Cleopatra final secret Video: क्लिओपात्रा (इजिप्तची शेवटची फॅरो आणि टॉलेमी घराण्यातील शासिका) हे नाव आजही इतिहासप्रेमींना भुरळ घालते. इतिहासातल्या या राणी भोवती अनेक कथा-दंतकथांचं जाळं विणलेलं आहे. तिच्या आरसपाणी सौंदर्यापासून ते तिच्या भावाशी झालेल्या विवाहाबद्दल किंवा तिच्या प्रेमकथेबद्दल अनेक बाबतीत या राणीचा इतिहास मोहित करणारा आहे. अलीकडच्या एका संशोधनात या गूढतेच वलय असणाऱ्या राणीविषयी आणखी एक पैलू समोर आला आहे. त्यामुळे तिच्या इतिहासाचे आणखी एक पान उलगडले गेले आहे. या रहस्यमय नायिकेची चक्क समाधी शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, या समाधीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा पाण्यातून जातो.
एखाद्या गोष्टीचा ध्यास असला तर मार्ग सापडतोच. असंच काहीच पेशाने वकील असलेल्या कॅथलीन मार्टिनेज यांनी करून दाखवलं. आता वकील आणि इतिहास काय संबंध, असा प्रश्न पडू शकतो. पण आवडही महत्त्वाची असते. म्हणूनच जगाने त्यांचं इतिहासप्रेम नाकारलं तरी त्यांनी हार मानली नाही. त्या नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर झाल्या. गेल्या दोन दशकांपासून कॅथलीन या क्लिओपात्राच्या समाधीचा शोध गुप्त, भूमिगत स्थळांमध्ये घेत आहेत. अनेक अभ्यासक क्लिओपात्रा ही अलेक्झांड्रियात जन्मली आणि तिथेच मरण पावली आणि तिथेच तिला दफन करण्यात आले असे मानतात. परंतु, मार्टिनेज यांच्या शोधामुळे इतिहासाला एक वेगळंच वळण लागलं आहे.
आणि सापडले बुडलेले बंदर
त्यांचा शोध त्यांना अलेक्झांड्रियाच्या पश्चिमेस सुमारे ३० मैलांवर असलेल्या टॅपोसिरिस मॅग्ना या दुर्लक्षित मंदिरात घेऊन गेला. हे मंदिर इजिप्तमधील बोर्ग एल अरब या किनारपट्टीवरील शहरात वसलेलं आहे. इतकंच नाही तर हा मागोवा घेत असताना मार्टिनेज यांच्या पथकाने टॅपोसिरिस मॅग्नाच्या किनाऱ्यापासून काही मैलांवर भूमध्य समुद्राच्या तळाशी एक बुडलेलं बंदर शोधून काढलं आहे.
मोठं सागरी व्यापारी बंदर
या शोधाची घोषणा याच महिन्यात इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने केली. या शोधामुळे टॅपोसिरिस मॅग्ना हे फक्त धार्मिक केंद्र नव्हतं, तर एक मोठं सागरी व्यापारी बंदरही होतं, हे उघडलीस आलं. असं काही मोठं बंदर येथे असू शकतं याची कल्पना कुणालाही नव्हती. मार्टिनेज म्हणतात, टॅपोसिरिस मॅग्नाचे महत्त्व या बंदराच्या शोधामुळे आणखी स्पष्ट झालं आहे. शिवाय, क्लिओपात्राला तिचा प्रियकर व लढाईतील सोबती मार्क अँटनीबरोबर दफन करण्यासाठी हे ठिकाण निवडलं गेल्याची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
मातीच्या घागरी आणि मडकी
याआधी २०२२ साली मार्टिनेज आणि त्यांच्या संशोधक पथकाला टॅपोसिरिस मॅग्ना येथे उत्खनन करत असताना क्लिओपात्राच्या काळातील वस्तू व वास्तूरचना सापडल्या होत्या. त्यात तब्बल ४,३०० फूट लांबीची बोगद्यासारखी रचना सापडली होती, जी थेट समुद्राकडे जात होती. जमिनीखाली साधारण ४० फूट खोल असलेला हा बोगदा अर्धा पाण्याखाली बुडलेला होता. आतमध्ये उत्खनन करताना संशोधकांना टॉलेमी काळातील मातीच्या घागरी आणि मडकी मिळाली. या सर्व उपलब्ध अवशेषांवरूनच मार्टिनेज सांगतात, “हे बंदर क्लिओपात्राच्या आणि त्याआधीच्या राजवंशाच्या कालखंडात सक्रिय होतं.”
