पावलस मुगुटमल

मोसमी पावसाची पद्धत (पॅटर्न) अवकाळी पडणाऱ्या पावसापेक्षा वेगळी असते. कमी दाबाचे क्षेत्र, समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे होणारा मोसमी पाऊस कधी मध्यम किंवा टपोऱ्या थेंबांनी, तर कधी संततधार, पण शांतपणे कोसळतो. हा पाऊस एकाच वेळी विस्तृत भागांत होतो. कधीकधी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पाऊस असतो. यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बहुतांश वेळेला हा पाऊस अनुभवता आला.

या महिन्यातील पावसाचे वेगळेपण काय?

सप्टेंबर सुरू होताच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस सुरू झाला. त्यातच दुपारपर्यंत उन्हाचा तीव्र चटका, त्यानंतर धो-धो पाऊस आणि रात्रीच्या वेळेला कधी पाऊस, तर कधी प्रचंड उकाडा अशी विचित्र स्थिती निर्माण झाली. जुलै-ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाच्या नेमकी उलटी स्थिती दिसून येऊ लागली. त्यामुळे मोसमाच्या हंगामातही अवकाळीप्रमाणे पावसाने त्याची पद्धत आणि एकूणच स्वभावच बदलला की काय, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आणि आपल्या अवती-भोवतीच आहे.

विश्लेषण: झेन्टॅक – अमेरिकेत बंदी, भारतात मात्र विक्री सुरूच?

पावसाच्या पद्धतीत बदल कोणता?

ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात आणि सप्टेंबरच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली. या काळात राज्यात किंवा जवळपास कोणताही कमी दाबाचा पट्टा नव्हता. त्याचप्रमाणे समुद्रातून बाष्पही येत नव्हते. याचे मुख्य कारण मोसमी पावसाची आस उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी सरकली होती. त्यामुळे पावसाला पोषक स्थिती त्या भागात निर्माण होत होती. ही आस पुन्हा दक्षिणेच्या बाजूने मूळ जागी सरकण्याची चिन्हे असताना महाराष्ट्रात विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. याही वेळेला कमी दाबाचे कोणताही क्षेत्र नसताना पाऊस झाला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि प्रामुख्याने विदर्भात बहुतांश भागात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. अनेक भागांत सकाळी किंवा दुपारपर्यंत आकाश निरभ्र असताना प्रचंड उकाडा जाणवला आणि दुपारी चारनंतर अचानक ढगाळ स्थिती तयार होऊन काही वेळाने मुसळधार सरी कोसळल्या. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आदी शहरांनीही याचा अनुभव घेतला. काही ठिकाणी थोडक्याच वेळात ढगफुटीप्रमाणे पाऊस झाला.

सध्याचा बदल नेमका कशामुळे?

मोसमी पावसाच्या या काळात समुद्रातून कोणतेही बाष्प येत नसताना किंवा कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत नसताना होणारा पाऊस स्थानिक स्थितीतून होत असतो. आकाशाची स्थिती निरभ्र राहिल्यास सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचतात. साहजिकच जमीन तापू लागते आणि निसर्ग नियमाप्रमाणे त्यातून निर्माण होणारे बाष्प आकाशाकडे जाऊ लागते. या काळात आपल्याला प्रचंड उकाडा जाणवतो. बाष्पाच्या प्रमाणानुसार दुपारनंतर लगेचच किंवा संध्याकाळी आकाशात ढग तयार होतात. घर्षणातून ते गरजतात, विजांचीही निर्मिती होते आणि पाऊस पडतो. हा पाऊस खूप विस्तृत प्रदेशावर नसतो. पण, कधी-कधी मोठे आणि अधिक उंचीचे ढग तयार होऊन ठरावीक भागांतच ढगफुटीप्रमाणे पाऊस होतो. रात्री ढग काहीसे पसरले की रात्रभरही हा पाऊस बरसत असतो. पाऊस नसताना रात्री ढगाळ वातावरण असल्यास उकाडा वाढतो. कारण जमिनीवरील भागातील उष्णता ढगांमुळे वातावरणात न जाता खालीच राहत असल्याने ही स्थिती तयार होते. या सर्वांचा अनुभव या महिन्यात मिळाला.

