चीन आपली लष्करी ताकद आणि शस्त्रास्त्रे यांविषयी नेहमीच चर्चेत असतो. मात्र, चीनने तब्बल ४४ वर्षांनंतर अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी करून, जगाची चिंता वाढवली आहे. बुधवारी (२५ सप्टेंबर) सकाळी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ने पॅसिफिक महासागरात आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. चीनने ही चाचणी नियमित असल्याचे नमूद केले असले तरीही विश्लेषक आणि चीनचे नागरिक हे असामान्य असल्याचे सांगतात. अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी चिंतेचा विषय आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

डीएफ-41 क्षेपणास्त्राची चाचणी

बुधवारी (२५ सप्टेंबर) सकाळी स्थानिक वेळेनुसार ८.४४ वाजता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पॅसिफिक महासागरात सिम्युलेटेड वॉरहेड घेऊन जाणारे इंटरकाँटिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (आयसीबीएम) प्रक्षेपित केले. या आयसीबीएम क्षेपणास्त्राचे नाव डीएफ-41 आहे, जे पहिल्यांदा २०१७ मध्ये सेवेत आले होते. हे क्षेपणास्त्र १२ ते १५ हजार किलोमीटरपर्यंतचे अंतर गाठू शकते. याचा अर्थ असा की, हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या मुख्य भूभागापर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. चीनच्या सरकारी मीडियाने दावा केला आहे की, या क्षेपणास्त्रात १० एमआयआरव्ही वॉरहेड्स लावले जाऊ शकते; ज्याचे एकूण वजन २,५०० किलोग्रॅम आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने आणि राज्य माध्यमांनी चाचणीबद्दल इतर कोणतेही तपशील दिले नाहीत. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, डमी वॉरहेड घेऊन जाणार्‍या आयसीबीएमची चाचणी सैन्याच्या वार्षिक प्रशिक्षण योजनेचा नियमित भाग आहे. हे कोणत्याही देशाच्या किंवा लक्ष्याविरुद्ध नाही, असे त्यात म्हटले आहे.

१९८० नंतर आंतरराष्ट्रीय समुद्रात चीनकडून आयसीबीएम क्षेपणास्त्र लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?

क्षेपणास्त्र चाचणी असामान्य का?

क्षेपणास्त्र चाचणी नियमित होत असल्याचे चीनचे सांगणे आहे. मात्र, चीनच्या या विधानाशी तज्ज्ञ सहमत नाहीत. ते सांगतात की, १९८० नंतर आंतरराष्ट्रीय समुद्रात चीनकडून आयसीबीएम क्षेपणास्त्र लाँच करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सामान्यतः जेव्हा चीन अण्वस्त्रांची चाचणी घेतो, तेव्हा ती देशाच्या झिनजियांग प्रदेशातील तकलामाकान वाळवंटात घेतली जाते. परंतु, मे १९८० मध्ये चीनने आयसीबीएम डीएफ-5 लाँच केले होते. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार, १९८० च्या चाचणीमध्ये १८ चिनी नौदल जहाजांचा समावेश होता. या चाचणीला अजूनही चीनच्या सर्वांत मोठ्या नौदल मोहिमांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

विशेष म्हणजे चीनने सांगितले की, त्यांनी इतर देशांना या प्रक्षेपणाबद्दल अगोदरच सूचित केले होते. परंतु, जपानमधील एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले, “चीनच्या बाजूने जपानला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही.” ते पुढे म्हणाले की, क्षेपणास्त्र जपानच्या हद्दीतून गेल्याची पुष्टी झालेली नाही. न्यूझीलंडनेदेखील क्षेपणास्त्र चाचणी स्वागतार्ह नसल्याचे म्हटले आहे.

चीनने बुधवारी केलेले आयसीबीएम प्रक्षेपण हे देशाच्या वाढत्या आण्विक आणि क्षेपणास्त्र शस्त्रागाराचे सूचक आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

चीनचे आण्विक शस्त्रागार

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, चीनने बुधवारी केलेले आयसीबीएम प्रक्षेपण हे देशाच्या वाढत्या आण्विक आणि क्षेपणास्त्र शस्त्रागाराचे सूचक आहे. पेंटागॉनने यापूर्वी अहवाल दिला होता की, शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीन अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने शस्त्रागार विकसित करीत आहे. चीनकडे त्याच्या शस्त्रागारात ५०० पेक्षा जास्त ऑपरेशनल आण्विक वॉरहेड्स आहेत. त्यापैकी अंदाजे ३५० आयसीबीएम आहेत. २०३० पर्यंत १,००० पेक्षा जास्त वॉरहेड्स असतील, असा अंदाज पेंटागॉनने व्यक्त केला आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, चीनचे सैन्य जमिनीवर आधारित आयसीबीएमसाठी शेकडो सायलो (क्षेपणास्त्रे साठवण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी वापरली जाणारी भूमिगत रचना) देखील बांधत आहे. दुसरीकडे अमेरिकेकडे १,७७० ऑपरेशनल वॉरहेड्स आहेत; तर रशियाकडे १,७१० आहेत.

हेही वाचा : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार, ‘स्पेसएक्स’च्या क्रू-९ चे यशस्वी प्रक्षेपण; मोहिमेला विलंब का झाला? याचा नक्की परिणाम काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांनी असेही नमूद केले आहे की, क्षेपणास्त्राची चाचणी हा बीजिंगचा जगाला संदेश देण्याचा मार्ग होता. सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीतील एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (आरएसआयएस)चे वरिष्ठ फेलो ड्र्यू थॉम्पसन यांनी ‘सीएनएन’ला सांगितले, “चीनचे अनेक देशांशी मतभेद आहेत. अशात या चीनकडून या क्षेपणास्त्राची चाचणी सर्वांना घाबरवण्याच्या उद्देशाने आणि स्वतःची ताकद दाखवण्यासाठी करण्यात आली आहे.”