City Killer asteroid २०२३ मध्ये खगोलशास्त्रज्ञांना एक अशनी (अॅस्ट्रॉइड) आढळून आला होता. हा अशनी पृथ्वीला धडकणार, अशी माहिती देण्यात आली होती. अंतराळातील हा अशनी तुलनेत खूपच लहान आहे; परंतु त्याची क्षमता मोठी आहे. त्यामुळे तो पृथ्वीवर येऊन आदळल्यास मोठा विनाश घडून येण्याची शक्यता असल्याचीही चर्चा होती. २०२४ मध्ये वायआर४ (2024 YR4) या अशनीला ‘सिटी किलर’, असे नाव देण्यात आले. हा अशनी आढळल्यानंतर खगोलशास्त्रज्ञांनी त्याचे निरीक्षण सुरू केले. त्यातून आता नवे निष्कर्ष समोर आले आहेत. काय आहे सिटी किलर अशनी? या अशनीचा पृथ्वीला धोका किती? खगोलशास्त्रज्ञांच्या अभ्यासातून या अशनीविषयी काय माहिती समोर आली? जाणून घेऊयात.
खगोलशास्त्रज्ञांनी काय भीती व्यक्त केली?
- डिसेंबर २०२३ मध्ये खगोलशास्त्रज्ञांकडून एक अशनी शोधण्यात आला होता, ज्याला २०२४ वायआर४ (2024 YR4) असे नाव देण्यात आले.
- हा अॅस्ट्रॉइड २०३२ मध्ये पृथ्वीवर आदळण्याची शक्यता खगोलशास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात आली आणि खगोलशास्त्रज्ञांनी या अशनीच्या मार्गाचे निरीक्षण सुरू केले.
- आता या निरीक्षणानंतर असे लक्षात आले आहे की, हा अशनी पृथ्वीवर धडकणार नाही. मात्र, असे असले तरी या अशनीचा परिणाम चंद्रावर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुख्य म्हणजे ‘सिटी किलर’पेक्षा १० लाख पट जास्त वजनाचा अशनीही पृथ्वीच्या जवळ येत आहे, ज्याचे नाव ८८७ अलिंडा असे आहे. २०२४ वायआर४ या अशनीचा व्यास ४० ते ९० मीटरदरम्यान आहे. हा अशनी प्रादेशिक नुकसान आणि हवामानावर परिणाम करू शकतो, अशी भीती खगोलशास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात आली होती. दुसरीकडे ८८७ अलिंडा या मोठ्या अशनीचा व्यास चार किलोमीटरपेक्षा जास्त असून, तो पृथ्वीवरील विनाशास कारणीभूत ठरू शकतो, असे सांगण्यात आले होते. परंतु, अलिंडा अशनी पृथ्वीच्या कक्षेबाहेर आहे; तर २०२४ वायआर४ हा अशनी पृथ्वीच्या कक्षेत आहे. त्यामुळे २०२४ वायआर४ हा अशनी पृथ्वीवर परिणाम करू शकतो. परंतु, इतक्या लवकर या अशनीचे परिणाम जाणवणार नाहीत, असे खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
अशनीतील ‘किर्कवुड गॅप्स’ म्हणजे काय?
किर्कवुड गॅप्स म्हणजे अशनींमधील विशिष्ट जागा, या जागेत गुरुत्वाकर्षणामुळे अशनींची संख्या कमी असते. हा मंगळ आणि गुरू यांच्यादरम्यान असलेला पट्टा लघुग्रहांनी भरलेला आहे. गुरू ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे या भागात अशनींच्या कक्षा विचलित होतात. त्यामुळे काही विशिष्ट कक्षांमध्ये अशनींची संख्या कमी होऊन ‘किर्कवुड गॅप्स’ तयार होतात. त्यात काही अशनी बाहेर फेकले जातात. ८८७ अलिंडा आणि २०२४ वायआर४ हे दोन्ही अशनी सूर्याभोवती तीन वेळा प्रदक्षिणा घालतात. त्याच तुलनेत गुरू ग्रह एकच प्रदक्षिणा घालतो.
