के मते होती. विरोधकांच्या इंडिया आघाडीचे आव्हान पाहता भाजप राज्यात आघाडी करण्यास तयार आहे.

म्हैसूर भागात लाभ

जुना म्हैसूर भाग हे जनता दलाचे प्रभावक्षेत्र, मात्र विधानसभेला येथील ५२ पैकी ३८ जागा काँग्रेसने जिंकल्या. राज्यात १३ टक्के असलेल्या वोक्कलिगा समुदाय येथे मोठ्या संख्येने आहे. ही जनता दलाची मतपेढी. देवेगौडा हे वोक्कलिगा आहेत. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने व भाजपलाही गरज असल्याने आघाडीसाठी दोन्ही पक्षांनी तयारी दर्शवली. आता भाजप किती जागा सोडणार हा मुद्दा आहे. गेल्या लोकसभेला काँग्रेस-जनता दल यांची आघाडी होती. मात्र दोन्ही पक्षांची मते एकमेकांना मिळाली नाहीत. आता ती काळजी भाजप-जनता दलाला घ्यावी लागणार आहे. जनता दलातून काही माजी आमदारांनी भाजपशी आघाडीबाबत नाराजीचा सूर लावला आहे. काँग्रेसचे प्रभाव क्षेत्र असलेला कनकपुरा तसेच चिकबल्लारपूर, म्हैसूर, मंड्या आणि तुमकुर जिल्ह्यात भाजप-जनता दलाची कसोटी आहे. उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे या भागातील प्रभावी नेते आहेत. तेही वोक्कलिगा समुदायातून येतात. काँग्रेसने यंदा राज्यातून लोकसभेला २० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ही भेट असेल हा विश्वास राज्यातील काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. या भागातील आठ जागांवर जनता दलाचा प्रभाव आहे. गणेशोत्सवानंतर जनता दलाचे नेते व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे दिल्लीत आघाडीला अंतिम स्वरूप देतील अशी अपेक्षा आहे.

yogi adityanath akhilesh yadav
Rajya Sabha Election : अखिलेश यादवांना धक्का, उत्तर प्रदेशात सपा आमदारांची मतं भाजपाला; पाहा निवडणुकीचा निकाल
Announcement of seat distribution by Congress AAP parties in Delhi Gujarat Haryana
काँग्रेस-आपचे ठरले! दिल्ली, गुजरात, हरियाणात दोन्ही पक्षांकडून जागावाटपाची घोषणा
sonia gandhi rajya sabha
सोनिया गांधींकडून राज्यसभा लढण्याचा निर्णय; रायबरेली मतदारसंघातून प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार?
gadchiroli bjp marathi news, bjp leaders, lok sabha ticket
गडचिरोली लोकसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये अंतर्गत कुरघोड्या; आमदारांपाठोपाठ माजी मंत्र्याच्या भावाचाही दावा

हेही वाचा – देशातील १८,७३५ न्यायालयातील प्रकरणांची माहिती एका क्लिकवर; एनजेडीजी पोर्टल कसे काम करते?

मतांचे ध्रुवीकरण

राज्यातील १५ ते १६ टक्के मुस्लीम मते विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मागे एकवटली, त्यामुळे भाजपचा पराभव झाल्याचे पक्षाचे विश्लेषण आहे. जनता दलाशी आघाडी केल्याने १४ टक्के लिंगायत तसेच १३ टक्के वोक्कलिगा मते ही भाजप-जनता दल युतीच्या पारड्यात पडतील असे गणित आहे. लिंगायत समाज गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपच्या मागे उभा राहिला आहे. अर्थात विधानसभेत काँग्रेसने मोठ्या प्रमाणात लिंगायत मते मिळवली होती. मुस्लीम मतदार लोकसभेला काँग्रेसच्या बाजूने गेल्यास त्याला तोंड देण्यासाठी लिंगायत-वोक्कलिगा अशी आघाडी प्रबळ ठरेल अशी रणनीती भाजपकडून आखली जात आहे. याखेरीज जवळपास २० टक्के दलित मतदार आहेत. यामध्ये काँग्रेसला अधिक पाठिंबा आहे. त्यातच नुकतीच राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. महिलांसाठी मोफत बस प्रवास, वीज सवलत अशा विविध योजना सरकारने राबवल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला शह देण्यासाठी जाती-समुदायांच्या मतांची समीकरणे जुळवली जात आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील अन्य घटक पक्ष कर्नाटकमध्ये फारसे प्रभावी नाहीत. स्वयंसेवी संस्थांवर काँग्रेसची मदार आहे. विधानसभेला यातील काही छोट्या संघटनांनी काँग्रेस पक्षाला मदत केली होती. राज्यात लोकसभेला दोन्ही बाजू आपली मतपेढी राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा – विश्लेषण : ‘हवामान आणीबाणी’चा सामना कसा करणार? 

दक्षिणेतील जागांचे गणित

जनता दलाचे राज्यात १९ आमदार आहेत. हिंदुत्ववादी अशा भाजपशी युती केल्यास आपल्या मतदारसंघात काय होईल, असा प्रश्न जनता दलाच्या काही आमदारांना आहे. भाजपशी आघाडीबाबत आमदारांमध्ये नाराजी नसल्याचे स्पष्टीकरण जनता दलाने दिले आहे. जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले आहे. दोन्ही पक्षात जागावाटपाची प्रतीक्षा असून, जनता दलाला जागा किती सोडणार, याबाबत खल सुरू आहे. भाजपला दक्षिणेत लोकसभेत कर्नाटक तसेच तेलंगणामध्येच मोठी आशा आहे. तेलंगणामध्ये १७ जागा आहेत. सध्या भाजपचे तेथे चार खासदार आहेत. तमिळनाडूत सनातनवरून झालेल्या वादानंतर एक-दोन जागा पदरात पडतील असे आडाखे बांधले जात आहेत. येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अण्णा द्रमुक हा द्रमुकचा प्रमुख विरोधक आहे. अण्णा द्रमुकची मते भाजपकडे कितपत वळणार त्यावर भाजपचे यश अवलंबून आहे. तामिळनाडूतील ३९ जागा आहेत. केरळ तसेच आंध्र प्रदेशात खाते उघडण्याबाबतही भाजप साशंक आहे. दक्षिणेत लोकसभेच्या १३० जागा आहेत. सध्या भाजपकडे दक्षिणेत २९ खासदार आहेत. आता किमान ६० जागा लढत देण्याच्या दृष्टीने भाजपने निश्चित केल्या आहेत. केरळमध्ये २० पैकी १ ते २ जागी भाजप लढत देईल अशी स्थिती आहे. अन्यथा तेथे काँग्रेस तसेच डावी आघाडी असा थेट सामना आहे. तर आंध्रमध्ये २५ जागांपैकी भाजपला फारशी आशा नाही. त्यामुळे कर्नाटकवर लक्ष केंद्रित करून जनता दलाशी आघाडीतून गेल्या वेळच्या २५ जागांमध्ये फार नुकसान होणार नाही अशी भाजपची रणनीती आहे. त्यामुळे देवेगौडांच्या पक्षाला काही जिंकलेल्या जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp join hands with deve gowda to win loksabha seats in south print exp ssb

First published on: 16-09-2023 at 08:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×