मोहन अटाळकर
लोकसभा निवडणुकीदरम्‍यान महायुतीत असूनही भाजपच्‍या उमेदवाराविरुद्ध रणशिंग फुंकणारे आमदार बच्‍चू कडू कायम चर्चेत असतात, त्‍यांच्‍याविषयी….

बच्‍चू कडू कायम चर्चेत का असतात?

महायुतीतील घटक असूनही प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या विरोधात प्रहारतर्फे दिनेश बुब यांना लढतीत आणून बंडाचा पवित्रा घेतला. गृहमंत्री अमित शहा यांच्‍या सभेसाठी प्रहारचे मैदानाचे आरक्षण प्रशासनाने ऐनवेळी रद्द केल्‍याने ते संतापले. मैदानावरच त्‍यांनी आंदोलन सुरू केले. तणाव वाढू नये, म्‍हणून त्‍यांनी माघार घेत पर्यायी मैदान निवडले. पण, यादरम्‍यान त्‍यांचा राणा दाम्‍पत्‍याविषयीचा टोकाचा विरोध उघड झाला. बच्‍चू कडू हे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या बाजूने आहेत. बच्‍चू कडू यांची नाराजी ही केवळ या निवडणुकीपुरती आहे की, त्‍यांना महायुतीच्‍या विरोधात पुढील काळात भूमिका घ्‍यायची आहे, हा प्रश्‍न चर्चेत आला आहे.

बच्‍चू कडू यांचा राजकीय प्रवास कसा?

बच्चू कडू मुळचे शिवसैनिक. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीने भारावून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. चांदूर बाजार पंचायत समितीचे त्यांनी १९९७ मध्ये सभापतीपदही भूषवले. त्यावेळी निकृष्ट शौचालयांच्या निर्मितीचा विषय समोर येताच त्यांनी आंदोलन करून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. दरम्यान, शिवसेनेला रामराम ठोकून त्यांनी ‘प्रहार’ ही संघटना स्थापन केली. अचलपूर मतदार संघातून विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून १९९९ मध्ये लढवली. थोड्या मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. २००४ मध्ये ते पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. यावेळी मात्र अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. तेव्हापासून सलग चार वेळा ते निवडून आले आहेत. २००४ च्‍या लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी शक्ती पणाला लावली. पण, त्यांचा अवघ्‍या १४ हजार मतांनी पराभव झाला होता.

हेही वाचा >>>विश्लेषण : १०० टक्के व्हीव्ही पॅट पडताळणीस नकार… सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणखी काय सांगतो? 

आंदोलक नेता अशी ओळख कशी?

निदर्शने, उपोषण करून प्रश्नांकडे फारसे लक्ष वेधले जात नाही, हे लक्षात आल्यावर बच्चू कडू यांनी अभिनव प्रकारची आंदोलने सुरू केली. ते पंचायत समिती सभापती असताना शौचालयांच्या बांधकामांमध्ये घोटाळा उघड झाला. कारवाई होत नव्हती. म्हणून सरकारच्या पंचायत राज समितीच्या सदस्यांना त्यांनी थेट संडासाचे पॉटच भेट दिले. प्रसार माध्यमांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात २००६ मध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. तत्‍कालीन उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील अखेरीस ८० फूट उंच टाकीवर चढून गेले. तेथे त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्‍यानंतर बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतले. शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांवर त्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली. सरकारला आंदोलनाची दखल घेण्‍यास त्‍यांनी भाग पाडले.

अधिकाऱ्यांसोबत वाद का होतात?

काही वर्षांपुर्वी बच्‍चू कडू हे नाशिक महापालिकेत अपंग कर्मचाऱ्यांच्‍या प्रलंबित मागण्‍यांविषयी जाब विचारण्‍यासाठी गेले तेव्‍हा तत्‍कालीन आयुक्‍त अभिषेक कृष्‍णा आणि त्‍यांच्‍यात खडांजगी झाली. बच्‍चू कडू यांनी थेट आयुक्‍तांच्‍या अंगावर हात उगारला होता. अधिकाऱ्यांसोबत त्‍यांचे अनेक वेळा खटके उडाले. त्‍यानंतर अटक देखील अनेक वेळा अनुभवली. कर्मचाऱ्यांच्‍या विरोधात केलेली निदर्शनेही गाजली. मंत्रालयातील उपसचिव असोत किंवा परतवाडा शहरातील वाहतूक पोलीस असो, अनेकांना संतापाच्‍या भरात मारहाण करणारे बच्‍चू कडू हे त्‍यांच्‍या अशा वागणुकीमुळे संपूर्ण महाराष्‍ट्रात वादग्रस्‍त आहेत. वाहतूक पोलीस मारहाण प्रकरणी त्‍यांना सत्र न्‍यायालयाने २०१८ मध्‍ये सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्‍याला बच्‍चू कडू यांनी आव्‍हान दिले आहे.

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदींविरोधात नोटीस नको म्हणून निवडणूक आयोगाचा बचावात्मक पवित्रा?

सरकारविरोधात तरीही अनेकदा सत्तेत…

बच्‍चू कडू यांनी सातत्‍याने सरकारच्‍या विरोधात आंदोलने केली असली, तरी त्‍यांनी अनेक वेळा सत्तापक्षासोबत राहणे पसंत केले आहे. २०१९ मध्‍ये स्‍थापन झालेल्‍या महाविकास आघाडी सरकारमध्‍ये जलसंपदा, शालेय शिक्षण खात्‍याचे राज्‍यमंत्री म्‍हणून त्‍यांनी काम केले. थेट सत्तेत सहभागी होण्‍याचा ही त्‍यांची पहिली वेळ. त्‍यांनी त्‍यावेळी तत्‍कालीन मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहकार्य केले होते. पण, २०२२ मध्‍ये बंडाच्‍या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यासोबत जाण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती, पण त्‍यापासून ते वंचितच राहिले. अखेरीस त्‍यांच्‍या मागणीनुसार दिव्‍यांगासाठी स्‍वतंत्र मंत्रालय स्‍थापन करण्‍यात आले आणि दिव्यांग कल्याण समितीच्या अध्यक्षपदी त्‍यांची निवड करून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. ‘प्रहार’चे दोन आमदार आहेत. पक्षसंघटनेचा विस्‍तार करण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mohan.atalkar@expressindia.com