How Did Ancient Indians Look 2,500 Years Ago?: तामिळनाडूमधील मदुराई कामराज विद्यापीठाच्या शांत वातावरणात असलेल्या प्रयोगशाळेत इतिहासाला पुन्हा जिवंत करण्याचं काम सुरू आहे. येथे संशोधक २,५०० वर्षे जुना सापडलेला दात अलगद घासून त्यातील अंश घेत आहेत. हा दात कोंडगाई या पुरातत्त्वीय स्मशानभूमीतून सापडलेल्या एका मानवी कवटीचा भाग आहे. याच कवटीबरोबर आणखी एका पुरुषाची कवटी सापडली आहे. या दोन्ही कवटींचा वापर करून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चेहऱ्यांची पुनर्निर्मित करण्यात आली आहे. फॉरेन्सिक अँथ्रोपॉलॉजी आणि 3D (थ्रीडी) मॉडेलिंगच्या मदतीने संशोधकांनी या प्राचीन भारतीयांचे चेहेरे घडवले आहेत. त्यामुळे २५ शतकांपूर्वी या भूमीत राहणाऱ्या लोकांचे रूप आज आपल्या डोळ्यांसमोर उभे राहिले आहे.
कोंडगाई: मृतांचे प्राचीन शहर
कोंडगाई या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ५० विशाल मडकी सापडली आहेत. या मडक्यांमध्ये मृतांचे अवशेष ठेवलेले होते आणि त्यांच्याबरोबर धान्य, मातीची भांडी व इतर दैनंदिन वस्तूही दफन केल्या जात होत्या. यावरून या समाजातील अंत्यसंस्कार केवळ प्रथेसाठी नसून गूढ धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असलेल्या विधींचा भाग होते हे स्पष्ट होते. कोंडगाई म्हणजे जणू मृतांचे शहर, तर त्याच्या जवळचं किलाडी हे जगणाऱ्या लोकांचे शहर. एकत्रितपणे ही दोन्ही स्थळं एका समृद्ध प्राचीन समाजाचं चित्र आपल्यासमोर उभं करतात.
किलाडी आणि दक्षिणेकडील नागरीकरणाचा प्रश्न
वैगई नदीकिनारी वसलेलं किलाडी हे ठिकाण गेल्या काही वर्षांत भारतातील सर्वात चर्चेत असलेल्या उत्खननांपैकी एक ठरलं आहे. तामिळनाडू राज्य पुरातत्त्व विभागाच्या उत्खननातून इथे सुमारे इ.स.पू. ५८० सालातलं नागरी वस्तीचं अस्तित्व उघड झालं आहे. आजवर भारताच्या प्राचीन नागरीकरणाच्या कथा मुख्यत्वे सिंधू संस्कृतीभोवती फिरत होत्या, जी उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील प्रदेशात ५,००० वर्षांपूर्वी फुलली होती. परंतु किलाडीच्या निष्कर्षांनी ही कल्पना बदलली. येथे स्वतंत्र नागरी समाज अस्तित्वात होता, ज्यांनी विटांची घरं बांधली, भांडी तयार केली, लिपीचा वापर केला आणि उपखंडाबाहेर व्यापार केला, हे पुराव्यांच्या माध्यमातून उघडकीस आणला.
चेहऱ्यांचं पुनर्निर्माण कसं करण्यात आलं?
कोंडगाईतील मानवी कवट्यांनी या कहाणीला नवा आयाम दिला आहे. हाडं फक्त मृतांचे अवशेष नसतात, तर ती त्यांची ओळख, त्यांचं आरोग्य, आहार आणि स्वरूप याबद्दलही माहिती देतात. विद्यापीठातील संशोधकांनी डिजिटल फेशियल रिकन्स्ट्रक्शन पद्धत वापरली. प्रथम कवट्यांचे 3D (थ्रीडी) स्कॅन घेतले. त्यानंतर वैज्ञानिक डेटावर आधारित ऊतक-जाडीचे मोजमाप केले गेले, त्यावरून चेहऱ्यावरील स्नायू व त्वचेचे थर तयार करण्यात आले. हळूहळू कपाळ, गाल, डोळ्यांच्या कडा, नाक आणि ओठ आकारास घेऊ लागले. शेवटी संगणकाच्या पडद्यावर दोन प्राचीन पुरुषांचे वास्तवदर्शी चेहरे उभे राहिले. हे चेहरे शंभर टक्के अचूक असल्याचा दावा करता येत नाही. पण ते शास्त्रीय पद्धतींवर आधारित असल्यामुळे त्या काळातील लोकांचा वास्तविक अनुभव देतात.