टायटॅनिक ते क्लिओपात्रा
या अनपेक्षित जमिन आणि समुद्राच्या संगमाचा शोध घेण्यासाठी मार्टिनेज यांनी सागरी पुरातत्त्वतज्ज्ञ आणि नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर बॉब बॅलर्ड यांना मदतीसाठी बोलावलं. बॅलर्ड यांनीच कधीकाळी टायटॅनिक हे बुडालेलं जहाज शोधलं होतं. त्यांच्या पाण्याखालील मोहिमेत मानवनिर्मित प्रचंड रचना सापडल्या, त्यात एक गुळगुळीत दगडी फरशीसुद्धा होती. या सर्व शोधाचं चित्रीकरण २५ सप्टेंबर रोजी Cleopatra’s Final Secret या National Geographic वर प्रक्षेपित झालेल्या माहितीपटात दाखवण्यात आलं आहे. हा माहितीपट Disney+ आणि Hulu वरही पाहू शकतो. मार्टिनेज सांगतात, दोन हजार वर्षांत कुणीही इथे आलेलं नव्हतं.
एक विलक्षण आयुष्य आणि गूढ मृत्यू
इ.स.पू. ६९ मध्ये जन्मलेली क्लिओपात्रा (सातवी) वयाच्या केवळ १८ व्या वर्षी सिंहासनावर आरूढ झाली. अलेक्झांडर द ग्रेटने इजिप्त जिंकल्यानंतर इ.स.पू. ३०५ मध्ये सुरू झालेलं टॉलेमी घराणं हे प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ सत्तेत असलेलं राजघराणं होतं आणि क्लिओपात्रा ही त्याची शेवटची शासक ठरली. “ती एक असामान्य स्त्री होती, तिच्यासमोर अनेक प्रभावशाली पुरुष देखील घाबरत होते,” असं मार्टिनेज सांगतात. रोममध्ये मात्र ती खलनायिकेच्या रूपात ओळखली जाते. ज्युलियस सीझरबरोबरच्या तिच्या नातेसंबंधामुळे हे घडलं. ती धोकादायक, विलक्षण आणि मोहक स्त्री होती असं मानलं जात होतं. हाच सूर पाश्चात्य इतिहासकार व कलाकारांचा होता, असं मार्टिनेज सांगतात.
मग खरी क्लिओपात्रा कोण होती?
मार्टिनेज यांच्या दृष्टीने, क्लिओपात्राचं आयुष्य हे तिच्या काळातील लादल्या गेलेल्या लिंगभेद करणाऱ्या लोकांना दिलेलं ठाम उत्तर होतं. “ती तत्त्वज्ञ होती. ती वैद्यकशास्त्राची जाणकार होती. ती रसायनशास्त्रज्ञ होती. ती सौंदर्यशास्त्र आणि प्रसाधनविद्येची तज्ज्ञ होती.” सीझरची हत्या झाल्यानंतर राणी क्लिओपात्राचं तिच्या एका सेनापतीबरोबर आणि संभाव्य उत्तराधिकारी मार्क अँटनीबरोबर अकरा वर्षांचं उत्कट आणि राजकारणाने भरलेलं नातं होतं. प्राचीन लेखक प्लुटार्कनं त्यांच्या भेटीचं वर्णन असं केलं आहे. क्लिओपात्रा सायड्नस नदीतून आली होती. तिच्यासह तिच्या बोटीचं सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखं होतं. आजूबाजूला संगीताचे सूर घुमत होते. तिने सोन्याच्या छत्राखाली देवता व्हीनसच्या रूपात अँटनीचं स्वागत केलं. तिच्या बंदरावर होणाऱ्या प्रत्येक भेटीमागे एक राजकीय संदेश होता. ती भेटीच्या स्थळी असं काही दृश्य उभं करायची की, ज्यामुळे प्रेक्षक थक्क होतं होते. टार्सस येथे सोन्याच्या नौकेत अँटनीसमोर प्रकट होणं आणि आपल्या संपत्तीने त्याला भारावून टाकणं, हेही तिच्या योजनेचा भाग होता.
