चीन आणि फिलिपिन्स या दोन देशांमध्ये दक्षिण चीन समुद्रावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त व्हाइटसन रीफजवळ चिनी बोटींनी घुसखोरी केल्याचा फिलिपिन्सचा आरोप आहे. या वादग्रस्त क्षेत्रात चिनी बोटी आणि त्यांच्या तटरक्षक दलाने फिलिपिन्सच्या जहाजांवर पाण्याच्या तोफांचा मारा केला, तसेच जाणूनबुजून फिलिपिन्सच्या एका जहाजाला धडक दिली. चीन आणि फिलिपिन्स या राष्ट्रांमध्ये गेल्या काही वर्षांपासून दक्षिण चीन समुद्रातील सागरी टापूंवरून संघर्ष होत असून नव्या वादामुळे अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.

दक्षिण चीन समुद्रात नेमके काय घडले?

दक्षिण चीन समुद्र आणि या समुद्राच्या आसपास अनेक प्रदेशांवर चीन नेहमीच दावा करतो. त्यामुळे दक्षिण चीन समुद्राजवळील अनेक देशांशी चीनचा संघर्ष होत असतो. फिलिपिन्सबरोबर तर क्षुल्लक कारणांमुळे चीनचा नेहमीच संघर्ष होत असतो. कुरापती काढून चीन या राष्ट्राशी संघर्ष ओढवून घेत आहे. दक्षिण चीन समुद्रातील दुसऱ्या थॉमस शोलजवळ (मत्स्य संचारस्थाने) चीनच्या तटरक्षक दलाने आणि तैनात सागरी मिलिशिया जहाजाने फिलिपिन्सच्या नौकांवर पाण्याच्या तोफांचा मार केला. त्याच्या आदल्याच दिवशी चीनच्या जहाजाने फिलिपिन्सच्या एका बोटीला धडक दिली. चीनच्या तटरक्षक जहाजांनी फिलिपिन्सच्या नौकांवर जलतोफ डागण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी, ताज्या घटनेमुळे एका बोटीच्या इंजिनाचे गंभीर नुकसान झाले आहे. ‘बीआरपी सिएरा माद्रे’ या फिलिपिनी नौदलाच्या जहाजावर तैनात असलेल्या सैनिकांना अन्न आणि पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या बोटी जात होत्या. जलतोफांच्या माऱ्यामुळे इंजिनाचे नुकसान झालेल्या बोटीला पुन्हा बंदरावर आणावे लागले. फिलिपिन्सचे लष्करी प्रमुख दुसऱ्या बोटीवर होते, त्यावरही जलतोफांचा मारा करण्यात आला. फिलिपिन्सच्या विशेष आर्थिक क्षेत्रात असलेल्या प्रवाळावरील आपले सार्वभौम हक्क सांगण्यासाठी १९९९ मध्ये फिलिपिन्स सरकारने ‘बीआरपी सिएरा माद्रे’ या नौदलाच्या जहाजाला दुसऱ्या थॉमस शोलजवळ मुद्दाम तैनात केले आहे.

Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?

दुसऱ्या थॉमस शोलवर दोन्ही देशांचा दावा का?

फिलिपिन्सच्या पलावान प्रांतापासून २०० नॉटिकल मैलांपेक्षा कमी अंतरावर दुसरे थॉमस शोल आहे. या प्रदेशावर नाकेबंदी करण्याचा प्रयत्न चीनने वारंवार केला. त्यामुळे उभय देशांमध्ये या प्रदेशावरून नेहमीच संघर्ष होत आहे. या वादग्रस्त प्रवाळावर अनेक देशांनी दावा केला असला तरी सध्या फिलिपिन्सच्या नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर कब्जा केला आहे. हा प्रवाळयुक्त प्रदेश आमच्याच देशाचा भाग आहे, असा फिलिपिन्स सरकार दावा करते. मात्र त्यांना भीती आहे की, चीन या प्रदेशाचा ताबा घेण्याचा आणि तिथे त्यांचे सैनिक तैनात करण्याचा कट रचत आहे. कारण समुद्रातील या खडकाळ प्रदेशापासून केवळ २५ मैलांवर चीनच्या तटरक्षक दलाने त्यांच्या बोटी तैनात केल्या असून तिथे त्यांची नेहमीच गस्त सुरू असते.

