युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनचा बचावपटू मार्क कुकुरेलाच्या हाताला चेंडू लागल्यानंतरही जर्मनीला पेनल्टी बहाल न करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात स्पेनने अतिरिक्त वेळेत २-१ अशी बाजी मारली. त्यामुळे जर्मनीच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पंचांनी जर्मनीला पेनल्टी का दिली नाही आणि गोलकक्षात हाताला चेंडू लागल्यावर (हँडबॉल) कशा पद्धतीने पेनल्टी दिली जाते याचा आढावा. त्या क्षणी नेमके काय घडले? अत्यंत चुरशीने सुरू असलेला सामना नियोजित वेळेत १-१ असा बरोबरीत होता. आक्रमण आणि गोल करण्याच्या संधी या आघाडीवर जर्मनीने एकवेळ स्पेनवर वर्चस्व राखले होते. सामन्यातील उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अशा वेळी अतिरिक्त वेळेतील पहिल्या सत्रात जर्मनीच्या जमाल मुसियालाने गोलकक्षाच्या बाहेरून गोलपोस्टच्या दिशेने ताकदवान किक मारली होती. चेंडू गोलकक्षात उभ्या असलेल्या स्पेनच्या कुकुरेलाच्या थेट हाताला लागला. जर्मनीचे खेळाडू, तसेच प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन पेनल्टीची मागणी करत होते. त्या वेळी मैदानावरील पंच ॲन्थनी टेलर आणि ‘व्हीएआर’ किंव्हा व्हिडिओ पंच स्टुअर्ट ॲटवेल यापैकी एकानेही जर्मनीला पेनल्टी देण्याचा निर्णय घेतला नाही. पंच टेलर यांनी मैदानावरील साहाय्यकांशी चर्चाही केली आणि अखेर खेळ सुरू ठेवण्याचा आदेश दिला. हेही वाचा : ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो? हँडबॉल पेनल्टी देण्याचा नियम काय आहे? आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम जसे मेरीलिबोन क्रिकेट क्लब ठरवते, तसेच फुटबॉलचे नियम आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना मंडळ (आयएफएबी) ठरवते. एखाद्या संघाच्या गोलकक्षात (पेनल्टी बॉक्स) जेव्हा त्या संघाच्या फुटबॉलपटूच्या हाताला चेंडू लागतो, तेव्हा पंचाच्या वतीने थेट हँडबॉल पेनल्टी किक दिली जाते. मात्र, हाताला चेंडू कशा पद्धतीने लागला याचाही पंचांना विचार करावा लागतो. गोलकक्षात हँडबॉलचे नियम काय? जेव्हा आपल्या गोलकक्षात खेळाडू चेंडूला मुद्दाम स्पर्श करतात. म्हणजेच हात चेंडूच्या दिशेने नेतात. खेळाच्या वेगात जेव्हा खेळाडू अनैसर्गिक पद्धतीने चेंडूला स्पर्श करतात. अशा वेळी खेळाडूच्या शारीरिक हालचालीकडेही पंच गांभीर्याने बघतात. त्याची हालचाल जेव्हा असमर्थनीय असते, तेव्हा त्याने चेंडूला स्पर्श केला, चेंडू हाताला किंवा अगदी बाजूला धडकला तरी पेनल्टी दिली जाऊ शकते. थेट हाताने किंवा दंडाने चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या गोलजाळ्यात अगदी अपघाताने जरी मारल्यास तो रद्दबातल ठरतो. चेंडू हाताला अगदी अपघाताने जरी लागला आणि गोलजाळ्यात गेला, तरी तो गोल रद्दबातल ठरतो. चेंडू अपघाताने हाताला लागला आणि त्यावर स्वतःच्या संघातील सहकाऱ्याने गोल मारला किंवा त्याला गोल करण्याची संधी मिळाली, तर मात्र तो नियमभंग ठरत नाही. हेही वाचा : जगातील आद्य कला ५१ हजार २०० वर्षे जुनी; नवीन संशोधन काय सांगते? कुकुरेलाचा हँडबॉल का दिला गेला नाही? मुसियालाने मारलेल्या किकवर चेंडू कुकुरेलाच्या शरीरापासून दूर असलेल्या हाताला लागला असला, तरी खेळाडूचा खांदा खालच्या बाजूस होता आणि त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला असल्याने पंच टेलर यांनी त्या क्षणी हँडबॉलसाठी पेनल्टी किक बहाल केली नाही. हेही वाचा : वडिलांशिवाय जन्माला आलेली ‘डॉली’ कोण होती? यंदाच्या स्पर्धेत याआधीही हँडबॉलवरून वाद? प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूच्या हाताला चेंडू गोलकक्षात लागल्याचा फायदा जर्मनीला उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झाला होता. त्यावेळी जर्मनीचा खेळाडू डेव्हिड राऊमने डाव्या बाजूने चेंडू क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मारलेला चेंडू त्याच्यापासून जवळच असलेला डेन्मार्कचा बचावपटू योकिम अँडरसनच्या उजव्या हाताला लागला. त्यावेळी त्याचा हात शरीरापासून दूर असल्याचा निष्कर्ष काढत पंचांनी जर्मनीला पेनल्टी बहाल केली होती. त्यावेळीही वाद निर्माण झाला होता. त्या पेनल्टीवर काय हावेट्झने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली होती. अखेर जर्मनीने तो सामना २-० अशा फरकाने जिंकला होता. मात्र, उपांत्यपूर्व सामन्यात जर्मनीला पेनल्टी मिळू शकली नाही.