गाझापट्टीतील हमास संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर मागच्या दीड महिन्यापासून इस्रायल गाझापट्टीतून हमासचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी गाझापट्टीवर सतत बॉम्बवर्षाव केला गेला. त्यानंतर जमिनीवरून हल्ले सुरू झाले. गाझामधील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयावरही इस्रायलने हल्ला चढविला असून या रुग्णालयात हमासचा तळ असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. इस्रायल संरक्षण दलाने (Israel Defense Forces – IDF) गाझापट्टीतील जमिनीखाली मोठ्या प्रमाणात असलेले भुयाराचे जाळेही उदध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. ‘गाझा मेट्रो’ या नावाने ओळखले जाणारे भुयारांचे जाळे वापरून हमासचे दहशतवादी लपून राहत होते. या भुयारात हमासने शस्त्र, अन्न आणि इंधनाचा साठा करून ठेवला आहे. इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यापासून संरक्षण देणे आणि इस्रायली सैनिकांवर अचानक हल्ला करण्यासाठीही भुयारांचा वापर होत होता. हमासने चक्रव्यूहाप्रमाणे रचलेले भुयारांचे जाळे उदध्वस्त करण्यासाठी इस्रायल अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> गाझापट्टीतील भूमिगत बोगदे उद्ध्वस्त करणे इस्रायलसाठी आव्हानात्मक का आहे?

गाझाच्या जमिनीखाली असलेल्या भुयारांमध्ये हमासचे दहशतवादी लपलेले आहेत, असा आरोप करून इस्रायली सैन्याने हे जाळे उदध्वस्त केले असून त्याखाली लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि. १७ नोव्हेंबर) इस्रायली सैन्याने अल-शिफा रुग्णालयाच्या इमारतीखाली भुयार सापडल्याचा एक व्हिडीओ एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केला.

जमिनीखालील भुयार शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

हमासने जमिनीखाली तयार केलेली भुयारे शोधण्यासाठी इस्रायल सैन्याने जटिल तंत्रज्ञान वापरले आहे. गाझामध्ये गुप्तहेर नसल्यामुळे इस्रायलकडून देखरेख करणाऱ्या ड्रोन्सचा वापर होत आहे. तसेच जिवंत प्राणी भुयाराच्या आतमध्ये सोडून दुसऱ्या बाजूला भुयाराचे प्रवेशद्वार कुठे आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. उपग्रहाचा वापर करून जमिनीखालील भुयाराचे जाळे शोधण्याचाही प्रयत्न इस्रायलने करून पाहिला. भूरूपशास्त्रज्ञ जोएल रोस्किन यांनी इस्रायल सैन्यामध्ये काम करत असताना भुयाराचे जाळे शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी द इकॉनॉमिस्ट या वृत्तसंस्थेला सांगितले की, इस्रायलने गाझावर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले केल्यामुळे इमारतींचा आणि घरांचा ढिगारा जमिनीवर पसरला आहे. त्यामुळे उपग्रहाला जमिनीखालील भुयारांचे जाळे अचूकपणे शोधता येणार नाही.

या दोन पद्धतीशिवाय इस्रायल जमिनीला भेदणाऱ्या रडारचाही वापर करत आहे. यामुळे जमिनीखाली भुयार आहे की नाही, याचा शोध घेतो येतो.

“गाझा मेट्रो”ला पूर्णपणे नष्ट करण्याचे इस्रायलचे डावपेच

तज्ज्ञांच्या मते जमिनीखालील भुयार शोधणे आव्हानात्मक आहेच. त्याशिवाय ते शोधल्यानंतर त्याचा माग काढून ते सर्व नष्ट करण्याचेही वेगळे आव्हान आहेच. जमिनीखाली लांबवर पसरलेल्या भुयाराचा नकाशा तयार करण्यासाठी आणि ते उदध्वस्त करण्यासाठी इस्रायली सैन्यांकडून हल्ल्यासाठी तयार केलेले आक्रमक कुत्रे, मानवरहित वाहन आणि रोबोट्सचा वापर सुरू केला आहे. हमासने या भुयारांमध्ये सापळे रचून ठेवल्याची शंका असल्यामुळे इस्रायलने आपल्या सैन्यांना आतमध्ये उतरविणे टाळले आहे. इस्रायलच्या एका सैन्य अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही भुयारात खाली उतरणार नाही. आमच्यासाठी अनेक बॉम्ब पेरून ठेवलेले असू शकतात, याची आम्हाला कल्पना आहे. न्यूयॉर्क शहरातील सबवेपेक्षाही कितीतीरी पटीने ते अधिक जटिल आहेत.

