विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची आखणी करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निर्णायक भूमिका पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबई महानगर प्रदेश हा महायुतीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रदेशाचा मध्यबिंदू असलेल्या ठाण्यात पंतप्रधानांना जाहीर कार्यक्रमासाठी पाचारण करताना मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण आयोजनावर स्वत:ची छाप कशी राहील याची पद्धतशीरपणे आखणी केली. भाजपचे ठाणे जिल्ह्यात आठ आमदार आहेत. पंतप्रधानांचे स्वागत आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांचे ‘दर्शन’ घडले खरे, मात्र मोदी यांचा जाहीर कार्यक्रम शिंदेसेनेचा जाहीर मेळावा वाटावा अशा पद्धतीची वातावरणनिर्मिती करण्यात मुख्यमंत्र्यांचा पक्ष यशस्वी ठरला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा हा वाढता प्रभाव भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थतेचे कारण ठरू लागला आहे.
ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचा…
ठाणे जिल्हा हा शिवसेनेसाठी नेहमीच महत्त्वाचा विभाग मानला जातो. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर या ठाण्यातील विधानसभेच्या जागा कमी झाल्या. या जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि २०१४ नंतर भाजपचे आव्हान तेव्हाच्या एकसंध शिवसेनेलाही पेलावे लागले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढले. त्यानंतरही कल्याण ग्रामीण, शहापूर यांसारख्या हक्काच्या जागांवर शिवसेनेला पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुसरीकडे भाजपने जिल्ह्यात सर्वाधिक आठ जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांना २०१९ मध्ये पक्षाची कामगिरी फारशी रुचली नव्हती. जिल्ह्यात आपला पक्ष पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे असा शिंदे यांचा त्यावेळीही आग्रह होता. आता तर ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पक्षाची कामगिरी उजवी असावी असा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपपेक्षाही दोन जागा अधिक लढवाव्यात आणि त्या जिंकूनही याव्यात या दृष्टीने त्यांच्या पक्षाची व्यूहरचना सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाने भाजप अस्वस्थ?
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात भाजप सर्वाधिक जागा लढवेल हे स्पष्टच आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र हे गणित कसे राहील याविषयी भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात पक्षाचे आठ आमदार आहेत. या आठ जागांवर भाजपचा दावा कायम आहे. कळवा-मुंब्रा, शहापूर, भिवंडी पूर्व या तीन जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे उरलेल्या सात जागा मुख्यमंत्र्यांच्या पक्षासाठी राहतात. मात्र जागावाटपाच्या गणितात काही जागा अधिकच्या मिळाव्यात असा शिंदे सेनेचा प्रयत्न आहे. कल्याण पूर्व, नवी मुंबईतील बेलापूर या दोन जागांवर शिंदे यांच्या शिवसेनेने दावा सांगितला आहे. कल्याण पूर्वेत भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे समर्थकावर केलेल्या गोळीबारामुळे या भागात दोन्ही पक्षांत तीव्र मतभेद आहेत. ही जागा मुख्यमंत्री पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. लोकसभेचा अनुभव लक्षात घेता हातच्या जागा मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे जाऊ नयेत याविषयी भाजप नेते सावध झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यात भाजप वाढीला मर्यादा?
शिवसेना एकसंध असल्यापासून ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये भाजपचा विस्तार होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रभावी नेते भाजपमध्ये आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही भाजपला जागा मिळाल्या. ठाण्याच्या एका बाजूस असलेल्या नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या प्रवेशामुळे राज्यातील एक श्रीमंत महापालिका भाजपला मिळाली. एकसंध शिवसेनेच्या तुलनेत हा पक्ष वाढत असला तरी मुख्यमंत्र्यांच्या प्रभावामुळे ताकद असूनही वाढीला मर्यादा आल्या आहेत, अशी चर्चा आता भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू झाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या चार जागांवर भाजपचे आमदार आहेत. असे असतानाही मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे हा मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सोडावा लागला. कल्याण-डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा दबदबा डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या आक्रमक शैलीमुळे फारसा जाणवत नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघातही भाजपचे अधिक आमदार आहेत. येथे कमी जागा असूनही मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा ‘आवाज’ अधिक आहे. ठाणे जिल्ह्यात पंतप्रधानांचा कार्यक्रम होत असताना या नियोजनात मुख्यमंत्र्यांचा पक्ष अधिक सक्रिय दिसला. हा प्रभाव भाजपच्या स्थानिक नेत्यांना फारसा रुचत नसल्याचे चित्र आहे.