Drinking Lots of Water Really Help Kidneys? आपण घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे रोगराईला आळा बसतो आणि घरही नीटनेटके दिसते. तसंच आपल्या शरीराचंही आहे. या शरीररूपी घराचं संतुलन राखण्यासाठी मेंदूपासून हृदयापर्यंत तसेच किडनीपर्यंत प्रत्येक अवयव अखंडपणे काम करत असतो. पण, या साखळीतील एखाद्या अवयवात बिघाड झाला, तरी संपूर्ण शरीराचं संतुलन कोलमडतं.
किडनीच्या जबाबदाऱ्या
किडनी किंवा मूत्रपिंड हा असाच एक शांत पण अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. निरोगी किडनी दर मिनिटाला सुमारे अर्धा कप रक्त फिल्टर करून शरीरातील विषारी पदार्थ व जास्तीचं पाणी बाहेर टाकते आणि मूत्र (लघवी) तयार करते. रक्तातील विषारी द्रव्यं गाळणं, पाणी-खनिजांचं संतुलन राखणं, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणं, हाडं आणि रक्तनिर्मितीची काळजी घेणं या सगळ्या जबाबदाऱ्या किडनी दररोज अचूक पार पाडते.
जास्त पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी चांगलं असतं का?
म्हणूनच, निरोगी शरीर ठेवण्यासाठी आणि किडनी नीट कार्यरत राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या असा सल्ला नेहमी दिला जातो. पण, प्रश्न असा आहे की, जास्त पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी चांगलं असतं का?, त्यामुळे खरंच किडनीचं आरोग्य राखलं जात का? याचं प्रश्नाचा घेतलेला हा आढावा.
जलसंतुलन राखण्यासाठी आवश्यक घटक
आपल्या शरीरातील पाण्याचं संतुलन (Water Balance) हे आरोग्याचं एक अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचं मापन आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला योग्य प्रमाणात पाणी आवश्यक असतं; मात्र त्याचं प्रमाण जास्त किंवा कमी झालं, तरी शरीरात असंतुलन निर्माण होतं. हे संतुलन मुख्यतः तीन घटकांवर अवलंबून असतं;
पाण्याचं सेवन (Intake)
दररोज पाणी, पेय, फळं, भाज्या, सूप किंवा इतर द्रव पदार्थ या सर्वांमधून शरीरात पाणी प्रवेश करतं. हेच पाणी शरीरातील जैवरासायनिक प्रक्रिया, पचनक्रिया, रक्ताभिसरण आणि तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी वापरलं जातं. गरम व दमट हवामानात राहणाऱ्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात घाम येत असल्याने पाण्याचं सेवन वाढवणं आवश्यक असतं.
पाण्याचं उत्सर्जन (Excretion)
किडनी, आतडे, त्वचा आणि फुफ्फुसे ही शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकणारी नैसर्गिक प्रणाली आहेत.
- किडनी: रक्त फिल्टर करून अतिरिक्त पाणी आणि विषारी द्रव्यं बाहेर टाकते.
- त्वचा: घामाद्वारे पाणी बाहेर टाकते.
- आतडे आणि फुफ्फुसे: मलोत्सर्जन व श्वसनातून सूक्ष्म प्रमाणात पाण्याचे उत्सर्जन करतात.
- यांच्यापैकी एकाच जरी कार्य बिघडलं तरी शरीरात द्रवपदार्थांचं प्रमाण असंतुलित होतं.
रक्त पंप करण्याची हृदयाची क्षमता (Heart’s Pumping Ability)
- हृदय हे शरीरात रक्तप्रवाह राखणारं केंद्र आहे.
- हृदय नीट कार्य करत असेल तर पाणी आणि रक्ताचं वहन योग्य पद्धतीने होतं.
- परंतु हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यास, शरीरात द्रव साठू लागतं, विशेषतः पाय, पोट किंवा फुफ्फुसांमध्ये सूज (Edema) दिसू शकते.
संतुलन बिघडल्यास काय होतं?
डॉ. पी. एस. वली, वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट (Asian Institute of Nephrology and Urology) यांनी टाइम्स नाऊशी बोलताना सांगितलं की; “जेव्हा पाण्याचं सेवन कमी होतं किंवा उत्सर्जन प्रणाली; जसं की किडनी, आतडे आणि त्वचा शरीरातून जास्त प्रमाणात पाणी बाहेर टाकतात, तेव्हा व्यक्ती डिहायड्रेशनच्या अवस्थेत जाते.” “याउलट, जेव्हा पाण्याचं सेवन उत्सर्जन प्रणालीच्या क्षमतेपेक्षा जास्त होतं, तेव्हा व्यक्ती ओव्हरहायड्रेशन किंवा वॉटर टॉक्सिसिटीच्या अवस्थेत पोहोचते,” असं ते पुढे स्पष्ट करतात.