भुयारात सैनिकांना उतरविण्याखेरीज इस्रायली सैन्याकडून नाविन्यपूर्ण आणि कल्पक पद्धती राबविल्या जात आहेत. भुयारांचे प्रवेशद्वार बंद करून त्यांना नष्ट केले जात आहे. यासाठी स्फोटक द्रव्यपदार्थांचा (exploding gel) वापर केला जात आहे.

हे वाचा >> हमासने गाझा पट्टीत तयार केलेले भूमिगत बोगदे कसे आहेत? इस्रायलने VIDEO शेअर करत दिली माहिती

इस्रायली सैन्यांनी भुयारामधून हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी स्पंज बॉम्बचा वापरही केला आहे. आधुनिक युद्ध तंत्रामध्ये स्पंज बॉम्बचा मोठ्या कुशलतेने वापर होत आहे. स्पंज बॉम्ब ही रासायनिक प्रक्रिया असून दोन रसायने एकत्र केल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात जाड असा फेस तयार होतो. हा फेस वेगाने इतरत्र पसरतो. हा फेस बॉम्बस्फोटासारखा नसला तरी त्यामुळे मोकळी जागा वेगाने व्यापली जाते. ज्यामुळे, भुयारात लपलेल्या दहशतवाद्यांना ते स्थान सोडून इतरत्र पळावे लागेल. भुयाराच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना इस्रायलचे सैनिक त्यांचा वेध घेऊ शकतील.

रॉयटर्सशी बोलत असताना इस्रायली सैनिक अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, इस्रायली सैनिकांकडून आणखी नाविन्यपूर्ण कल्पनांचा विकास केला जात आहे, ज्या आगामी काळात दिसतील. सैन्याने दिलेल्या माहितीनुसार भुयारामध्ये उतरण्यासाठी असलेले १३० बीळ (shafts) नष्ट करण्यात आले आहेत. पण, किती भुयार नष्ट झाली याची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.

“गाझा मेट्रो”ची दहशत

१९८० च्या दशकात गाझापट्टीच्या जमिनीखाली सर्वप्रथम बोगदे खणण्यात आले, असे सांगितले जाते. जमिनीखालील भुयार/बोगद्यांमुळेच वेस्ट बँकपेक्षाही हमास संघटन गाझामध्ये अधिक शक्तिशाली झाले. एका माणसाला जेमतेम उभे राहून चालता येईल, एवढ्या आकाराची ही भुयारं आहेत. इस्रायलच्या बंकर बस्टिंग बॉम्बपासून सुरक्षित राहण्यासाठी या भुयारांची खोली १३० फूट किंवा ४० मीटर खोलवर असल्याचे सांगितले जाते.

आणखी वाचा >> ‘अल शिफा’ रुग्णालयाचे युद्धभूमीत रूपांतर; गाझा शहरात नेमके काय घडतेय? जाणून घ्या….

या बोगद्यांमध्ये वीज, इंटरनेट आणि टेलिफोन लाईन्सच्या केबल आणि वायरचेही जाळे आहे. हमासच्या दहशतवाद्यांना यामुळे संपर्काची सर्व व्यवस्था बोगद्यात उपलब्ध होते. अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, हमासच्या दहशतवाद्यांकडे निरीक्षण आणि शोध उपकरणे असू शकतात, ज्यामुळे इस्रायली सैनिक कुठे पोहोचले आहेत हे त्यांना कळू शकते. ज्यामुळे ते दुरूनच स्फोटकाच्या सहाय्याने इस्रायली सैनिकांवर हल्ला करू शकतात.

२०१३ पूर्वी जेव्हा इजिप्तने सीमेपलीकडून होणारी तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा १२ किमीच्या इजिप्त-गाझा सीमेवर जवळपास २,५०० बोगदे असल्याचे समोर आले. या बोगद्यांमधून रोज ५०० टन लोखंड आणि ३,००० टन सिमेंटची तस्करी केली जात होती. गाझापट्टीची अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आणि गाझामधील लोकांच्या अस्तित्वासाठी या भूसुरुंगाने मोठी जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच भूसुरुंग बांधण्यासाठी आणि त्यांची देखभाल ठेवण्यासाठी हमासने लाखो डॉलर्स खर्च केले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dogs robots and sponge bombs how israel is tracking and destroying hamas tunnels kvg
First published on: 18-11-2023 at 17:09 IST