संजय जाधव

दीर्घकाळ कोविडचा संसर्ग झाला असेल, तर त्या व्यक्तीच्या आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. दीर्घकालीन कोविडमुळे गोंधळलेपणा, थकवा अथवा स्मृतिभ्रंश अशी लक्षणे काही महिने अथवा वर्षांनंतर दिसून येत आहेत. शरीरातील सेरेटॉनिन या न्यूरोट्रान्समीटरच्या वितरणाच्या पातळीवर परिणाम होत असल्याने हा त्रास होत आहे, असे एका संशोधनातून समोर आले आहे. कोविडच्या दीर्घकालीन संसर्गानंतर अनेक मेंदूविषयक समस्या निर्माण होत असल्याची बाब या संशोधनात मांडण्यात आली आहे.

दीर्घकालीन कोविडमधून बरे झाल्यानंतर बहुतांश रुग्णांमध्ये गोंधळलेपणा, एकाग्रता कमी होणे, विस्मरण, वारंवार थकवा जाणवणे आणि डोकेदुखी ही लक्षणे दिसून येतात. दीर्घकाळ कोविड संसर्ग होण्याची कारणे अद्याप शोधण्यात आलेली नसल्याने ही लक्षणे कमी करण्याचे उपायही विकसित झालेले नाहीत. या संशोधनामुळे हे उपाय नजीकच्या भविष्यात शोधले जाण्याची आशा निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-अन्न, औषध, विजेचा तुटवडा, पॅलेस्टिनींपुढे संकटांचा डोंगर; गाझा पट्टीची सद्यस्थिती काय?

नेमके संशोधन काय?

पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीतील पेरेलमान स्कूल ऑफ मेडिसीनने हे संशोधन केले आहे. हे संशोधन सेल या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. दीर्घकालीन कोविड संसर्गाचे अनेक पैलू अद्याप अस्पष्ट आहेत. त्यामुळे त्याचे निदान आणि त्यावरील उपचार याबाबत प्रभावी पद्धतीने काम झालेले नाही. त्यामुळे या संशोधनातून दीर्घकालीन कोविडच्या परिणांमावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यातून दीर्घकालीन कोविडची कार्यपद्धती काही प्रमाणात समोर आणली आहे. याच वेळी रुग्णांचे वैद्यकीय निदान करण्यास मदत करणे आणि रुग्णांच्या उपचाराचे तपशील वस्तुनिष्ठपणे तपासणे यावर भर देण्यात आला आहे.

संशोधन कशा पद्धतीने?

सूक्ष्मजीवशास्त्र, रोगविज्ञान व औषधी प्रयोगशाळा, औषधनिर्माणशास्त्र व पुनर्वसन, करोनापश्चात मूल्यांकन व उपचार केंद्र या विभागांनी एकत्र येऊन हे संशोधन केले. रुग्णांचे रक्त व मलाचे नमुने तपासण्यात आले. रुग्णांच्या मलामधील करोना विषाणूचे अंश तपासण्यात आले. करोना संसर्ग झाल्यानंतर अनेक महिन्यांनी अनेक व्यक्तींच्या मलामध्ये या विषाणूचे अंश आढळून आले. कारण त्या व्यक्तींच्या पोटामध्ये ते होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीकडून या विषाणूंशी लढण्यासाठी प्रथिने सोडली जात होती. त्यातून दाह निर्माण होऊन पचनसंस्थेमध्ये ट्रिफ्टोफॅन अमिनो ॲसिडचे शोषण कमी झाल्याचे आढळून आले.

सेरोटॉनिनमुळे काय होते?

ट्रिप्टोफॅनचे शोषण पचनसंस्थेमध्ये कमी झाल्यामुळे अनेक न्यूरोट्रान्समीटरवर परिणाम होतो. त्यात सेरोटॉनिनचा समावेश आहे. सेरोटॉनिन हे पचनसंस्थेमध्ये तयार होते आणि तिथून ते मेंदू आणि शरीरातील चेतापेशींपर्यंत संदेश पोहोचविते. त्याचे प्रमुख कार्य हे स्मृती, निद्रा, पचन, जखम बरी करणे आणि शरीरातील आंतरिक स्थैर्य कायम राखणे हे असते. सेरोटॉनिन हे शरीरातील चेतासंस्थेचे महत्त्वाचे नियंत्रक असते. मेंदूत आणि शरीरातील न्यूरॉन्सच्या यंत्रणेमध्ये ते मध्यस्थ म्हणून काम करते. पोटातील विषाणूंमुळे दाह निर्माण होऊन ट्रिप्टोफॅनचे शोषण कमी होऊन सेरोटॉनिनची पातळी कमी होत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे. त्यातून गोंधळलेपणा, विस्मरण, स्मृतिभ्रंशसारख्या समस्या जाणवत आहेत.

आणखी वाचा-‘व्हिसा शॉपिंग’ म्हणजे काय ? युरोपियन देशांमधील प्रवासासाठी हे आवश्यक आहे का ?

रुग्णांचे निदान लवकर होणार?

रुग्णांचे वैद्यकीय अहवाल तपासून आता त्याची लक्षणे वाढत आहेत का, हे ठरवता येईल. याबाबत संशोधनातून काही निकष मांडण्यात आले. त्याआधारे रुग्णाचे मूल्यमापन करता येईल. रुग्णाच्या शरीरातील ट्रिप्टोफॅन अथवा सेरोटॉनिनची पातळी तपासून त्याच्यावर दीर्घकालीन कोविडचे उपचार करता येतील. शरीरातील कमी झालेली सेरोटॉनिनची पातळी आधीच्या पातळीवर आणता येऊ शकते आणि त्यातून स्मृतीवर झालेले परिणामही कमी करता येतात, हा महत्त्वाचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे. याबाबत छोट्या प्राण्यांवर प्रयोग करण्यात आले. त्यातून हे निष्कर्ष समोर आले.

भविष्यातील दिशा काय असेल?

आगामी काळात सेरोटॉनिनची पातळी कमी झालेल्या रुग्णांना उपचारांना मिळणारा प्रतिसाद संशोधकांना तपासता येणार आहे. याच वेळी ट्रिप्टोफॅनच्या शोषणावर विषाणू संसर्गामुळे होणारा परिणाम तपासण्याची संधी आता संशोधकांना या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. याचबरोबर ट्रिप्टोफॅनच्या शरीरातील घटकांवर होणारा परिणामही अभ्यासता येणार आहे. आताचे संशोधन हे केवळ सेरोटॉनिनवर जास्त लक्ष देणार असले, तरी ट्रिप्टोफॅन हे निआसिनसह अनेक पाचकद्रव्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यातून शरीर अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करते आणि संप्रेरके नियंत्रणात ठेवते. या संशोधनालाही आगामी काळात चालना मिळणार आहे. याच वेळी दीर्घकालीन कोविडमुळे प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येण्याची कारणेही संशोधकांना शोधता येतील.

sanjay.jadhav@expressindia.com