एअर इंडियाच्या एका प्रवासी विमानात धक्कादायक घटना घडली. विमानातील प्रवाशाने क्रू मेंबर्ससोबत भांडण केल्यामुळे लंडनला जाणारे विमान दिल्लीच्या विमानतळावर परतले. या भांडणामुळे या विमानोड्डाणाला अनेक तासांचा उशीर झाला. परिणामी याचा फटका अन्य प्रवाशांनाही बसला. मागील काही दिवसांपासून हवाई प्रवासादरम्यान गैरव्यवहाराच्या अनेक घटना घडत आहेत. याच कारणामुळे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएने गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर काय कारवाई करावी? विमानातील कर्मचाऱ्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? याबाबत नव्याने सूचना केल्या आहेत. डीजीसीएने नेमक्या काय सूचना केल्या आहेत? चालत्या विमानात प्रवाशांनी गैरवर्तन केल्यास काय कारवाई केली जाते? हे जाणून घेऊ या.

गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून सूचना जारी

गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी डीसीजीएने १० एप्रिल रोजी हवाई वाहतूक कंपन्यांना नव्याने सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये एखादा प्रवासी गैरव्यवहार, गैरवर्तन करत असेल तर हवाई वाहतूक कंपन्यांनी काय कारवाई केली पाहिजे, याबाबत सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून विमानप्रवासात गैरवर्तनाचे प्रमाण वाढले आहे. याला आळा बसावा म्हणून डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा >>> श्रीलंकेत नव्या दहशतवादविरोधी विधेयकाला होतोय विरोध; नेमक्या तरतुदी काय? नागरिकांचा आक्षेप काय? जाणून घ्या…

क्रू मेंबर्सनी गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावा

चालत्या विमानात मद्य प्राशन करून विमानाताली कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, प्रवाशांमध्येच भांडण होणे, विमानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, विमानात धूम्रपान करणे, विमानातील कर्मचाऱ्यांचा शारीरिक छळ करणे अशा अनेक घटनांची मागील काही महिन्यांमध्ये नोंद झाली आहे. याच कारणामुळे डीजीसीएने काही सूचना जारी केल्या आहेत. अशा घटना घडल्यास विमानातील क्रू मेंबर्सनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे डीजीसीएने म्हटलेले आहे.

जबाबदाऱ्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हायला हवी

डीजीसीएने जारी केलेल्या सूचनांत, एअरक्राफ्ट रुल १९३७ मध्ये विनामातील क्रू मेंबर्सची जबाबदारी काय आहे? याबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे. यामध्ये हवाई वाहतूक कंपनी, या कंपनीशी संबंधित अधिकारी, केबीन क्रू, पायलट, इतर कर्मचाऱ्यांवरील जबाबदारीचीही माहिती देण्यात आली आहे, असे डीजीसीएने म्हटले आहे. तसेच हवाई वाहतूक कंपन्यांच्या प्रमुखांनी केबिन क्रू, पायलट, इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी सांगावे, अशा सूचनाही डीजीसीएने केल्या आहेत. जबाबदाऱ्यांची माहिती फक्त प्रशिक्षणापुरतीच मर्यादित राहू नये. हवाई प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी या जबाबदाऱ्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हायला हवी. विमानाची सुरक्षितता कोणत्याही परिस्थितीत धोक्यात येऊ नये म्हणून शिस्त आणि कायद्याचे पालन व्हायला हवे, असेही डीजीसीएने म्हटले आहे.

हेही वाचा >>> ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्यात रत्नजडित मुकुटासह, राजदंड, गदा, कलश, कडी आणि चमचा का वापरतात?

प्रवाशांनी गैरव्यवहार केल्यावर विमान वाहतूक कंपनीने काय करायला हवे?

विमान प्रवासादरम्यान प्रवाशाने गैरव्यवहार केल्यास काय करावे? याचे काही नियम आहेत. सर्वात अगोदर असा प्रकार घडल्यास क्रू मेंबर्सनी प्रवाशाला नियमांबाबत सांगायला हवे. तसेच नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला अटक होऊ शकते, अशी माहितीही क्रू मेंबर्सनी प्रवाशाला द्यायला हवी. मद्यपान, ड्रग्ज सेवन यामुळे गैरवर्तन करणे, धूम्रपान करणे, पायलटच्या सूचना न पाळणे, क्रू मेंबर्सना धमकी देणे, क्रू मेंबर्सशी आक्षेपार्ह भाषेत बोलणे, क्रू मेंबर्सच्या कामात अडथळा आणणे, अन्य प्रवाशांना धोक्यात टाकणे आदी कृत्ये प्रवाशाचा गैरव्यवहारात गणली जातात. प्रवाशाने यांपैकी कोणतेही कृत्य केल्यास विमान उतरल्यानंतर क्रू मेंबर्सनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. तसेच कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असेही डीजीसीएने आपल्या सूचनेत म्हटले आहे.

हेही वाचा >>> राजकीय पक्षांना ‘राष्ट्रीय दर्जा’ कसा मिळतो? ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष घोषित करताना राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल यांना का वगळले?

प्रवाशांच्या गैरवर्तनाचे वर्गीकरण करायला हवे, असेही डीजीसीएने म्हटले आहे. हे वर्गीकरण तीन प्रकारे केले जाते.

लेव्हल १ – अति मद्यपान, बेलगाम वर्तन, शाब्दिक गैरवर्तन, शारीरिक गैरवर्तन

लेव्हल २ – शारीरिक अपमानास्पद वर्तन, ढकलणे, लाथ मारणे, वस्तू फेकून मारणे, पकडणे, अयोग्य स्पर्श करणे, लैंगिक छळ

लेव्हल ३ – जीवितास धोका निर्माण होईल असे वर्तन करणे, विमानाची तोडफोड करणे, विमानातील यंत्रणेचे नुकसान करणे, शारीरिक हिंसा, डोळ्यांवर मारणे, खुनी हल्ला, फ्लाइट क्रू कंपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारच्या गैरवर्तनाचा लेव्हल ३ मध्ये समावेश होतो.

हेही वाचा >>> विश्लेषण : जलस्रोतांच्या प्रदूषणाची जागतिक दखल का? न्यूयॉर्कमधील जागतिक पाणी परिषदेत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशाने केलेल्या गैरकृत्याचे वरील प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. त्यानुसार विमान वाहतूक कंपनीची अंतर्गत समिती संबंधित प्रवाशावर विमानातून प्रवास करण्यावर किती दिवसांची बंदी घालावी हे ठरवते.