हृषिकेश देशपांडे

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत आहे. काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेली २६ पक्षांची आघाडी, विरोधात भाजपची ३८ पक्षांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी असा सामना होईल. विरोधकांनी बंगळूरुत तर रालोआने नवी दिल्लीत मंथन केले. या साऱ्यांत दोन्ही आघाड्यांच्या बाहेर असलेल्या पक्षांचे काय? आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, ओडिशातील बिजु जनता दल तसेच तेलंगणमध्ये सत्तेत असलेली भारत राष्ट्र समिती हे दोन्ही आघाड्यांपासून अंतर ठेवून आहेत. याव्यतिरिक्तही तेलुगु देसम, अकाली दल, बहुजन समाज पक्ष हे पक्ष कोणत्याच गटात नाहीत. अर्थात भविष्यात हे वेगळा निर्णय घेऊ शकतात. मात्र तीन राज्यांत सत्तेत असलेले जगनमोहन, चंद्रशेखर राव किंवा नवीन पटनायक यांच्यापैकी राव हे डिसेंबरमध्ये तेलंगण विधानसभा निवडणूक निकालानंतर आपली दिशा ठरवतील. राज्यात काँग्रेस तसेच भाजपशी त्यांचा सामना आहे.

ताकद किती?

लोकसभेत वायएसआर काँग्रेसचे २२, बिजू जनता दलाचे १२ तर भारत राष्ट्र समितीचे ९ खासदार आहेत. आजच्या घडीला आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस विरोधात तेलगु देसम अशी लढत आहे. सध्याच्या स्थितीत चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष फारसा प्रभावी नाही. त्यामुळे आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी सध्याचे २२ चे संख्याबळ राखण्यात जगनमोहन यांच्या पक्षाला अडचण नाही. येथे भाजप किंवा काँग्रेस दोन्ही राष्ट्रीय पक्षांची ताकद नाही. चंद्राबाबू भाजपशी आघाडीच्या प्रयत्नात आहेत. मात्र त्याचा निकालावर फारसा परिणाम होईल अशी शक्यता नाही. तेलंगणमध्ये विधानसभा निकालावर लोकसभेत कोण किती जागा जिंकणार हे स्पष्ट होईल. कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसने राज्यात उभारी घेतली आहे. अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने चित्र बदलतेय. तर भाजपने गंगा किशन रेड्डी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली. रेड्डी हे जुने कार्यकर्ते आहेत. तेलंगणमध्ये विधानसभेच्या दृष्टीने आज तरी सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समिती एक पाऊल पुढे आहे. ओडिशात बिजू पटनाईक यांना पर्याय नाही. त्यामुळे दोन्ही आघाड्यांच्या बाहेर असलेल्या या तीन पक्षांची भूमिका निर्णायक ठरेल. दिल्लीत ज्याची सत्ता त्यालाच हे अनुकूल राहतील असा हिशेब आहे. सध्या लोकसभेत या तीन पक्षांचे ४३ खासदार आहेत.

मायावतींकडून स्वबळाची घोषणा

बहुजन समाज पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात ८० जागा सत्तेच्या समीकरणात महत्त्वाच्या आहेत. भाजप व समाजवादी पक्ष यांच्यात येथे सामना आहे. भाजपने राजभर यांना आघाडीत घेतले असून, जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. विरोधकांच्या आघाडीत जर काँग्रेस सहभागी झाले तर समाजवादी पक्ष व जयंत चौधरी यांच्या लोक दलाला काही जागा सोडाव्या लागतील. भाजपशी एकास एक लढत देण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरते. गेल्या म्हणजे २२ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला ६२ तर समाजवादी पक्ष-बसप-लोकदल यांना १५ जागा मिळाल्या होत्या. तर रायबरेलीतून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना यश मिळाले. गेल्या वेळी भाजपने राज्यातील ८० पैकी ४० जागा या ५० टक्क्यांहून अधिक मतांनी जिंकल्या होत्या हे विशेष. यंदाही सत्ता राखायची असेल तर उत्तर प्रदेशात मित्र पक्षांसह ७० जागा जिंकाव्या लागतील. भाजप विरोधक यावेळी त्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी २००४ च्या राजकीय स्थितीचा दाखला देत आहे. २००४ मध्ये भाजपला उत्तर प्रदेशात केवळ ११ जागा जिंकता आल्या होत्या.

Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड; संपूर्ण प्रकरण काय आहे?

अकाली दलाशी आघाडी कठीण

पंजाबमधील अकाली दल हा भाजपला सर्वात जुना मित्र. कृषी कायद्यांच्या विरोधात तो दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला. राज्यात लोकसभेच्या १३ जागा आहेत. गेल्या वेळी भाजपला दोन तर अकाली दलाला लोकसभेत २ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ८ तर आम आदमी पक्षाला एका ठिकाणी विजय मिळाला. राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. आम आदमी पक्षाचे सरकार आहे. काँग्रेस प्रमुखविरोधी पक्ष आहे. एकास एक लढत द्यायची झाल्यास काँग्रेस किंवा आप एकमेकांना किती जागा सोडणार ही उत्सुकता आहे. भाजपही बदलत्या स्थितीत अकाली दलाशी जुळवून घेण्यास फारसे उत्सुक नाही. एक तर अकाली दलाची सध्या बसपशी युती आहे. तसेच त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यांचा बराचसा मतदार आपकडे वळला आहे. अशा वेळी अकाली दलाशी युतीत तीन ते पाच जागा घेण्यापेक्षा, अकाली दलातील एक फुटीर गट भाजपने हाताशी धरला आहे. त्यांना एक-दोन जागा देऊन उर्वरित जागा भाजपला लढता येतील. पक्षाच्या नेत्यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे अकाली दल-भाजप आघाडी कठीण वाटत आहे.

विरोधकांपुढे आव्हान

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २२४ जागा ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवत जिंकल्या आहेत. त्यामुळे विरोधकांपुढे आव्हान आहे. उत्तर तसेच पश्चिमेकडील राज्यांमध्ये भाजपचे यश केंद्रित असून, दक्षिणेत त्यांचा प्रभाव नाही. प्रामुख्याने महाराष्ट्र तसेच बिहारमध्ये विरोधकांची ताकद वाढली आहे. महाराष्ट्रात शिवसेना असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, फुटीमुळे खरी ताकद कोणत्या गटाची हे निकालानंतरच कळेल. बिहारमधील ४० जागा भाजपसाठी आव्हानात्मक आहेत. येथे नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, तसेच राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व डावे पक्ष यांची आघाडी भक्कम आहे. त्यामुळे विरोधात सामाजिक समीकरणे जुळवण्यासाठी भाजपने उपेंद्र कुशवाह, जितनराम मांझी यांना बरोबर घेतले आहे. त्या आधारे विरोधी आघाडीवर मात करणे शक्य होणार आहे.

भाजपच्या आघाडीत जरी ३८पक्ष असले तरी, त्यातील नऊ पक्षांनी गेली लोकसभा निवडणूक लढलेली नाही. तर १६ पक्षांना एकही जागा मिळाली नाही. तर सात पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपच्या सर्वाधिक ३०१ जागा आहेत. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे १३ तर लोकजनशक्ती पक्षाचे दोन्ही गट मिळून ६ अपना दल २ असे बलाबल आहे. आता दोन्ही आघाड्यांबाहेरील प्रमुख पक्ष वातावरण पाहून आगामी काळात भूमिका ठरवतील असे चित्र आहे.