अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनीला खरेदी केले आहे. मालकी हक्क मिळाल्यानंतर मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यांनी ट्विटरचे सिईओ यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना काढून टाकले असून ट्विटरचे संचालक मंडळही बरखास्त केले. त्यानंतर आता ट्विटर ही कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवरून डीलिस्ट होणार असून त्यानंतर या कंपनीचे पूर्ण खासगी कंपनीत रुपांतर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी काळात ट्विटर कंपनीत कोणकोणते बदल होऊ शकतात, त्यावर नजर टाकुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विश्लेषण : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली ‘टू फिंगर टेस्ट’ नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या

एलॉन मस्क यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स देऊन ट्विटर कंपनीला खरेदी केले आहे. आता ही कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवरून डीलिस्ट केली जाणार आहे. ट्विटरकडून तसे यूएस सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनला कळवण्यात आले. या निर्णयानंतर आता सार्वजनिक भागधारकांना ट्विटरचे शेअर खरेदी करता येणार नाहीत. हा निर्णय घेतल्यानंतर मस्क यांना बराच फायदा होणार आहे. या निर्णयानंतर त्यांना कंपनीच्या कामगिरीची माहिती सार्वजनिक भागदाधारकांना देण्याची गरज भासणार नाही. तसेच शेअर बाजारातून डीलिस्ट केल्यानंतर मस्क यांचे ट्विटरवर पूर्णपणे नियंत्रण असेल. या निर्णयानंतर मस्क यांना ट्विटर कंपनीसंबंधीचे नियम, आर्थिक बाबी, तसेच धोरण ठरवताना सार्वजनिक गुंतवणूकदारांचे मत लक्षात घेण्याची गरज भासणार नाही.

हेही वाचा >>> विश्लेषण: गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत, म्हणजे नेमकं काय होणार? त्याला विरोध का होतोय?

ट्विटरच्या शेअरचे काय होणार?

येत्या ८ नोव्हेंबरपासून ट्विटर कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवरून डीलिस्ट केली जाणार आहे. त्यानंतर सामान्य गुंतवणूकदार ट्विटरमध्ये शेअरच्या रुपात गुंतवणूक करू शकणार नाहीत. सप्टेंबर महिन्यात ट्विटरच्या समभागधारकांनी कंपनी मस्क यांना विकण्यास मान्यता दिलेली आहे. ट्विटरचा प्रत्येक शेअर मस्क यांना ५४.२० डॉलरला विकण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना शेअर्सचा बदल्यात पैशांची मागणी करता येणार आहे.

ट्विटरच्या संचालक मंडळाचं काय झालं?

ट्विटर कंपनी खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्विटरचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. लवकरच ते नवे संचालक मंडळ स्थापन करण्याची शक्यता आहे. कायद्यानुसार ही प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे. यामध्ये मस्क यांचे मित्र, तसेच अन्य गुंतवणूकदारांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. नव्या संचालक मंडळाची स्थापना झाल्यानंतर याच मंडळाच्या नेतृत्वाखाली ट्विटरच्या आगामी योजना आखल्या जातील.

हेही वाचा >>> विश्लेषण: राहुलचे अपयश, क्षेत्ररक्षणातील चुका महागात? आफ्रिकेविरुद्ध भारताच्या पराभवामागे काय कारणे?

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे काय झाले?

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा मालकी हक्क मिळवताच मोठे निर्णय घेतले आहेत. संचालक मंडळ बरखास्त करण्यासोबतच त्यांनी काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल आदी अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. ट्विटर खरेदी प्रक्रिया पार पाडताना मस्क आणि अग्रवाल यांच्यात काही मुद्द्यांवरून वाद झाला होता. ट्विटरवरच त्यांनी एकमेकांना प्रत्युत्तरही दिले होते. आता सीईओ पदावरून हटवल्यानंतर अग्रवाल यांना ६० दशलक्ष डॉलर्स मिळणार आहेत. तर नेड सेगल यांना ४६ दशलक्ष डॉलर्स मिळणार आहेत. गड्डे यांना २० दशलक्ष डॉर्लस मिळतील.

हेही वाचा >>> विश्लेषण : ५ जी लॉंन्च झाले मात्र अद्याप सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचली नाही, कारण काय?

ट्विटरच्या ७५०० कर्मचाऱ्यांचे काय?

२०२१ च्या अखेरीस ट्विटरची एकूण कर्मचारी संख्या ७,००० पेक्षा जास्त होती. यापैकी एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे जवळपास २,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. मस्क यांनी या आधी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबतच्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्ताला फेटाळलेले आहे. तथापि, ताज्या घडामोडींवर ट्विटरकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा >>> विश्लेषण : ट्विटरची मालकी एलॉन मस्ककडे, आता पुढे काय? तुमचा डेटा सुरक्षित राहणार का?

मस्क यांच्यावर कोणाचा दबाव असेल ?

ट्विटरचे खासगी कंपनीत रुपांतर झाल्यानंतर मस्क हे ट्विटरमधील सर्व व्यवहार तसेच धोरणविषयक निर्णय घेताना समभागधारकांना उत्तरदायी नसतील. मात्र त्यांच्यावर इतर दबाव असेल. मस्क यांना १२.५ अब्ज डॉलर्स कर्ज देणाऱ्या बँकाच्या दबावाला सामोरे जावे लागणार आहे. ट्विटरचा करार पुढे नेण्यासाठी मस्क यांनी इक्विटी इन्हेस्टर्सकडून साधारण ७.१ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतलेले आहे. यांचादेखील मस्क यांच्याववर दबाव असेल. त्यामुळे मस्क यांना योग्य आणि किफायतशीर धोरण बनवणाऱ्या तसेच चांगला फायदा मिळवून देणाऱ्या व्यवस्थापकाची गरज असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk twitter takeover what will happen to share and employees prd
First published on: 01-11-2022 at 17:05 IST