Breast Cancer Rates increasing Indian women : ‘कर्करोग’ असे नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. गेल्या काही वर्षांत देशात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. चिंताजनक बाब म्हणजे यामध्ये तरुण-तरुणींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. गावखेड्यात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे कर्करोगाचे निदान अंतिम टप्प्यात असल्याने मृत्युदराचा धोकाही वाढतो. तरुणींमध्ये स्तनांचा कर्करोग हा दिवसेंदिवस वाढत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये तरुणींमधील कर्करोगाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहे. नेमकी काय आहेत त्यामागची कारणे? आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात? त्या संदर्भातील हा आढावा…
तरुणींमध्ये कर्करोगाचा धोका का वाढतोय?
एकेकाळी प्रामुख्याने वयस्क महिलांना होणारा स्तनांचा कर्करोग आता तरुणींमध्येही झपाट्याने वाढत आहे. हा आजार केवळ कमी वयातच होत नसून तो पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक स्वरूपात जडत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी ‘न्यूज १८’ला सांगितले. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, वाढता ताण, अनुवांशिक प्रवृत्ती आणि पर्यावरणातील घटक त्याला जबाबदार असल्याचे ते म्हणाले. स्तनांच्या कर्करोगाने आपले स्वरूप बदलल्याने या आजाराबद्दल जागरूकता आणि वेळेवर तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले.
स्तनांच्या कर्करोगाविषयी आरोग्यतज्ज्ञांचे मत काय?
‘पीपल ट्री हॉस्पिटल्स’ आणि ‘मार्गा माइंड केअर’च्या संस्थापक डॉ. ज्योती नीरजा ‘न्यूज १८’ला सांगतात, “सध्या आम्ही एक अस्वस्थ करणारा ट्रेंड पाहतो आहे. स्तनांचा कर्करोग आता केवळ वृद्ध महिलांचा आजार राहिलेला नाही. २० ते ४० वयोगटातील तरुणींनादेखील त्याची लागण होत आहे. या कर्करोगाचा वाढीचा दर पूर्वीपेक्षा खूपच वेगवान असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. या बदलामागे अनेक कारणे असून ती एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. जीवनशैलीतील बदलांमुळे कर्करोगाची लागण होत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे.”
आणखी वाचा : Russia-Pakistan Deals : मित्र देशामुळेच भारताची कोंडी? पाकिस्तानला मदत कोण करतंय? काँग्रेसचा आरोप काय?
स्तनांचा कर्करोग का झपाट्याने वाढतोय?
स्तनांचा कर्करोग वाढण्याची डॉक्टरांनी काही कारणेही सांगितली आहेत. उशिरा झालेले लग्न आणि प्रसूती, स्तनपानाचे कमी प्रमाण, एकाच जागी बसून काम करण्याची सवय आणि लठ्ठपणाचे वाढते प्रमाण या गोष्टींमुळे स्तनांचा कर्करोग वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय ताणतणाव, अनियमित झोप, चरबीयुक्त आहार, दारू व धूम्रपानाचे वाढते प्रमाण आणि शरीरातील संप्रेरकाचे (Hormonal) असंतुलन हेदेखील या आजाराला कारणीभूत मानले जात आहे. या सर्व बाबींसह कॅन्सरबाबतची कमी जागरूकता आणि उशिराने होणारे निदान या कारणांमुळे त्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे डॉ. नीरजा यांनी न्यूज १८ ला सांगितले. मानेसर येथील फोर्टिस रुग्णालयाच्या ‘सर्जिकल ऑन्कॉलॉजी’ तज्ज्ञ डॉक्टर मानसी चौहान यांनी तरुणींमधील स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
स्तनांचा कर्करोगाचे निदान उशिराने का होते?