जगणं आणि मरणं- दोन्हींचं चित्र
किलाडी आपल्याला त्या काळातील जगण्याची कथा सांगते, तर कोंडगाई मृतांच्या विधींविषयी सांगते. पुनर्निर्मिती करण्यात आलेले हे चेहरे या दोन्ही म्हणजेच जगणाऱ्यांच्या व मृतांच्या जगांना जोडणारे आहेत. ते आपल्याला आठवण करून देतात की, मडक्यांच्या आत, विटांच्या भिंतीमागे आणि भांड्यांच्या शेजारी कधीकाळी खरी माणसं वावरली होती.
का महत्त्वाचं आहे किलाडी?
किलाडी हा केवळ उत्खननाचा विषय नाही, तर तो ओळखीचा आणि इतिहासाच्या राजकारणाचा मुद्दा झाला आहे. तामिळनाडू राज्यातील संशोधकांचा दावा आहे की, ही एक स्वतंत्र तमिळ नागरी संस्कृती होती. यामुळे भारताच्या प्राचीन नागरीकरणाचा प्रवास अधिक गुंतागुंतीचा आणि विविधतेने भरलेला दिसतो.
डिजिटल चेहऱ्यांची ताकद
कोंडगाईतील पुनर्निर्मित चेहरे म्हणजे हाडांना दिलेलं मानवी रूप. विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य लोकांसाठी हे चेहरे इतिहासाला अधिक जवळ आणतात. हे चेहरे वस्तूंपेक्षा अधिक भावनिक संवाद साधतात. तसेच हे कार्य भविष्यातील संशोधनालाही दिशा देऊ शकतं.
सातत्याची झलक
या चेहऱ्यांकडे पाहताना एक प्रश्न उभा राहतो; तो म्हणजे या लोकांचे वारस आजच्या तमीळ समाजात दिसतात का? या भूमीतल्या भाषा, परंपरा आणि सांस्कृतिक सातत्यामुळे काही प्रमाणात ती जोड नक्कीच दिसते. विज्ञान एक दिवस याबद्दल अधिक ठोस उत्तरं देईल, पण आत्तासाठी हे चेहरे म्हणजे भूतकाळाशी थेट नजरेला नजर भिडवण्याचा अनुभव आहेत.
प्राचीन भारताच्या कथेला नवा रंग
किलाडी आणि कोंडगाईच्या शोधांनी भारताच्या प्राचीन इतिहासाची समज आणि व्याप्ती बदलली आहे. आता नागरीकरण हे केवळ उत्तरेकडील सिंधू संस्कृतीपुरतं मर्यादित नसून दक्षिणेतही स्वतंत्रपणे विकसित झालं होतं, हे स्पष्ट होत आहे.
कोंडगाईतील दोन पुरुषांचे पुनर्निर्मित चेहरे हा या प्रवासाचा परमोच्च बिंदू आहेत. हाडांपलीकडे ते आपल्याला वास्तविक माणसांचं दर्शन घडवतात. या माणसांनी २,५०० वर्षांपूर्वी या भूमीत श्वास घेतला, काम केलं आणि स्वप्नं पाहिली होती.
हे प्राचीन चेहरे इतिहासाला माणसाचं रूप देतात. ते सांगतात की, इतिहास म्हणजे केवळ साम्राज्यं आणि ग्रंथ नाहीत, तर तो काळ जगलेले खरेखुरे लोक आहेत. या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आज २५ शतकांपूर्वीचे दोन पुरुष आपल्याकडे परत पाहत आहेत आणि आपल्याला आठवण करून देतात की भूतकाळ कधीच पूर्णपणे संपत नाही.