क्लिओपात्राची लढाई व मृत्यू
क्लिओपात्राचं अँटनीबरोबरचं राजकीय व वैयक्तिक नातं समुद्रावरच संपलं. इ.स.पू. ३१ मध्ये ग्रीसच्या पश्चिम किनाऱ्यावर अॅक्टियमच्या लढाईत क्लिओपात्रानं स्वतःच्या ताफ्याचं नेतृत्व केलं, क्लिओपात्रा रोमन शासक ऑक्टेव्हियन म्हणजेच अँटनीच्या प्रतिस्पर्ध्याच्या सैन्याशी भिडली. या लढाईत पराभूत झाल्यानंतर अँटनी इजिप्तला परतला आणि अलेक्झांड्रियामध्ये त्याने स्वतःच्या तलवारीनं स्वतःला संपवलं, असं सांगितलं जातं. तर, रोमनांच्या कैदेत पडण्याचा धोका ओळखून क्लिओपात्रानं ३९ व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं. काहींच्या मते तिनं सापाच्या विषाचा वापर केला, पण याचा ठोस पुरावा कधीच सापडलेला नाही.
क्लिओपात्राच्या समाधीचा शोध
प्लुटार्कच्या मते, अँटनी आणि क्लिओपात्रा या दोघांना अलेक्झांड्रियामधील तिच्या स्मारकात एकत्र दफन करण्यात आलं होतं. पण, आजवर तिथे तिच्या समाधीचा कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही. इ.स. ३६५ मध्ये आलेल्या प्रचंड भूकंप आणि त्सुनामीमुळे अलेक्झांड्रियाचं मोठं ऐतिहासिक राजवाड्यांचं क्षेत्र पाण्याखाली बुडालं, आणि आज ते जवळपास २० फूट खोल समुद्राखाली आहे. मात्र, समाधीच्या शोधात मार्टिनेज यांनी क्लिओपात्राने ऑक्टेव्हियनला दिलेल्या लढ्याचाही विचार केला. रोमसमोर शरण जाण्यापेक्षा क्लिओपात्राने नाहीसं होण्याची योजना आखली होती. रोमनांना शोधण्याची कल्पनाही करता येणार नाही, अशा ठिकाणी अँटनीबरोबर तिचं शरीर दडवण्याची योजना होती.
क्लिओपात्रा आणि देवी आयसिस
त्यासाठी मार्टिनेज यांनी अलेक्झांड्रियामधून एका दिवसात पोहोचता येतील अशी सर्व मंदिरे तपासली. शेवटी त्यांनी आपले लक्ष टॅपोसिरिस मॅग्ना इथे केंद्रित केले आणि २००५ मध्ये त्यांच्या पथकानं तिथे उत्खनन सुरू केलं. या मोहिमेत अनेक विलक्षण शोध लागले. विशेष म्हणजे, मार्टिनेज यांच्या पथकाला मंदिराच्या जागी एक पाया-फलक मिळाला, ज्यावर ग्रीक आणि चित्रलिपीमध्ये लिहिलेलं होतं की, हे मंदिर देवी आयसिसला समर्पित केलेलं आहे. हा दुवा महत्त्वाचा मानला जातो, कारण अनेक लोक क्लिओपात्राला आयसिसची जिवंत मूर्ती समजत होते.