“आम्ही सध्या २० आणि ३० वर्षे वयोगटातील महिलांमध्येही स्तनांचा कर्करोग पाहत आहोत. दहा वर्षांपूर्वी हे प्रमाण अत्यंत दुर्मीळ होते. आता त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. स्तनांच्या कर्करोगाची बहुतेक प्रकरणे ही ‘ट्रिपल-निगेटिव्ह’ किंवा ‘गरोदरपणाशी संबंधित’प्रकारचे असतात. हे कर्करोग अत्यंत जलद गतीने वाढणारे आणि आक्रमक असतात. तरुणींना सुरुवातीला त्याचा धोका जाणवत नाही, त्यामुळे या कर्करोगाचे निदान उशिराने होते”, असे डॉ. मानसी सांगतात. या धोक्याचा सामना करण्यासाठी त्या काही उपाययोजनाही सुचवतात. नियमित स्तनांच्या गाठीची तपासणी करणे, वयाच्या २५ वर्षांनंतर दरवर्षी क्लिनिकल चाचणी करून घेणे, स्तनाग्रातून स्त्राव किंवा त्वचेवर सुरकुत्या पडणे अशा सूक्ष्म लक्षणांकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. आजाराचे लवकर निदान होणे ही जीव वाचवण्याची गुरुकिल्ली आहे, असे डॉ. मानसी यांनी म्हटले आहे.
स्तनांच्या कर्करोगाचे निदान आणि अनुवांशिक बदल
भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या धोक्यामागे अनुवांशिक आणि उशिराने होणारे निदान कारणीभूत ठरत आहेत. ‘अगिलस डायग्नोस्टिक्स’चे उपाध्यक्ष आणि इंटिग्रेटेड ऑन्कोपेथॉलॉजीचे प्रमुख डॉ. कुणाल शर्मा यांच्या मते, “भारतातील जवळपास २५ टक्के स्तनांच्या कर्करोगाची प्रकरणे आता ४० वर्षांखालील महिलांमध्ये आढळत आहेत. पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत ही संख्या लक्षणीय आहे. ‘BRCA1’ आणि ‘BRCA2’ या जनुकांतील बदल, तसेच पर्यावरणीय घटक आणि जीवनशैलीतील बदल यांसारख्या बाबी स्तनाच्या कर्करोग वाढीला कारणीभूत आहेत. आज निदानाच्या तंत्रज्ञानातही झपाट्याने प्रगती झाली आहे. डिजिटल ब्रेस्ट टोमोसिंथेसिस, अल्ट्रासाउंड तपासणी, आणि जनुकीय चाचण्या यांच्या मदतीने कर्करोगाचा धोका ओळखून योग्य उपचारपद्धती ठरवता येत आहे.”
जागरूकतेतून तरुण महिलांचे सक्षमीकरण
भुवनेश्वर येथील मणिपाल रुग्णालयाचे वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. सचिन शेखर बिस्वाल ‘न्यूज १८’ला सांगतात, “तरुण महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे निदान अनेकदा उशिराने होते. कारण, त्यांना या आजाराचा धोका जाणवत नाही. स्वतःच्या शरीराची माहिती असणे, कौटुंबिक इतिहास जाणून घेणे आणि अनुवांशिक धोक्याची जाणीव ठेवणे हे सर्व आयुष्य वाचवणारे ठरू शकतात. आरोग्याची नियमित तपासणी, शरीराबद्दल जागरूकता आणि स्तनांच्या आरोग्याबद्दल खुले संभाषण यामुळे भीतीचे वातावरण संपवून महिलांना सक्षम बनवता येते.” स्तनाचा कर्करोग कमी वयाच्या महिलांना अधिक प्रमाणात प्रभावित करत असताना डॉक्टरांचा संदेश स्पष्ट आहे. हा आजार झपाट्याने वाढत असला तरी त्यावरील उपाययोजनाही प्रभावी ठरू शकतात. आरोग्याला प्राधान्य देणे, समाजात असलेला गैरसमज मोडून काढणे आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे, यांसारख्या गोष्टीमुळे स्तनाचा कर्करोग वेळीच रोखता येतो, असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे.