US airstrike on Iran: अमेरिकेने रविवारी बी-२ स्टेल्थ बॉम्बर्स आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करून इराणच्या फोर्डो, नतान्झ व इस्फहान इथल्या अणुस्थळांवर हल्ला केला. अमेरिकेने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर फॉक्स न्यूजचे निवेदक शॉन हॅनिटी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट चर्चा केली होती. हॅनिटी यांनी सांगितले की, बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी इराणच्या भूमिगत फोर्डो अणुस्थळावरील सहा खंदक उद्ध्वस्त करणारे बी-२ बॉम्ब टाकले. दरम्यान, सुमारे ४०० मैल अंतरावर असलेल्या अमेरिकन पाणबुड्यांमधून ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्रांनी नतान्झ आणि इस्फहान इथल्या अणुस्थळांना लक्ष्य केलं.
टॉमहॉक क्षेपणास्त्र म्हणजे काय?
टॉमहॉक हे एक लांब पल्ल्याचे सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते जमिनीवरील किंवा समुद्रातील लक्ष्यांवर अचूक हल्ल्यंसाठी तयार करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र जहाजांवर हल्ला करण्यासाठी बनविण्यात आले आहे. हे प्रामुख्याने यूएस नेव्ही आणि यूके रॉयल नेव्हीद्वारे वापरले जाते. ही क्षेपणास्त्रे १६०० ते २५०० किमीपर्यंतचे अंतर व्यापतात. ही क्षेपणास्त्रे जहाजे आणि पाणबुड्यांवरून डागता येतात आणि ते कोणत्याही हवामानात कार्य करतात.
टॉमहॉकची वैशिष्ट्ये :
- टॉमहॉक क्षेपणास्त्रांची रेंज २,५०० किलोमीटर इतकी आहे आणि त्यामुळे ते इराणी लक्ष्यांपर्यंत सहज पोहोचू शकले.
- जीपीएस, टेरेन कॉन्टूर मॅचिंग व डिजिटल सीन मॅचिंग एरिया कोरिलेशन) जे अचूक लक्ष्य भेदण्यास मदत करते.
- त्यामध्ये १००० पौंड स्फोटके किंवा क्लस्टर दारूगोळा असतो.
- या क्षेपणास्त्राचा वेग ८८० किमी प्रतितास आहे.
- त्याची कमी उंचीवरून मारा करण्याची क्षमता असल्यामुळेदेखील ते रडारद्वारे शोधले जाण्याची शक्यता कमी होते.
- अचूकतेने मोठ्या भागात मारा करू शकता येते.
२१ जून २०२५ रोजी सकाळी अमेरिकेने नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो अणुस्थळांना लक्ष्य करून एक अतिशय क्लिष्ट आणि गुप्त लष्करी कारवाई सुरू केली. त्यामध्ये नतान्झ, इस्फहान व फोर्डो अणु सुविधांना लक्ष्य करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये यूएसएस जॉर्जियाने काही ठरावीक लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करून ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागली.
१. नतान्झ हे इराणचे सर्वांत मोठे युरेनियम समृद्धीकरण केंद्र आहे. ते ४० मीटर खोलीवर बांधले गेले आहे. ते अण्वस्त्रे तयार करताना युरेनियमच्या वापराकरिता वापरले जाते. यूएसएस जॉर्जिया जहाजावरून डागण्यात आलेल्या टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी नतान्झच्या सुपरस्ट्रक्चर्स आणि भूमिगत सेंट्रीफ्यूज कॅस्केडला लक्ष्य केले. याव्यतिरिक्त एका बी-२ स्टेल्थ बॉम्बरने नतान्झवर दोन जीबीयू-५७ बॉम्ब टाकले.
२. इस्फहान हे युरेनियमचे अणुइंधनात रूपांतर करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. हा इराणच्या अणुकार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. इस्फहानमधील महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य करून टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला गेला. त्यामध्ये सहा इमारतींचे नुकसान झाले. मात्र, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या मते, इथे किरणोत्सर्गी गळती झालेली नाही. इस्फहानमधील भूमिगत संकुल अपेक्षेपेक्षा जास्त खोल आणि मजबूत होते आणि त्यामुळे ते पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता कमीच होती, असे अमेरिकन लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
३. फोर्डो हे अणू सुविधा केंद्र पर्वताखाली ८० मीटरवर आहे. त्यामुळे ते सर्वांत सुरक्षित केंद्र ठरते. सहा बी-२ स्टेल्थ बॉम्बने त्याला लक्ष्य केले होते. हे बॉम्ब खोलवरचे खंदक उद्ध्वस्त करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, फोर्डो केंद्र पूर्णपणे नष्ट झालेय. पण, इस्त्रायली लष्कराच्या रेडिओने सांगितले की, ते केंद्र पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता कमीच आहे.
