इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क जगाला चकित करत असतात. ट्विटर विकत घेण्याचा करार केल्यापासून ते सतत चर्चेत आहेत. शुक्रवारी, १३ मे रोजी इलॉन मस्क यांनी संपूर्ण जगाला या निर्णया बद्दल पुन्हा आश्चर्यचकित केले. ट्विटरचा करार सध्या ‘होल्ड’वर असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मस्क यांनी यामागचे कारण सांगितले आहे. ‘ट्विटर’वर सध्या असलेल्या ‘स्पॅम’ आणि बनावट खात्यांची तपशीलवार माहिती अद्याप ‘ट्विटर’कडून आपल्याला मिळाली नसल्याने हा खरेदी करार स्थगित केल्याचे मस्क यांनी नमूद केले आहे.
इलॉन मस्क काय म्हणाले?
इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी ४४ अब्ज डॉलर्सची ऑफर दिली, जी ट्विटरने स्वीकारली. पण इलॉन मस्क यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. “ट्विटर डील तात्पुरते थांबवले आहे. स्पॅम किंवा बनावट खाती ५ टक्क्यांपेक्षा कमी वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतात. याबाबत माहिती मिळणे बाकी आहे,”असे एका ट्विटमध्ये, मस्क म्हणाले.
स्पॅम आणि बनावट खात्यांच्या संख्येमुळे करार थांबला
टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी शुक्रवारी ट्विटर करार स्थगित करण्याबाबत माहिती देण्यासाठी ट्विट केले. यामागचे कारण म्हणून त्यांनी स्पॅम आणि बनावट खात्यांची संख्या सांगितली. काही दिवसांपूर्वी, ट्विटरने सांगितले की पहिल्या तिमाहीत, दैनिक सक्रिय वापरकर्त्यांमधील बनावट किंवा स्पॅम खात्यांची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी होती. ट्विटरशी झालेल्या करारानंतर इलॉन मस्क यांनी या प्लॅटफॉर्मवरून ‘स्पॅम बॉट्स’ पूर्णपणे काढून टाकण्याविषयी सांगितले होते.
मस्क यांनी या ट्विटमध्ये आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सची एक बातमी शेअर केली आहे. ही बातमी २ मेची आहे. त्यानुसार ट्विटरच्या अंदाजानुसार पहिल्या तिमाहीत बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या त्याच्या कमाई केलेल्या दैनिक सक्रिय वापरकर्त्यांपैकी ५ टक्क्यांपेक्षा कमी होती. डील अंतर्गत इलॉन मस्क यांच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण करार केल्यानंतर, त्यांनी सांगितले की ट्विटरवरून ‘स्पॅम बॉट’ काढून टाकणे हे त्यांच्या प्राधान्यांपैकी एक आहे.
मस्क यांच्या घोषणेनंतर काय परिणाम झाला?
ट्विटरच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याची बातमी आली. रॉयटर्सच्या मते, १३ मे रोजी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये ट्विटरचे शेअर १७.७ टक्क्यांपर्यंत घसरले. एप्रिलमध्ये मस्कने ट्विटरमधील आपली हिस्सेदारी जाहीर केल्यानंतर ही सर्वात खालची पातळी आहे. याआधी मंगळवारी ट्विटरचे शेअर्स पहिल्यांदाच ५० टक्क्यांच्या खाली आले होते. मस्क यांनी प्रति शेअर ५४.२० डॉलर मध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. ज्याचे वर्णन त्यांनी ‘सर्वोत्तम आणि शेवटचे’ असे केले आहे. मस्क यांच्या नव्या ट्विटवर ट्विटरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
करार पूर्ण होण्याबाबत शंका!
या करारावर यापूर्वीही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. २७ एप्रिल रोजी, अशी बातमी आली होती की हा करार पूर्ण करण्यासाठी मस्क यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. अहवालानुसार, ट्विटरला ४४ अब्ज डॉलर देण्यासाठी मस्क यांना टेस्लाचे शेअर्स विकावे लागतील. या चर्चेदरम्यान २७ एप्रिललाही ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.
अनेक गुंतवणूकदारांनी असाही अंदाज लावला आहे की इलॉन मस्क यांनी हा करार पूर्ण करण्याची शक्यता कमी आहे. यापूर्वी २०१८ मध्येही अशीच एक घटना घडली होती. मस्क यांनी ट्विट केले की, टेस्लामधील संपूर्ण भागभांडवल खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. मात्र, या दाव्यानंतर ते या प्रस्तावावर पुढे जाऊ शकले नाहीत.