अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन (५४) यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. विल्मिंग्टन, डेलावेअर येथे १२ सदस्यीय खंडपीठाने त्यांना बेकायदेशीर अमली पदार्थ वापरत असताना बंदूक खरेदी प्रकरणामध्ये दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांना आता जास्तीत जास्त २५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या मुलावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची आणि तो सिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. मात्र, ते प्रत्यक्षात तुरुंगात जातील की नाही, याबाबत अद्याप खात्रीने काही सांगता येत नाही. हंटर बायडेन यांच्यावर दोन खटले चालू असून त्यातल्या एका खटल्यात ते दोषी ठरवले गेले आहेत. हंटर यांच्यावरील दुसरा आरोप हा वेळेत कर न भरल्याचा आहे. या आरोपावरून त्यांच्यावर कॅलिफोर्नियामध्ये खटला चालू आहे. या खटल्याची सुरुवात सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : न्यूझीलंडच्या नागरिकांचे ऑस्ट्रेलियात स्थलांतर; कारण काय?

हंटर बायडेन यांच्याविरोधात कोणते खटले दाखल झालेले आहेत?

सहा वर्षांपूर्वी, ऑक्टोबर २०१८ मध्ये हंटर बायडेन यांनी ‘कोल्ट कोब्रा थर्टी एट’ नावाची हँडगन खरेदी केली होती. मात्र, शस्त्र खरेदीसाठी आवश्यक असलेला अर्ज भरताना अमली पदार्थाच्या सेवनाबाबत खरी माहिती द्यावी लागते. तेव्हा ते कोकेन या अमली पदार्थांचे सेवन करत असूनही त्यांनी ही माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हंटर हे शस्त्र खरेदी केलेल्या दुकानदाराला खोटी माहिती दिल्याच्या आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याच्या आरोपांमध्ये दोषी सिद्ध झाले आहेत. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, हंटर यांनी मद्य, तंबाखू, बंदूक आणि स्फोटकांसंदर्भातील अर्जावर खोटी माहिती भरली होती. खरेदी करणाऱ्याची पार्श्वभूमी तपासण्यासाठी ही माहिती भरून घेतली जाते.

या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीला वेगळाच घटनाक्रम असल्याची माहिती आहे. ज्या काळात हे प्रकरण घडले, त्या काळात हंटर बायडेनच्या मृत भावाची विधवा पत्नी हॅली बायडेनसोबत हंटर यांचे प्रेमसंबंध होते. तिला ही बंदूक गाडीमध्ये सापडल्यावर तिने ती एका किराणा दुकानासमोरील कचऱ्यात फेकून दिली. हंटर कदाचित स्वत:लाच इजा पोहोचवेल, या भीतीपोटी तिने हे कृत्य केल्याचे दावा केला. “तसे करणे मूर्खपणाचे होते, याची जाणीव मला आता होत असली तरीही तेव्हा मी फार घाबरले होते”, अशी साक्ष तिने दिली आहे.

हंटर यांना बंदूक गायब झाल्याचे लवकरच लक्षात आले. त्यानंतर हॅलीने ती बंदूक आपणच फेकली असल्याची माहिती फोनवर मेसेज करून हंटर यांना दिली होती. त्यावर “तू वेडी आहेस का?” असा प्रतिसाद हंटरने हॅली यांना दिला होता, अशी माहिती एबीसी न्यूजने दिली आहे. त्यानंतर हॅली पुन्हा त्या किराणा मालाच्या दुकानाबाहेरील कचऱ्यामध्ये त्या बंदुकीचा शोध घेण्यासाठी पोहोचली. मात्र, तिला ती बंदूक तिथे सापडली नाही. कचऱ्यातून पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तू गोळा करणाऱ्या एका वृद्ध माणसाला ती बंदूक सापडली होती आणि त्याने ती आपल्या घरी नेली होती. त्यानंतर डेलावेर पोलिसांनी त्या व्यक्तीकडून ती बंदूक जप्त केली.

हेही वाचा : एकेकाळी औरंगजेबाविरोधात विद्रोह करणाऱ्या ‘सतनामी’ लोकांनी पोलीस स्टेशन का पेटवलं?

तीन गुन्ह्यांमध्ये दोषी

हंटर बायडेन यांना तीन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. त्यातील दोन गुन्हे हे बंदुकीसाठी अर्ज करताना भरलेल्या चुकीच्या माहितीबद्दल आहेत. त्याला या अर्जावर खोटी माहिती भरल्याबद्दल आणि परवानाधारक बंदूक विक्रेत्याशी खोटे बोलल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. हंटर यांनी अमली पदार्थांचे सेवन करत असताना ही बंदूक खरेदी केली आहे, हा त्यांच्यावरील तिसरा आरोप होता. फिर्यादी डेरेक हाइन्स यांनी खटल्यादरम्यान सांगितले की, “जेव्हा अर्जदाराने अर्ज भरला, तेव्हा त्याला आपल्याला अमली पदार्थांचे व्यसन असल्याची पूर्ण कल्पना होती. आरोपीने त्या दिवशीच अमली पदार्थांचे सेवन केले होते, हे सिद्ध करण्याची कायद्याने गरज नाही. आपण अमली पदार्थांचे सेवन करतो, याची कल्पना आरोपीला होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता पुढे काय घडणार?

या खटल्यामध्ये दोषी ठरल्यानंतर हंटर बायडेन तुरुंगात जाण्याची शक्यता निर्माण झाली असली तरीही हे कितपत घडेल, याबाबत साशंकता आहेत. कारण हंटर अहिंसक स्वरुपाच्या गुन्ह्यात दोषी सिद्ध झाले असून त्यांनी २०१९ पासून अमली पदार्थांचे सेवन सोडून दिल्याचा दावा केला आहे. न्यायाधीशांनी शिक्षेची तारीख निश्चित केलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे की, ते न्यायाधीशांच्या निर्णयाचा आदर करतात. त्यांनी यापूर्वी आपल्या मुलाला माफ करण्यास नकार दिला होता. दुसऱ्या बाजूला हंटर यांची कायदेशीर टीम या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करण्याचा विचार करीत आहे.