गुरूची सूर्याभोवतीची कक्षा पूर्ण व्हायला १२ वर्षे लागतात. त्यामुळे ८८७ अलिंडा आणि २०२४ वायआर४ सारखे अशनी पुन्हा त्याच मार्गावर चार वर्षांनी परत येतात. या विशेष प्रकारचे अशनी धोकादायक असतात. कारण- ते वारंवार परत येतात. अलिंडाचा शोध १९१८ मध्ये लागला होता आणि हा अशनी चार वर्षांच्या अंतराने अनेकदा त्याच मार्गावरून गेला आहे. २०२४ वायआर४ हा अशनी १९४८ पासून दर चार वर्षांनी त्याच मार्गावरून गेला असल्याचे नासाचे म्हणणे आहे; मात्र त्याचा शोध आता लागला आहे. १८०० च्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ डॅनियल किर्कवुड यांनी अशा अशनींची नोंद केली होती. त्यावेळी फार कमी अशनींची माहिती असल्याने त्यांनी उपलब्ध माहितीवर काम केले.
अशनी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता किती?
किर्कवुड गॅप म्हणजे असा बिंदू, जिथे लघुग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी गुरूच्या कालावधीच्या एक-तृतियांश असतो. किर्कवुड गॅप आणि या अशनीशी संबंधित वाईट बातमी अशी की, अलिंडा वर्गातील अशनी त्याच त्याच मार्गावर पुन्हा येतात. त्यामुळे तितक्याच वेळा अलिंडा पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण होते. या स्वरूपाचे अशनी चार वर्षांच्या अंतराने अनेक वेळा परत येतात. बहुतेकदा अशनी पृथ्वीच्या कक्षेत नसतात आणि त्यामुळे ते धडकण्याची शक्यता कमी असते. परंतु, अलिंडा आणि २०२४ वायआर४ या दोन्ही अशनींशीही संबंधित वाईट बातमी अशी आहे की, हे अशनी पृथ्वीच्या कक्षेच्या समतलावर आहेत आणि त्यामुळे धडकण्याची शक्यता जास्त आहे.
परंतु, लघुग्रहांच्या पट्ट्यातून कक्षा आत आणि बाहेर पसरवणाऱ्या रेझोनंट ‘पंपिंग’मुळे २०२४ वायआर४ने पृथ्वीची कक्षा आधीच ओलांडली आहे. त्याहूनही धोकादायक असलेला अलिंडा अजूनही पंपिंग प्रक्रियेत आहे. त्यामुळे हा अशनी सुमारे १,००० वर्षांनंतर पृथ्वीवर धडकण्याचा अंदाज खगोलशास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. त्यात एक चांगली बातमी म्हणजे २०२४ वायआर४ने पृथ्वीची कक्षा आधीच ओलांडली असल्याने हा अशनी २०३२ मध्ये धडकण्याची शक्यता टळली आहे.
अशनी किती धोकादायक?
१५ फेब्रुवारी २०१३ रोजी रशियातील चेल्याबिन्स्क येथे मोठ्या अशनीच्या धक्कादायी लहरींमुळे इमारतींच्या काचा फुटल्या आणि त्यात अनेक लोक जखमी झाले. १९०८ मध्ये रशियन सायबेरियातील तुंगुस्का येथे एक मोठा स्फोट झाला. हा एक दुर्गम प्रदेश होता, जिथे जंगलाचे मोठे क्षेत्र उद्ध्वस्त झाले होते आणि त्यात काही लोक जखमी झाले होते.
खगोलशास्त्रज्ञ या अशनीचा करणार अभ्यास
खगोलशास्त्रज्ञ पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सर्वेक्षण करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करीत आहेत. निअर-अर्थ ऑब्जेक्ट (NEO) सर्वेक्षकासारखे अवकाश-आधारित सर्वेक्षण लघुग्रह शोधण्यात खूप कार्यक्षम असू शकते. हे सर्वेक्षण उष्णतेच्या (इन्फ्रारेड) किरणोत्सर्गाद्वारे केले जाते. हे सर्वेक्षण अवकाशात होणार असल्याने त्याद्वारे रात्रीच्या आणि दिवसाच्या आकाशाचादेखील अभ्यास केला जाऊ शकतो. निअर-अर्थ ऑब्जेक्ट सर्वेक्षकाच्या प्रमुख एमी मेन्झर यांच्या मते, “आम्हाला फक्त ४० टक्के अशनी माहीत आहेत, जे गंभीर नुकसान पोहोचवू शकतील आणि पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ येतील इतके ते मोठे आहेत.” २०२७ च्या उत्तरार्धात प्रक्षेपित झाल्यानंतर निअर-अर्थ ऑब्जेक्ट सर्वांत धोकादायक अशनी आणि धूमकेतू शोधेल. त्यांचा मागोवा घेईल आणि त्यांची माहिती देईल. अशनींमध्ये आपण २०२४ वायआर४ सारख्या रेझोनंट अशनींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण- हा अशनी पुन्हा परत येईल, असे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.