Perfect Murder Case France फ्रान्सच्या दक्षिणेस असलेल्या अल्बी या छोट्या शहरात सेद्रिक ज्युबिलारविरोधातील खुनाच्या खटल्यास दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली. पत्नी डेल्फिनचा खून केल्याचा आरोप ३८ वर्षीय ज्युबिलारवर आहे. २०२० मध्ये कोविड महासाथीच्या काळात ही घटना घडली. परंतु या प्रकरणात पोलिसांना तिचा मृतदेह सापडला नाही; किंवा सांडलेले रक्त, डीएनए किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पण असे असतानाही या खटल्याची चर्चा मात्र जगभर सर्वत्र सुरू आहे. असं काय आहे या खटल्यात की, जगभरात चर्चा व्हावी… जाणून घेऊ

नेमकं काय घडलं?

१६ डिसेंबर २०२० रोजी सेद्रिक ज्युबिलारने त्याची पत्नी डेल्फिन बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. ३८ वर्षीय सेद्रिक हा पेंटर-डेकोरेटर आहे. डेल्फिन नाईट नर्स म्हणून जवळच्या दवाखान्यात काम करत असे. पोलीस व स्थानिकांनी ती बेपत्ता झाल्यानंतर लगेचच शोधमोहीम सुरू केली. अगदी कॅग्नॅक- लेस- माइन्स या गावाजवळील बंद पडलेल्या खाणींच्या खड्ड्यांपर्यंत ही शोधमोहीम राबवण्यात आली. तरीसुद्धा डेल्फिनचा मृतदेह मिळाला नाही.

शोध मोहिमेदरम्यानचे वर्तन संशयास्पद

यानंतरच्या तपासात पोलिसांना असं लक्षात आलं की, सेद्रिक ज्युबिलारच्या नोकरीवर गंडांतर आलं होतं; दोघांमध्ये घटस्फोटाबद्दल चर्चा सुरू होती आणि ऑनलाइन परिचय झालेल्या एका व्यक्तीसोबत डेल्फीनची मैत्री झाली होती. त्या व्यक्तीसोबत तिचे अफेअर सुरू असल्याच्या संशयावरून सेद्रिकने तिला धमकीही दिली होती, असेही एका साक्षीदाराने पोलिसांना सांगितले. पलीकडे सेद्रिक अमली पदार्थांच्या आहारी गेलेला होता. डेल्फिन बेपत्ता झाल्यानंतरच्या शोधमोहीमेत सेद्रिक बिलकुल अस्वस्थ नव्हता. किंबहुना आयुष्यात फारसे काही महत्त्वाचे घडलेले नाही, अशा बेफिकिरीत त्याचे मोबाईलवर गेम्स खेळत बसणे सुरू होते, यामुळे पोलिसांच्या मनातील संशय अधिकच बळावला गेला.

संशय वाढवणारे पुरावे

  • प्राथमिक तपासात काही परिस्थितिजन्य पुरावे पोलिसांहाती आले. २०२१ मध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
  • डेल्फिनचे तुटलेले चष्मे घरात सापडले.
  • त्यांचा सहा वर्षांचा मुलगा म्हणाला की, आई बेपत्ता झाली त्या रात्री आई-वडिलांचे झालेले भांडण त्याने ऐकले होते.
  • तर शेजाऱ्यांनी घरातून किंचाळण्याचे आवाज ऐकल्याचे सांगितले.
  • तुरुंगातील एका कैद्याने आणि सेद्रिकच्या यापूर्वीच्या प्रेयसीनेही पोलिसांना सांगितले की, डेल्फिनला मारल्याची आणि तिचा मृतदेह लपवून ठेवल्याची कबुली त्याने त्यांच्यासमोर दिली होती.
  • मृतदेह पोलिसांहाती लागला नाही आणि त्यामुळे आजही या प्रकरणात ठोस पुराव्यांचा अभाव आहे.
  • असे असतानाही, न्यायाधीशांना परिस्थितिजन्य पुरावे पुरेसे वाटले आणि सेद्रिकवर खटला चालवण्याचा निर्णय झाला.