नाण्यांवर क्लिओपात्राची प्रतिमा
त्यामुळे मार्टिनेज यांची शंका अधिक खरी ठरली. त्या म्हणतात, “ती गुलाम किंवा कैदी म्हणून मरू इच्छित नव्हती. ती आयसिसची कन्या म्हणून मरू इच्छित होती.” या मंदिरात मार्टिनेज यांच्या पथकाने, सॅंटो डोमिंगो येथील Universidad Nacional Pedro Henríquez Ureña च्या सहकार्याने, शेकडो मानवी सांगाडे शोधून काढले. त्यात सोन्याच्या पातळ पत्र्याने झाकलेल्या ममी होत्या, तसेच मातीची भांडी आणि तब्बल ३०० पेक्षा जास्त नाणी सापडली, त्यापैकी काहींवर क्लिओपात्राची प्रतिमा होती. इजिप्तच्या पर्यटन व पुरातत्त्व मंत्रालयानं गेल्या डिसेंबरमध्ये जाहीर केलं होतं की, ही भांडी अंदाजे इ.स.पू. ५१ ते ३० या कालखंडातील आहेत, म्हणजेच क्लिओपात्राच्या कारकिर्दीशी संबंधित आहेत. परंतु, अद्याप तिची समाधी सापडलेली नाही.
क्लिओपात्राशी जोडलेलं बंदर
मार्टिनेज यांच्या मते, क्लिओपात्राचं शरीर टॅपोसिरिस मॅग्नाला आणलं गेलं होतं आणि कदाचित त्या बोगद्यातून नेऊन, रोमनांच्या नजरेपासून लपवून तिथेच दफन करण्यात आलं होतं. शतकानुशतकं गेल्यावर, इ.स. ३२० ते १३०३ या काळात किमान २३ भूकंपांनी इजिप्तचा किनारा हादरला. त्यामुळे टॅपोसिरिस मॅग्नाचे काही भाग समुद्राखाली बुडले. इजिप्तच्या नौदलाच्या मदतीने झालेल्या पाणबुडी मोहिमेत, बॉब बॅलर्ड यांच्या पथकाला सुरुवातीला दगडी खण दिसले, तिथे प्राचीन काळी मासेमारांनी आपलं जाळं आणि वजनं ठेवली होती. यावरून हे ठिकाण कधीकाळी किनारा होतं, हे स्पष्ट झालं.
क्लिओपात्राचं बंदर
सोनार सारख्या यंत्राच्या मदतीने त्यांनी समुद्रतळाचा नकाशा तयार केला, जिथे पाणबुड्यांना प्रचंड प्रमाणात प्राचीन वस्तू आढळल्या. “आम्हाला संरचना दिसायला लागल्या,” असं बॅलर्ड सांगतात. गाळाखाली दडलेल्या प्रचंड रचना, ओळीने उभ्या असलेल्या दिसल्या, २० फूटांपेक्षा उंच रचना होत्या. त्यात दगडी खांब, गुळगुळीत फरशी, प्रचंड ब्लॉक्स, तसेच अनेक नांगर आणि अँफोरा होते. या पुराव्यावरून हे बंदर टॅपोसिरिस मॅग्नाशी जोडलेलं असून, कदाचित क्लिओपात्राच्या काळात वापरलं जात होतं, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
तिच्या दफनभूमीचा शोध सुरूच राहाणार
मार्टिनेज यांच्यासाठी या पाण्याखालील बंदराचा शोध म्हणजे त्यांच्या ध्येयाकडे टाकलेलं आणखी एक पाऊल आहे. “आम्ही जमिनीवर आणि समुद्राखाली दोन्हीकडे तिच्या समाधीचा शोध सुरू ठेवणार आहोत,” असं त्या सांगतात. “ही तर फक्त या कामाची सुरुवात आहे.” बॅलर्ड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुमारे सहा मैल परिसराचा तपशीलवार नकाशा तयार केला आहे, त्यात बंदर, पाण्याखाली बुडालेला किनारा आणि इतर रचना दिसतात. त्यांच्या या नकाश्याच्या आधारे, मार्टिनेज आणि त्यांचं पथक ‘सलाम ५’ नावाच्या भागात ड्रिलिंग आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने नवीन उत्खनन सुरू करणार आहे.