हेही वाचा… विश्लेषण: बांगलादेशच्या ‘बॅटल ऑफ बेगम’मध्ये भारत-चीन युती? अमेरिकेचा शेख हसिना यांना विरोध का?

फिलिपिन्सच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे वरिष्ठ अधिकारी जोनाथन मलाया यांनीही चीन आर्थिक व लष्करी बळावर या प्रदेशाचा ताबा मिळवू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. फिलिपिन्सच्या नौदलाची ३३० फूट लांबीची अमेरिकी बनावटीची ‘सिएरा माद्रे’ नेहमीच या भागात तैनात असते, मात्र चिनी प्रशासनाने फिलिपिन्सला ही बोट येथून हटवण्यास सांगितले आहे.

संघर्ष सुरू राहिल्यास कोणते धोके आहेत?

नवीन संघर्षामुळे फिलिपिन्स आणि बीजिंगमधील संबंध आणखी ताणण्याची शक्यता आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष बोंगबोंग मार्कोस यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील संबंध आणखी तणावपूर्ण झाले आहेत. अमेरिकेशी जवळचे संबंध ठेवण्याची मागणी मार्कोस यांनी केली असून चीनवर आक्रमक वर्तनाचा आरोप केला आहे. ‘फॅक्ट आशिया’चे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक जस्टिन बाक्विसल यांनी मात्र हा संघर्ष अधिक ताणला जाणार नसल्याचे सांगितले. कारण दक्षिण चीन समुद्रात अनेकदा संघर्ष घडतात. मात्र या वादावर तात्पुरता तोडगा काढला जातो. चीन हा देश फिलिपिन्सचा सर्वोच्च व्यापारी भागीदार असल्याने दक्षिण चीन समुद्रातील वादाचा परिणाम उभय राष्ट्रांतील संबंधावर येणार नसल्याचे फिलिपिन्सच्या प्रशासनाकडून पाहिले जाईल. मार्कोसने आपल्या चिनी समकक्षांशी संभाषण चालू ठेवले आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे आर्थिक शिखर परिषदेच्या वेळी मार्कोस आणि चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या दक्षिण चीन समुद्रातील वादाविषयी पुढील मार्ग काढण्यासाठी भेट झाली होती.

चीन-फिलिपिन्स संघर्षावर अमेरिकेची भूमिका काय?

चीन आणि फिलिपिन्स यांच्यात सुरू असलेल्या नव्या संघर्षाबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली. अमेरिकेचे सैन्यदल प्रमुख चार्ल्स ब्राऊन यांनी सांगितले की, या संघर्षावर आम्ही नजर ठेवून आहे. फिलिपिन्सच्या प्रशासनाशी ब्राऊन यांनी चर्चा केली असून अमेरिकेचे फिलिपिन्सला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. फिलिपिन्सच्या जहाजांवर पाण्याच्या तोफांचा हल्ला केल्याने त्याचा निषेध अमेरिकेने व्यक्त केला असून चिनी तटरक्षक दलाचे हे कृत्य बेकायदा आणि कुरापतखोर असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र चिनी जहाजांच्या आक्रमक कारवाईनंतरही दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी घनिष्ठ संबंध निर्माण करण्यावरही अमेरिकेने जोर दिला आहे.

दक्षिण चीन समुद्रात चीन नेहमीच कुरापती का करतो?

दक्षिण चीन समुद्र असो किंवा आशिया- प्रशांत क्षेत्र असो, सगळीकडे चीनच्या कुरापती सुरू आहेत. दक्षिण चीन समुद्र आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशावर चीन नेहमीच दावा करत आहे. व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि इंडोनेशिया या देशांच्या विशेष आर्थिक क्षेत्राला सामावणाऱ्या नकाशावरील एका रेषेकडे निर्देश करून चीन जवळपास संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर सार्वभौमत्वाचा दावा करतो. तैवान या देशाला तर चीन आपल्या देशाचाच एक भूभाग म्हणून दावा करतो. मात्र तैवानने बीजिंगचे नकाशे स्वीकारण्यास नकार दिला आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रातील विविध प्रवाळ, द्वीपसमूह, लहान बेटांसह ९० टक्के प्रदेशांवर आपला हक्क सांगितला आहे. हे प्रदेश सामरिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने या समुद्रात चीनच्या नेहमीच कुरापती सुरू असतात.

sandeep.nalawade@expressindia.com