Heart Attack and Stress: आपण दुःखी असतो त्यावेळी अनेकदा छातीवर काहीतरी दडपण असल्याचं जाणवतं. आपल्या मनासारखं नाही झालं किंवा प्रेमभंग झाला तर आपण हृदयावर आघात झाला, असं म्हणतो किंवा हार्ट ब्रेक (heartbreak) झालंय, असं सहजच इंग्रजीत बोलून जातो आणि जेव्हा आनंदी असतो, तेव्हाही म्हणतो, “माझ हृदय भरून आलं आहे!” इतकं सगळं असूनही आपण हृदयाला फक्त रक्त पंप करणारं यंत्र समजतो. पण खरं पाहिलं, तर हृदय हे आपल्या भावनांचं प्रतिबिंब आहे. आपल्या आनंद, दुःख, ताण, प्रेम आणि भीतीच्या प्रत्येक लहरीशी ते घट्ट जोडलेलं आहे. म्हणूनच, वैद्यकशास्त्र सांगतं की, मन आणि हृदय हे स्वतंत्र नसून परस्परांवर परिणाम करणारे दोन भाग आहेत. गेल्या काही दशकांतील संशोधनांनी हे निर्विवाद सिद्ध केलं आहे की, मानसिक आरोग्याची प्रत्येक हालचाल मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक थेट आपल्या हृदयावर परिणाम करते.

१. ताण (Stress) आणि हृदयावरचा परिणाम

Journal of the American Heart Association (2019) मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात, दीर्घकाळ मानसिक ताण अनुभवणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका अडीचपट जास्त आढळल्याचे म्हटले आहे. ताणामुळे शरीरात ‘कॉर्टिसोल’ आणि ‘अॅड्रेनालिन’ या हार्मोन्सचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. या बदलांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि दीर्घकाळात हृदयरोगाचा धोका निर्माण होतो. आपण अनेकदा पाहतो अनेकांचा कामातील रस कमी होतो, थकवा जाणवतो, मन उदास राहतं किंवा काहीच करण्याची इच्छा होत नाही. या सगळ्या गोष्टी फक्त मनावरच नाही, तर हृदयावरही परिणाम करतात. अचानक आलेला ताण; जसं की भीती, राग, किंवा अति-उत्साह यामुळे क्षणभरासाठी हृदयातील रक्तप्रवाह कमी होऊ शकतो आणि जर ताण सततच राहिला, तर हृदयाचं कार्य हळूहळू कमकुवत होतं. म्हणूनच मानसिक स्थिती आणि हृदयाचं आरोग्य यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे.

२. नैराश्य (Depression) आणि हृदयविकाराचा धोका

नैराश्यग्रस्त रुग्णांमध्ये मायोकार्डियल इन्फार्क्शन (हृदयविकाराचा झटका) आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. नैराश्यामुळे शरीरातील ‘इन्फ्लमेशन मार्कर्स’ जसे की C-reactive protein (CRP) वाढतात, जे रक्तवाहिन्यांमध्ये दाह निर्माण करून अडथळे निर्माण करतात (संदर्भ: American Journal of Psychiatry (2018)).

मुंबईतील प्रसिद्ध मनसोपचार तज्ज्ञ डाॅ. जान्हवी केदारे यांनी म्हटले आहे की, “उदासपणामुळे तर हृदयरोगाची शक्यता जवळजवळ दुपटीने वाढते. केवळ हृदयरोगाच्या लक्षणांपेक्षा जर जोडीला डिप्रेशन असेल तर जगण्याची गुणवत्ता खूप कमी होते. बायपास सर्जरीच्या आधीपासून असलेले डिप्रेशन पुढचे सहा महिने सुरू राहिले किंवा बायपास सर्जरीनंतर डिप्रेशन काही काळ कायम राहिले तर हृदयरोगानंतर ५-१० वर्षांनंतर मृत्यूची शक्यता वाढते. तसेच डिप्रेशनमुळे पुन्हा पुन्हा हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता वाढते. अंतर्ग्रंथी आणि त्यांच्या कार्यावर डिप्रेशनचा परिणाम होतो, कॉर्टिसोलचे (cortisol) शरीरातील प्रमाण सतत वाढलेले राहते. त्याचा हृदयाच्या आतील स्तरातील पेशींवर वाईट परिणाम होतो आणि रक्तवाहिनीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढते. डिप्रेशनमध्ये रक्तातील प्लेटलेट या पेशी एकत्र होऊन गुठळी होण्याची शक्यता वाढते, तसेच sympathetic nervous systemच्या उत्तेजनेमुळे हृदयाची गती अनियमितपणे (arrhytmias) वाढू शकते आणि हृदयरोगाची शक्यता वाढते. उदासपणामुळे काही जणांमध्ये धूम्रपान वाढते आणि अर्थात ते हृदय रोगाला कारणीभूत ठरते (संदर्भ: हृदयरोग आणि मनाचा काय संबंध असतो?; लोकसत्ता) .