डेल्फिन कुठे गायब झाली?

या संपूर्ण प्रकरणावर फ्रान्समध्ये गेले दोन वर्षे चर्चा सुरू असून हे सर्वाधिक गाजलेले प्रकरण आहे. इंटरनेट- सोशल मीडियावरही हा खटला ट्रेण्ड क्रमांक एकवर आहे. डेल्फिन कुठे गायब झाली यावर लोक विविध थिअरीज मांडत असून
इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे. “हे म्हणजे जणू चव्हाट्यावर बसून गप्पा मारण्यासारखंच आहे, पण इथे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने लोक चर्चा करत आहेत,” असं गुन्हेगारी मानसशास्त्रावर पुस्तक लिहिणारे मानसोपचारतज्ज्ञ पॅट्रिक अव्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “प्रत्येकजण आपल्याला पटेल अशीच सिद्धांताची मांडणी करताना दिसतो आहे.”

न्यायालयीन प्रक्रिया

  • हा खटला जवळपास एक महिना चालण्याची शक्यता आहे. डझनभर तज्ज्ञ व साठहून अधिक साक्षीदार त्यास हजर राहणार आहेत. पुराव्यांच्या कागदपत्राची संख्याही तब्बल १६ हजार पानांपलीकडे गेली आहे.
  • पोलिसांचे म्हणणे आहे की, डेल्फिनचे एका मित्रासोबत अफेअर होते आणि ती घर सोडून जाण्याच्या बेतात होती आणि हे सहन न झाल्यानेच सेद्रिकने तिचा खून केला.
  • सेद्रिकने मात्र तो निर्दोष असल्याचा दावा करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

लोकांची उत्सुकता

सेद्रिकचे वकील म्हणतात की, या प्रकरणात लोकांची उत्सुकता वाढलेली असणं खूपच स्वाभाविक आहे. “कोविडकाळात बेपत्ता झालेली नर्स, मृतदेह न सापडण्याचे गूढ हे सगळे घटक घटनेविषयीची लोकांची उत्सुकता वाढवणारेच आहेत. पण या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही” असं सेद्रिकचे वकील अलेक्झांद्र मार्टिन यांनी ले मॉंद या स्थानिक वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

सत्य बाहेर यावं

डेल्फिनच्या कुटुंबीयांचे वकील सांगतात, या खटल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. “सत्य बाहेर यावं,” एवढीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या दाम्पत्याची मुलं या खटल्यात सहभागी नाहीत. मोठा मुलगा ११ वर्षांचा असून तो अद्याप प्रचंड तणावाखाली असल्याचं वकिलांनी सांगितलं.

“परफेक्ट क्राइम” शक्य आहे का?

लेखक थिबो द मॉंतिग्यू यांनी ले फिगारो या स्थानिक नियतकालिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, “दररोज भरपूर अमली पदार्थांची नशा करणारा, त्यामुळेच सदोदित डोळे लालसर असणारा आणि स्वतःचेच काही ठिकाणावर नसलेला असा हा माणूस एवढा ‘परफेक्ट क्राइम’ करू शकतो का? पत्नीचा खून करून कोणताही ठसा, पुरावा मागे न ठेवता मृतदेह लपवणे आणि दुसऱ्या दिवशी मुलं खोलीत शांत झोपलेली असताना पोलिसांना कळवणे हे सारे गूढच आहे. तपासाच्या वेळेस तर पोलीस गंभीर होते आणि हा मात्र गेम ऑफ थ्रोन्स खेळत बसला होता. एक तर तो अफलातून गुन्हेगार आहे किंवा मग नशिबवान मूर्ख अथवा निर्दोष तरी…”

आता सारे जण आहेत ते सत्य बाहेर येण्याच्या प्रतिक्षेत!