याआधी टॉमहॉकचा वापर कधी केला?
गल्फ वॉर (१९९१)
कोसोवो संघर्ष
इराक युद्ध (२००३)
सीरिया (२०१७ व २०१८)
ते कसे प्रक्षेपित केले जाते?
प्रगत मार्गदर्शन प्रणाली, कमी अंतरावरून लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता) आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरील किंवा समुद्री लक्ष्यांवर हल्ला करणे अशा वैशिष्ट्यांनिशी टोमहॉक क्षेपणास्त्रे परिपूर्ण आहेत. ते जहाजांच्या पृष्ठभागावरून व्हर्टिकल लाँच सिस्टीम किंवा पाणबुड्यांमधून सोडले जाते. एका सॉलिड रॉकेट बूस्टरचा वापर करून हे क्षेपणास्त्र बाहेर काढले जाते. प्रक्षेपणानंतर बूस्टर वेगळे होते आणि सबसोनिक उड्डाणासाठी टर्बोफॅन इंजिन काम करते.
एकदा या क्षेपणास्त्राने हवेत झेप घेतली की, विविध नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करून ते स्वतंत्रपणे लक्ष्याचा वेध घेऊ शकते. हे क्षेपणास्त्र रडार डिटेक्शन टाळण्यासाठी भूप्रदेशानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून खूप कमी उंचीवर राहू शकते. ब्लॉक IV आणि V क्षेपणास्त्रे उपग्रह डेटा लिंक्स वापरून उड्डाणात पुन्हा लक्ष्य करू शकतात. अंतिम हल्ल्याची खात्री होईपर्यंत ते गरज पडल्यास लक्ष्याजवळील आजूबाजूच्या परिसरात फिरत राहू शकतात. हे क्षेपणास्त्र लक्ष्याजवळ पोहोचताच जीपीएस आणि DSMAC (डिजिटल सीन-मॅचिंग एरिया कोरिलेशन) वापरून, त्याची अचूकता वाढवता येते. त्यानंतर त्याचे वॉरहेड (४५० किलो स्फोटक किंवा दारूगोळा) वितरित करते.
टॉमहॉक हे स्थिर लक्ष्यांसाठी, पायाभूत सुविधांसाठी (विमान क्षेत्र, रडार साइट्स, बंकर) आणि नौदलाच्या लढाऊ जहाजांसाठी डिझाइन केलेले आहे.
अमेरिकेकडे सध्या किती टॉमहॉक आहेत?
अमेरिकेकडे त्यांच्या इन्व्हेंट्रीमध्ये, सुमारे चार हजार टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा साठा आहे. जानेवारी २०२४च्या ऑडिटमध्ये, अमेरिकन नौदलाने आधुनिक ब्लॉक IV आणि V प्रकारांतील सुमारे तीन हजार ७५७ क्षेपणास्त्रे ठेवली आहेत.

अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान – इराण मीडिया
अमेरिकी संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, इस्फहान आणि नतान्झ येथील अनेक अणुभट्ट्या, युरेनियम समृद्धीकरण केंद्र व साठवणुकीचे युनिट्स अंशत: नष्ट करण्यात आले आहेत. इराणी मीडियानुसार, या तळांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत.
इराणच्या अणुऊर्जा संघटनेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. तसेच तेहरानचे म्हणणे आहे की, ही ठिकाणे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या देखरेखीखाली होती आणि अमेरिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता हल्ला करून आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले आहे.
दरम्यान, इस्रायलने अमेरिकेची ही कारवाई आवश्यक असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे या प्रदेशातील तणाव आणखी वाढू शकतो आणि गंभीर धोरणात्मक व राजकीय परिणाम होऊ शकतात. इस्रायलने अमेरिकेच्या या कृतीला आवश्यक असल्याचे सांगत अचूक रणनीती असल्याचे म्हटले आहे. तर, रशिया आणि चीनने याचा तीव्र निषेध केला आहे. टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा हा हल्ला एक स्पष्ट संकेत आहे की, अमेरिका इराणचा अणवस्त्र हल्ला किंवा प्रगती आता सहन करणार नाही आणि गरज पडल्यास आणखी कठोर लष्करी पर्याय स्वीकारेल. परिणामी मध्य पूर्व भाग आणखी एका मोठ्या संघर्षाकडे ढकलला जाऊ शकतो.