Blood Paintings Trending: तामिळनाडूमध्ये मागील काही काळात रक्ताने साकारलेल्या चित्रांच्या विक्रीत एवढी वाढ झाली आहे की आता सुरक्षेच्या कारणात्सव सरकारने या चित्रांवर बॅन लावला आहे. चेन्नईच्या २० वर्षीय गणेशन याने आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला तिला स्वतःच्या रक्ताने तिचे चित्र काढून गिफ्ट केले. यासाठी जेव्हा गणेशन चेन्नईच्या एका स्टुडिओमध्ये पोहोचला तेव्हा A4 चित्रासाठी त्याला ५ मिली रक्त द्यावे लागले. असे गिफ्ट देणारा गणेशन हा एकमेव नसून तामिळनाडूमध्ये मागील काही काळात अशा चित्रांची भरपूर विक्री होत असल्याचे समजत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लड आर्टविरुद्ध सरकारची कारवाई

२८ डिसेंबर २०२२ ला तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एमए सुब्रमण्यम हे अचानक चेन्नई येथील एका स्टुडियोमध्ये पोहोचले तेव्हा तिथे रक्ताच्या बाटल्या आणि सुया बघून सुब्रमण्यम हादरलेच. याच वेळी त्यांनी रक्ताचे चित्र काढण्याच्या स्टुडिओवर बॅन लावण्याची घोषणा केली. जर यापुढे कोणत्याही संस्थेत किंवा स्टुडिओमध्ये अशा प्रकारे रक्ताची चित्र काढली गेली तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही सुब्रमण्यम यांनी सांगितले. पुढे ते म्हणतात की “रक्तदान हे पुण्याचे काम आहे, अशा चित्रांसाठी रक्त वाया घालवणे हे निष्फळ आहे आणि त्यासाठी कधीच परवानगी दिली जाणार नाही. तुम्हाला प्रेम दाखवायचे असेल तर त्याचे अनेक मार्ग आहेत.”

तपासाच्या दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार ज्या स्टुडिओमध्ये अशा प्रकारे रक्ताची चित्रे काढली जात होती तिथे सुरक्षेची काहीच काळजी घेतलेली नव्हती. कोणत्याही सुया कोणालाही टोचल्याने संसर्ग तसेच HIV सारखे आजार पसरण्याचा सुद्धा धोका असतो. आरोग्य तज्ज्ञ एम.वेंकटाचलम यांच्या माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये हा ट्रेंड प्रचंड झपाट्याने वाढत आहे. मात्र कोणत्याही सामान्य व्यक्तीस स्वतःचे किंवा इतरांचे रक्त काढण्याची परवानगी नाही. यासाठी केवळ फ्लेबोटोमिस्ट, परवाना असणाऱ्या नर्स व लॅब टेक्नीशियन यांनाच अनुमती देण्यात आली आहे.

रक्ताचे चित्र रेखाटणारी संस्था

दरम्यान, दिल्लीमध्ये शहीद स्मृति चेतना समिती नामक एका संस्थेत अशा प्रकारे रक्तापासून देशभक्तांची चित्र रेखाटली जातात. निवृत्त मुख्याध्यापक रवि चंद्र गुप्ता यांनी या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या अंतर्गत आजपर्यंत २५० चित्रे बनवण्यात आली आहेत.

रक्ताच्या चित्रासाठी ८० कोटी

समाजशास्त्र अभ्यासक संजय श्रीवास्तव यांनी सांगितले होते की, रक्त देणे हे माणसाच्या इमानदारीचे प्रतीक मानले जाते. तसेच महिलांच्या मासिक पाळीविषयी जागृती करण्यासाठीही या रक्ताच्या पेंटिंग्स फार क्रांतिकारी आहेत. याचे उदाहरण द्यायचे तर २००४ मध्ये एका कराटे प्रशिक्षकाने जयललिता यांचे रक्ताचे चित्र रेखाटले होते यानंतर खुश होऊन जयललिता यांनी त्या व्यक्तीस ८० कोटी रुपयांचे बक्षीस दिले होते.

संघर्षासाठी रक्ताची पत्रे

दरम्यान, यापूर्वी १९८० मध्ये आसाम येथील एका आंदोलनातही अशा रक्ताच्या चित्रांचा ट्रेंड गाजला होता. आसाममधील तेल दुसऱ्या राज्यात जाऊ नये यासाठी लोकांनी रक्ताने लिहिलेल्या घोषणांचे फलक झळकावले होते. २२ वर्षाच्या एका तरुणाने या आंदोलनात रस्त्यावर आपल्या रक्ताने लिहिले होते की, “आम्ही रक्त देऊ, तेल नाही” हेच वाक्य पुढे या आंदोलनाचे ब्रीदवाक्य ठरले होते. १८१४ मध्येही लाला हुकूम चंद यांनी आपल्या रक्ताने दिल्लीच्या मुघल सम्राटाला पत्र लिहिले होते.

हे ही वाचा<< विश्लेषण: थंडीत गिझर वापरताना केलेली चूक जीवावर बेतू शकते; गिझरचे स्थान कुठे असावे? वापर कसा करावा?

आजवर अनेकदा रक्त व रक्ताची पत्र, चित्र चर्चेचा मुद्दा ठरली आहे, संघर्ष ते प्रेम अनेक पैलू असलेल्या या चित्रांना आता आरोग्याच्या कारणाने पूर्णतः बंदी लावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood painting why is its craze increasing tamil nadu blood art ban reason explained svs
First published on: 09-01-2023 at 15:24 IST