ट्रम्प यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष व्हायचेय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांमध्ये याविषयी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विधाने केलेली आहेत. त्यांनी २७ ऑक्टोबर रोजी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘मी याविषयी विचार केलेला नाही, पण माझ्या नावाला सर्वाधिक पसंती आहे,’ असे विधान केले होते. न्यूयॉर्क महापौर निवडणूक, तसेच न्यूजर्सी आणि व्हर्जिनिया या राज्यांच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. त्यावर ट्रम्प यांची प्रतिक्रिया होती, ‘मतपत्रिकेवर माझे नाव नव्हते’! एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, ‘काही तरी मार्ग नक्की निघू शकतो’ असे विधान केले होते. ‘ट्रम्प ऑर्गनायझेशन’ या संघटनेने ‘ट्रम्प २०२८’ असे रेखाटलेल्या टोप्यांची विक्री सुरू केली असून तीस तुफान प्रतिसाद मिळत आहे.
अमेरिकेच्या घटनेत कोणती तरतूद?
अमेरिकेच्या घटनेत २२व्या घटनादुरुस्तीने अध्यक्षीय कार्यकाळाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अध्यक्षांना दोनपेक्षा अधिक कार्यकाळ निवडून येता येणार नाही, अशी तरतूद १९५१ मधील या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली. त्यापूर्वी फ्रँकलीन रुझवेल्ट हे १९३२-३६, १९३६-४०, १९४०-४४ असे तीन कार्यकाळ अध्यक्षपदावर होते. चौथ्या टर्मच्या सुरुवातीला म्हणजे १९४५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून जवळपास प्रत्येक अध्यक्षाने स्वत:हूनच दोन कार्यकाळांची मर्यादा घालून दिलेली आहे. १९५१ मधील घटनादुरुस्तीने या परंपरेला कायद्याचे अधिष्ठान मिळाले. या घटनादुरुस्तीमध्ये उपाध्यक्षांबाबतही महत्त्वाची तरतूद आहे. एखाद्या उपाध्यक्षाला अपवादात्मक परिस्थितीत अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावी लागली, तर त्यास आणखी दोन वेळा अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येईल. पण यासाठी त्याच्या उपाध्यक्षपदाच्या मुदतीचा अर्ध्याहून अधिक काळ पूर्ण झालेला असला पाहिजे. लिंडन जॉन्सन यांना अशी संधी चालून आली होती. १९६३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या झाली, त्यावेळी जॉन्सन यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या मुदतीचे १४ महिने शिल्लक होते. पुढे १९६५ ते १९६९ जॉन्सन अध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र दुसऱ्या टर्मसाठी निवडणूक लढवण्यास त्यांनीच नकार दिला.
ट्रम्प यांच्यासाठी घटनादुरुस्ती शक्य आहे का?
ट्रम्प यांना तिसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणूक लढवायची असेल, तर पुन्हा घटनादुरुस्ती आणावी लागेल. ते सोपे नाही. कारण प्रतिनिधिगृह आणि सेनेट अशा दोन्ही सभागृहांमध्ये अशी घटनादुरुस्ती दोन तृतियांश बहुमताने संमत व्हावी लागेल. याशिवाय ५० राज्यांपैकी ३८ राज्यांच्या कायदेमंडळांमध्येही ती संमत करून आणावी लागेल. सध्या रिपब्लिकनांकडे प्रतिनिधिगृहात २१८-२१३, आणि सेनेटमध्ये ५३-४७ असे बहुमत आहे. दोन्ही सभागृहांतील रिपब्लिकन मते घटनादुरुस्तीसाठी पुरेशी नाहीत. याशिवाय ५० पैकी २८ राज्यांच्या कायदेमंडळांमध्येच रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. शिवाय विद्यामान निवडणुकांचा कल लक्षात घेता असे करणे रिपब्लिकन पक्षाला राजकीय दृष्ट्या गैरसोयीचे ठरू शकते.
ट्रम्प पळवाटेच्या शोधात?
ट्रम्प दोन खंडित कार्यकाळ भूषवणारे अमेरिकेच्या इतिहासातील केवळ दुसरेच अध्यक्ष. २०१६-२० पाठोपाठ आता २०२४-२८ असे दोन विनासलग कार्यकाळ ते अध्यक्ष असतील. यापूर्वी ग्रोव्हर क्लीव्हलँड १८८५-८९ आणि १८९३-९७ असे दोन कार्यकाळ अध्यक्ष होते. आता तीन कार्यकाळ ट्रम्प अध्यक्ष बनू शकतात का याविषयी चाचपणी त्यांच्या काही समर्थकांनी केली. पण घटनादुरुस्तीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जो अनुकूल नाही. अशा वेळी उपाध्यक्षपदाच्या मार्गाने ट्रम्प अध्यक्ष होतील का, हे पडताळून पाहिले जात आहे. आगामी निवडणुकीत विद्यामान उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी अध्यक्ष म्हणून निवडून यायचे. मग व्हान्स यांनी ट्रम्प यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करायची आणि त्यानंतर राजीनामा द्यायचा, याविषयी खल झाला. तशा स्वरूपाची शक्यता ट्रम्प यांनी एका टीव्ही मुलाखतीत बोलूनही दाखवली. पण येथे अमेरिकेच्या घटनेतील १२ वी घटनादुरुस्ती आड येते. या घटनादुरुस्तीमध्ये स्पष्ट म्हटले आहे, की जी व्यक्ती अध्यक्षपदासाठी अपात्र, ती उपाध्यक्षपदासाठीही अपात्र ठरेल. त्यामुळे हा आडमार्गही ट्रम्प यांच्यासाठी सोपा दिसत नाही. मात्र त्यांच्या समर्थकांना अजूनही आशा वाटते. न्यायालयात हा वाद गेल्यास तेथे कदाचित अनुकूल प्रतिसाद मिळू शकेल, अशी त्यांतील काहींना तर खात्री आहे.