विश्लेषण: झेन्टॅक – अमेरिकेत बंदी, भारतात मात्र विक्री सुरूच?

सर्वाधिक परिणाम कोणत्या ठिकाणी?

सर्वाधिक जमीन तापणाऱ्या भागामध्ये मोसमीच्या हंगामात अवकाळीप्रमाणे पडणाऱ्या पावसाचे परिणाम सर्वाधिक दिसून येतात. सिमेंटच्या इमारती, रस्ते, जमीन आणि वातावरण तापण्यास कारणीभूत ठरणारे बहुतांश घटक शहरात असतात. त्यामुळे याच भागात हा पाऊस अधिक होत असल्याचेही दिसून येते. दिवसा प्रचंड उकाडा आणि त्यानंतर मुसळधार सरींचा अनुभव या आठवड्यात मुंबई-पुण्यासारख्या शहरांनी घेतला आहे. मुंबईत तर हा परिणाम सर्वाधिक होण्यासाठी पोषक स्थिती आहे. सर्वत्र काँक्रिटीकरण, झाडांचे प्रमाण कमी असल्यास शहरातील हवा अधिक तापते आणि ढगांची निर्माती वेगाने होते. त्याचप्रमाणे किनारपट्टीलगत असलेल्या विभागांत समुद्रातूनही काही प्रमाणात अतिरिक्त बाष्प उपलब्ध होते.

शेती, पाणीसाठ्याला फायदा काय?

जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात मोसमी पाऊस सरासरीच्या तुलनेत अधिक झाला. त्यामुळे धरणांत ९० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा जमा झाला आहे. मोसमी पावसाचा मूळ स्वभावाच्या विपरीत असलेला सप्टेंबरचा सध्याचा पाऊस नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झालेल्या भागात प्रामुख्याने झाला असला, तरी ग्रामीण भागातही त्याची काही प्रमाणात हजेरी होती. धरण क्षेत्रात हा पाऊस कमी होता. त्यामुळे त्याचा पाणीसाठ्यासाठी फारसा उपयोग झाला नाही. शेतीच्या क्षेत्रात मात्र हा पाऊस न होणेच चांगले समजले जाते. जोरधारा कोसळल्यास फुलोऱ्याला आलेली पिके खराब होतात. ढगफुटीप्रमाणे एकाच ठिकाणी पाऊस कोसळल्यास पिके उद्ध्वस्त होण्याची भीती असते, तर शेतात तळे साचून भुईमुगासारखी पिके सडण्याचा धोका असतो.

असा बदल यंदाच घडला काय?

हलका असो किंवा मुसळधार मोसमी पावसाचा मूळचा स्वभाव शांतपणे बरसण्याचाच असतो. त्यात काहीसा बदल दिसल्यास विविध तर्क-वितर्क लढविले जातात. नागरिकांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र, हवामान शास्त्राच्या दृष्टीने सध्या पावसाने त्याची पद्धत बदललेली दिसत असली, तरी ती नेहमीचीच आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी याबाबत सांगितले, की तापलेल्या जमिनीतून निर्माण होणारे बाष्प आणि त्यामुळे विजा आणि ढगांच्या गडगडाटात होणारा हा पाऊस मोसमी हंगामात नवा नाही. पण, जुलै-ऑगस्टच्या पावसाशी तुलना केल्यामुळे त्याच्या स्वभावात बदल दिसून येतो. गणेशत्सवाच्या काळात असा पाऊस अनेकदा झाला असल्याचेही कुलकर्णी स्पष्ट करतात.

पुढील दिवसांत काय होणार?

सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे मोसमी पावसाची आस उत्तरेकडून पुन्हा मूळ जागी म्हणजे दक्षिणेच्या दिशेकडे स्थिर होते आहे. त्याचबरोबरीने बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण करणारे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे कोकण, पश्चिम-उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. पण, हा पाऊस स्थानिक नसेल, तर मोसमी पावसाच्या मूळ स्वभावाच्या पद्धतीचा असणार आहे.