वास्तविक नियंत्रण रेषेवरील (LAC) भारताच्या हद्दीतील भागावर ताबा मिळवण्याचा चीनचा हेतू हाणून पाडण्यासाठी भारताने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. भारताने जगातील दोन सर्वोच्च टँक दुरुस्ती केंद्रे स्थापन केली आहेत. भारताने पूर्व लडाखमध्ये ५०० हून अधिक रणगाडे आणि पायदळ लढाऊ वाहनेही तैनात केली आहेत. भारतीय लष्कराने चीन सीमेजवळील न्योमा आणि डीबीओ सेक्टरमध्ये १४,५०० फूट उंचीवर दोन चिलखती वाहनं देखभाल आणि दुरुस्ती सुविधा उभारल्या आहेत. एप्रिल – मे २०२० मध्ये भारत आणि चीनमधील संघर्ष सुरू झाल्यानंतर पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय बनावटीची चिलखतं वाहने जसे की, टँक आणि BMP लढाऊ वाहने तसेच क्विक रिॲक्शन फायटिंग वाहने तैनात करण्यात आली आहेत.
भारतीय लष्कराने वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) लडाखमध्ये जगातील दोन सर्वोच्च टँक दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या आहेत. यापैकी एक केंद्र उत्तरेला आहे, तर दुसरे पूर्वेला आहे. पूर्व लडाखमधील २०२० च्या चीनच्या आगळिकीनंतर नवी दिल्लीशी तणावपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते, त्यानंतर या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. चीनच्या वाढत्या लष्करी तैनातीमुळे भारताने आशियाई महाकाय देशाच्या सीमेजवळील संरक्षणदेखील वाढवले आहे. दोन दिवसांपूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री (EAM) एस जयशंकर यांनी चीनच्या सीमेवर सैन्याची तैनाती असामान्य असल्याचे मान्य केले होते. भारतीय नागरिक म्हणून आपल्यापैकी कोणीही देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये, हे आज एक आव्हान आहे,” असंही ते म्हणालेत. दोन्ही देशांमधील सततच्या तणावादरम्यान भारतीय लष्कराचे पाऊल महत्त्वपूर्ण का आहे ते समजून घेऊ यात.
हेही वाचाः ‘डिजिटल अरेस्ट’ला अनेकजण पडत आहेत बळी; फसवणुकीचा हा नवीन प्रकार आहे तरी काय?
लडाखमध्ये टँक दुरुस्ती सुविधा
एएनआयच्या वृत्तानुसार, दौलत बेग ओल्डी (DBO) सेक्टरमध्ये एक टँक दुरुस्तीची सुविधा निर्माण केली आहे आणि दुसरी सुविधा १४,५०० फूट उंचीवर न्योमामध्ये निर्माण करण्यात आली आहे. २०२० च्या गलवान व्हॅलीमध्ये चीनशी झालेल्या संघर्षानंतर भारताने अनेक टँक, BMP लढाऊ वाहने आणि भारतीय बनावटीची क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेईकल्स तैनात केल्यामुळे या चिलखती वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती सुविधा अत्यंत आवश्यक होती. “टँक आणि पायदळ लढाऊ वाहने या अति उंचीच्या भागात तैनात करण्यात आली आहेत, जिथे त्यांना देखभाल आणि दुरुस्तीसाठी परत खाली आणणे देखील कठीण आहे,” असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. “या प्रदेशात चिलखती वाहन चालवण्यास मदत करण्यासाठी आम्ही DBO क्षेत्रातील DS-DBO रोडवर न्योमा येथे आणि KM-148 जवळ या मध्यम देखभाल दुरुस्ती सुविधा उभारल्या आहेत. ही दोन मुख्य क्षेत्रे आहेत, जिथे पूर्व लडाख सेक्टरमध्ये टँक आणि ICV ऑपरेशन्स केंद्रित आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.
भारताची हालचाल का महत्त्वाची आहे?
भारताने पूर्व लडाखमध्ये ५०० हून अधिक रणगाडे आणि पायदळ लढाऊ वाहने तैनात केली आहेत. त्यांना दुरुस्ती आणि देखभालीसाठी मुख्य भूमीवर आणणे हे एक कठीण काम होते. ही नवीन दुरुस्ती केंद्रे भारतीय सैन्याला बख्तरबंद लढाऊ वाहनांची कार्यक्षमता आणि सेवाक्षमता वाढवण्यास मदत करतील, असे लष्करी अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला सांगितले.
आर्मी त्यांच्या टँक ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करीत आहे, ज्यात टी-९०, टी-७२ आणि के-९ वज्र स्वयंचालित हॉवित्झरचा समावेश आहे. ११ मे रोजी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लडाखमधील केंद्रांना भेट दिली. एका अधिकृत ट्विटमध्ये लष्कराने म्हटले आहे की, “अद्वितीय देखभाल सुविधा” आर्मर्ड फायटिंग व्हेईकल्सच्या वर्धित सेवाक्षमतेला आणि मिशनच्या विश्वासार्हतेला प्रोत्साहन देते आणि “कॅम्बॅट फ्लीटला खडबडीत प्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात उणे ४० अंशांपर्यंत खाली उतरूनही कार्य करते”. ज्या भागात दुरुस्ती केंद्रे उभारण्यात आली आहेत, तेही महत्त्वाचे आहेत. दौलत बेग ओल्डी (DBO) काराकोरम खिंडीच्या दक्षिणेला आहे, त्याच्या पश्चिमेला सियाचीन आणि पूर्वेला चीनने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेले अक्साई चीन आहे.
दौलत बेग ओल्डी (DBO) डेपसांग मैदानाच्या मोक्याच्या क्षेत्राच्या जवळ आहे, जे १६ हजार फूट उंचीवर आहे. टी-९०, टी-७२ आणि BMP II बख्तरबंद वाहने या प्रदेशात तैनात केली गेली आहेत. एनडीटीव्हीशी बोलताना भारताच्या अणु कमांडचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल अमित शर्मा (निवृत्त) म्हणाले, “टँक हे एकमेव उपकरण आहे, जे पायदळांना हलवण्यास आणि उद्दिष्ट प्राप्त करण्यास सक्षम असेल. रणगाडा शत्रूपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. दुसरीकडे टँक दुरुस्तीची सुविधा न्योमामध्ये आहे. LAC पासून फक्त ५० किमी अंतरावर पूर्व लडाखमधील फायटर जेट ऑपरेशन्स सुलभ करण्यासाठी भारताचे न्योमा एअरफील्ड अपग्रेड करण्याची योजना आहे. न्योमा एअरबेसवरील २.७ किमी धावपट्टी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पूर्व लडाखमधील डेमचोक आणि उत्तरेकडील डेपसांगवरून भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष कायम असल्याने याला अधिक महत्त्व आहे. संघर्षाच्या बाबतीत दुरुस्तीच्या सुविधांमुळे उंचावरील टँकची जलद देखभाल आणि त्यांची जलद तैनाती सुनिश्चित होईल, असे NDTV ने नमूद केले.