३. चिंता (Anxiety) आणि हृदयाची गती

सतत चिंता किंवा भीती अनुभवणाऱ्या व्यक्तींमध्ये ‘फाइट ऑर फ्लाइट’ प्रतिक्रिया वारंवार सुरू राहते. परिणामी हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाच्या स्नायूंवर ताण येतो. दीर्घकाळात हे बदल कोरोनरी आर्टरी डिसीजचे (CAD) कारण ठरतात (Harvard Medical School) .

मानसशास्त्रात Type A personality च्या प्रवृत्तीचा उल्लेख केलेला आहे. आपण रोजच पाहतो, काही लोकांना प्रत्येक गोष्टीत पुढं राहायचं असतं. ऑफिसमधली स्पर्धा असो, ट्रॅफिकमधला रस्ता असो किंवा छोट्या गोष्टीतही स्वतःला सिद्ध करण्याची धडपड असते. हे लोक नेहमीच धावपळीत असतात. त्यांचा स्वभाव रागीट, आक्रमक, अधीर आणि अनेकदा शत्रुत्वाने भारलेला असतो. अशा लोकांचे वर्णन Type A personality म्हणून केले जाते. या स्वभावाच्या लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण अधिक आढळतं. कारण त्यांच्या शरीरात ताण निर्माण करणारी ‘अॅड्रेनालिन’सारखी रसायनं सतत वाढत राहतात. ही रसायनं हृदयाची गती आणि कार्य नियंत्रित करणाऱ्या ‘vagus nerve’ वर परिणाम करतात. परिणामी रक्तदाब वाढतो, चरबीचं प्रमाण वाढतं आणि शरीर कायम सज्ज असल्याच्या अवस्थेत राहतं. म्हणजेच ताणाचा परिणाम थेट हृदयावर होतो.

याच्या उलट, शांत, नम्र, समजूतदार आणि क्षमाशील स्वभाव असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयरोगाचा धोका तुलनेने कमी असतो. म्हणूनच हृदयरोग झाल्यानंतर रुग्णांच्या उपचारात केवळ औषधं नव्हे, तर राग आणि ताणावर नियंत्रण ठेवणं हा भागही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

४. सामाजिक एकाकीपणा आणि भावनिक आरोग्य

The Lancet Public Health (2020) ने आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे की, जे लोक एकाकी राहतात किंवा सामाजिकदृष्ट्या वेगळे राहतात, त्यांच्यात हृदयरोग आणि अकाली मृत्यूचे प्रमाण अधिक आढळते. सामाजिक संबंधांमुळे ऑक्सिटोसिनसारखे हार्मोन्स वाढतात, जे ताण कमी करून रक्तवाहिन्यांमध्ये लवचिकता निर्माण करतात. संशोधन सांगतं की, मानसिक आजार असलेल्या लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण अधिक असतं. स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डरसारख्या तीव्र मानसिक विकारांमध्ये हे प्रमाण आणखी वाढतं. अशा रुग्णांमध्ये हालचालीचा अभाव, स्थूलपणा, धूम्रपान, आणि काही औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे (जसे की डायबिटीज, कोलेस्टेरॉल वाढणे) हृदयावर ताण येतो.

५. मन शांत आणि हृदय निरोगी ठेवा

योग, ध्यान, प्राणायाम, संगीत, हसणं आणि प्रियजनांबरोबर वेळ घालवणं हे सर्व उपक्रम ताण कमी करतात आणि हृदयाचं कार्य सुधारतात. European Society of Cardiology (ESC) च्या 2022 च्या रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे की, दररोज २० मिनिटांचं ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम हृदयरोगाचा धोका ३०% पर्यंत कमी करू शकतात.

उपाय काय?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, उदासीनता किंवा डिप्रेशन दुर्लक्षित करू नका. योग्य वेळेत मदत घेणं आणि उपचार सुरू करणं गरजेचं आहे. हृदयाचं आरोग्य फक्त आहार आणि व्यायामावर अवलंबून नसून, मनाचं आरोग्य सांभाळणं तितकंच महत्त्वाचं आहे.

  • नियमित व्यायाम आणि संतुलित आहार
  • रागावर नियंत्रण ठेवणं
  • नाती जपणं, मित्रपरिवाराशी संवाद साधणं
  • छंद जोपासणं, निसर्गाशी आणि समाजाशी जोडलेलं राहणं
  • योग, प्राणायाम, ध्यानधारणा
  • या सगळ्या गोष्टी मन शांत ठेवतात आणि हृदय मजबूत करतात.

शेवटी इतकंचं की, मन आणि हृदय यांचा सुसंवाद टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. मन निरोगी ठेवा… म्हणजे हृदयही निरोगी राहील.