इस्रायल आणि हमासमधील युद्ध संपुष्टात यावे, यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत. गाझामधील निरपराध पॅलेस्टिनींचे हत्याकांड थांबावे, हमासकडील ओलिसांची सुटका व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांसह अमेरिका, युरोपमधील पाश्चिमात्य राष्ट्रे आणि इजिप्त, कतारसारखी मुस्लिमबहुल राष्ट्रे प्रयत्न करीत आहेत. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही आणि इतक्यात येण्याची शक्यता आहे का, याबाबत अनेकांना शंका आहे. याची कारणे काय, युद्धात प्रचंड नुकसान होत असतानाही शस्त्रसंधी घडविण्यात कुणाची आडकाठी आहे, याचा वेध.

युद्ध थांबविणे नेमके कुणाच्या हाती?

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलमध्ये अतिरेकी घुसवून सुमारे १२०० लोकांना ठार मारले, तर २०० ते २५० नागरिकांचे अपहरण केले. त्यावेळी देशांतर्गत नाराजीला तोंड देत असलेले इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी तातडीने हमासविरोधात युद्ध पुकारले आणि गाझा पट्टीमध्ये सैन्य घुसविले. गेले १० महिने चाललेल्या या युद्धात ४० हजारांवर पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून हे युद्ध थांबावे यासाठी सर्वच जण प्रयत्नशील आहेत. मात्र कुणीही कितीही प्रयत्न केले, तरी युद्ध थांबविणे केवळ दोन लोकांच्या हाती आहे. एक म्हणजे नेतान्याहू आणि दुसरा हमासचा सर्वोच्च नेता याह्या सिनवर… युद्धबंदीचा कोणताही करार अस्तित्वात यायचा असेल, तर त्यावर या दोघांच्या स्वाक्षऱ्या असणे गरजेचे आहे आणि हीच मोठी अडचण आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे दोन्ही नेते एकमेकांचे हाडवैरी आहेत. दोघेही वाटाघाटींमध्ये अत्यंत चिवट आहेत आणि युद्ध थांबवायचेच असेल, तर आपला अधिकाधिक फायदा करून घेण्याचा दोघांचाही प्रयत्न असेल.

हेही वाचा : कर्नाटकच्या कोप्पलमध्ये हिंदू धार्मिक चिन्हे असलेला लॅम्प पोस्ट काढण्याचा आदेश का ठरतोय वादग्रस्त?

नेतान्याहू शस्त्रसंधीला तयार का नाहीत ?

‘हमासचा संपूर्ण नायनाट’ आणि ‘सर्व ओलिसांची सुखरूप सुटका’ अशी दोन आश्वासने देऊन नेतान्याहू यांनी गाझावर हल्ला चढविला होता. मात्र या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणे जवळजवळ अशक्य असल्याची अनेकांची खात्री असल्यामुळेच हमासला आहे त्या स्थितीत सोडून ओलिसांच्या सुटकेसाठी करारा करावा, यासाठी अमेरिकेसह इस्रायली जनतेचा नेतान्याहूंवर वाढता दबाव आहे. मात्र नेतान्याहू यांचे सरकारमधील पाठिराखे हे अतिउजव्या विचासरणीचे असून गाझाचा कायमस्वरूपी ताबा मिळेपर्यंत युद्ध लांबवावे, असे युद्ध मंत्रिमंडळातील काही जणांचे मत आहे. गाझावर नियंत्रण गमावून शस्त्रसंधी केली, तर हे उजवे पक्ष नेतान्याहू सरकारचा पाठिंबा काढतील आणि सरकार पडेल अशी भीती आहे. असे झाल्यास भ्रष्टाचाराच्या आरोपांतून बाहेर पडण्यासाठी घटनादुरुस्तीचे मनसुबे उधळले जातील आणि कदाचित ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यावेळी गुप्तहेर माहितीमध्ये राहिलेल्या त्रुटींची नवे सरकार चौकशी करू शकेल.

सिनवरला करारामधून काय हवे आहे?

अत्याधुनिक शस्त्रांसह रणांगणात उतरलेल्या इस्रायलसमोर हमासची ताकद फारच नगण्य आहे. एकीकडे हजारो पॅलेस्टिनींचा बळी गेला असताना यात हमासचेही हजारो लढवय्ये मारले गेले असून लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे अर्थातच सिनवरलाही झाली तर युद्धबंदी हवीच आहे, पण स्वत:च्या अटींवर… ११० ओलिस हा सिनवरकडे असलेला हुकुमाचा एक्का आहे. यातील एक तृतियांश ओलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला असावा, असे मानले जात असले, तरी अद्याप ही माहिती अधिकृत नसल्याने सध्यातरी सिनवरची मूठ झाकलेली आहे. या ओलिसांना सोडले, तरी इस्रायल युद्ध थांबवेल आणि गाझामधील प्रदेश सोडेल याची सिनवरला खात्री नाही. तसे आश्वासन देण्यास नेतान्याहू तयार नाहीत. कराराचा एक भाग म्हणून इस्रायलच्या तुरुंगांत खितपत पडलेल्या मोठ्या पॅलेस्टिनी अतिरेक्यांची सुटकाही सिनवरला पदरात पाडून घ्यायची आहे.

हेही वाचा : विश्लेषण : प्रबळ शत्रूंनाही युद्धविराम करायला लावणारा पोलिओ… गाझात युद्धापेक्षाही पोलिओचे संकट भयावह?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंतच्या करारांना अपयश का आले?

आतापर्यंत अमेरिका, कतार, इजिप्त आणि युरोपातील जर्मनी-फ्रान्स आदी देशांनी शस्त्रसंधीचे अनेक प्रस्ताव दिले. मात्र दोन्ही बाजूंना पसंत पडेल, असा तोडगा अद्याप निघू शकलेला नाही. विशेष म्हणजे इस्रायलचा पाठिराखा असलेल्या अमेरिकेचे वेगवेगळे प्रस्ताव इस्रायल आणि हमासने मान्य केले असले तरी त्यात काही सुधारणा सुचविल्या आहेत आणि अर्थातच, प्रतिपक्षाला त्या सुधारणा मान्य नाहीत. नेतान्याहू आणि सिनवर एकही पाऊल मागे हटायला तयार नाहीत, हे युद्धसमाप्ती न होण्याचे मुख्य कारण आहे. जखमी नागरिकांचे स्थलांतर किंवा पोलिओ लसीकरण अशा कारणांसाठी तात्पुरते युद्धविराम होत असले, तरी जोपर्यंत दोन्हीकडील नेत्यांना वाटत नाही किंवा एकाचा संपूर्ण पराभव होत नाही, तोपर्यंत गाझा युद्ध सुरूच राहण्याची शक्यता अधिक आहे.
amol.paranjpe@expressindia.com