उष्णकटिबंधीय देशांमध्ये राहणाऱ्यांसाठी पाणी पिण्याचं प्रमाण
- डॉ. वली यांच्या मते, उष्णकटिबंधीय देशांमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने दररोज सुमारे २.५ ते ३ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. गरम आणि दमट वातावरणात काम करणाऱ्या व्यक्तींना अतिप्रमाणात घाम येतो हे लक्षात घेऊन, त्यानुसार पाण्याचं सेवन अधिक वाढवायला हवं, असं ते सांगतात.
- “ज्यांना डिहायड्रेशन होतं, म्हणजे अतिसार (diarrhoea) किंवा ओकाऱ्यांमुळे (vomiting) शरीरातील द्रवपदार्थ कमी झालेले असतात, त्यांनी ओरल (तोंडावाटे) किंवा इंट्राव्हेनस (IV) मार्गाने द्रवपदार्थांची भरपाई करावी, असं ते पुढे म्हणाले.”
पाण्याचं संतुलन का महत्त्वाचं आहे?
पाण्याचं संतुलन राखणं अत्यंत गरजेचं आहे, किडनीमध्ये दर तासाला सुमारे ८०० ते १००० मिलीलीटर पाणी बाहेर टाकण्याची विलक्षण क्षमता असली, तरी या मर्यादेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
…तर पाण्याची विषबाधा होते
- अति प्रमाणात पाणी प्यायल्याने वॉटर इंटॉक्सिकेशन म्हणजेच पाण्याची विषबाधा होऊ शकते. यामुळे रक्तातील सोडियमचं प्रमाण कमी होतं, ज्याला डायल्यूशनल हायपोनेट्रेमिया म्हणतात.
सोडियम हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आणि त्याच्या रचनेसाठी अत्यावश्यक घटक आहे. - डॉ. वली सांगतात, “जेव्हा रक्तातील सीरम सोडियमचे प्रमाण कमी होते, तेव्हा मेंदूच्या पेशी सूजतात, आणि कधी कधी ही अवस्था सिरिब्रल एडिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत धोकादायक वैद्यकीय स्थितीत पोहोचते.”
मेंदूवर पाण्याच्या असंतुलनाचा परिणाम
- मेंदूला सूज (Brain swelling) आल्यास त्याची सुरुवात सतत उलट्या (intractable vomiting), आकडी (seizures) अशा लक्षणांपासून होते. अत्यंत गंभीर अवस्थेत, रक्तातील सोडियमचं प्रमाण अचानक कमी झाल्यास मेंदूला हानी (brain damage) पोहोचू शकते आणि रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो.
- किडनी फिल्टर म्हणून व्यवस्थित कार्य करत नसते, तेव्हा थोडंसं जास्त पाणी पोटात गेलं तरी वॉटर इंटॉक्सिकेशन होऊ शकतं. शरीरातील नैसर्गिक जलसंतुलन बिघडतं तेंव्हा अशी परिस्थिती उद्भवते.
पाण्याबाबतचे गैरसमज (Myths Related to Water)
- पाण्याच्या विषबाधेसंदर्भात (Water Intoxication) संदर्भात अनेक धोकादायक गैरसमज आहेत.
मोठ्या प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनी पुन्हा पूर्ववत काम करू लागते किंवा किडनीतील फिल्टर स्वच्छ होतात, असा गैरसमज आहे. - डॉ. वली सांगतात, “हा अनुभव प्रत्येक नेफ्रोलॉजिस्टला येतो, किडनी फेल्युअरशी झगडणारे अनेक रुग्ण, किडनीला बरं करण्याच्या प्रयत्नात अतिप्रमाणात पाणी पितात, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. ही पद्धत त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरते.”
अतिप्रमाणात पाणी पिण्याचे दुष्परिणाम
किडनी फेल्युअर असलेल्या रुग्णांनी अतिप्रमाणात पाणी प्यायल्यास, शरीरात वॉटर टॉक्सिसिटी (पाणी विषबाधा) निर्माण होते. यामुळे रक्तातील सोडियमचं प्रमाण कमी होतं, तसेच फुफ्फुसांमध्ये पाण्याचा साठा (fluid accumulation in lungs) होतो. ही अवस्था कधी कधी जीवघेणी ठरू शकते. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला पल्मोनरी एडिमा (Pulmonary Edema) असं म्हटलं जातं. त्यामुळे पाणी प्रमाणात पिणे आवश्यक आहे.
