scorecardresearch

Premium

विश्लेषण : पाच हजार वर्षांपूर्वीची स्मार्ट शहरे नक्की होती तरी कशी? राखीगढीत मिळाले उत्तर…!

हडप्पा, मोहेंजो-दारो आदी सिंधु संस्कृतीतील शहरे ही तत्कालीनच काय पण आजच्या परिप्रेक्ष्यामध्येही स्मार्ट शहरेच ठरतात.

How exactly were smart cities five thousand years ago Answer found in Rakhigadhi
(फोटो सौजन्य – ANI)

विनायक परब
हडप्पा, मोहेंजो-दारो आदी सिंधु संस्कृतीतील शहरे ही तत्कालीनच काय पण आजच्या परिप्रेक्ष्यामध्येही स्मार्ट शहरेच ठरतात. पाण्याच्या उत्तम नियोजनापासून ते सांडपाण्याच्या व्यवस्थेपर्यंत सारे काही आरोग्यपूर्ण रितीने निर्माण करण्यात आले होते. अलीकडेच हडप्पाकालीन राखीगढी या ठिकाणीही पुढच्या टप्प्यातील उत्खनन पार पडले त्यातही नियोजित शहराचे आणखी एक रूप समोर आले त्याविषयी….

हडप्पा, मोहेंजो दारो आणि आता नव्याने उजेडात आलेले राखीगढी ही शहरे नेमकी कोणत्या कालखंडातील आहेत?

पुरातत्त्वशास्त्रामध्ये एकादी संस्कृती ज्या ठिकाणी प्रथम सापडते, त्या ठिकाणाचे नाव त्या संस्कृतीस दिले जाते. आज आपण सिंधु संस्कृती म्हणून ज्या संस्कृतीस ओळखतो, ती सर्वप्रथम हडप्पा येथे सापडली म्हणून त्यास हडप्पा संस्कृती असे संबोधन प्राप्त झाले. अलीकडे त्यास सिंधु संस्कृती किंवा सिंधु- सरस्वती संस्कृती असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. ही सर्व शहरे इसवी सन पूर्व अडीच हजार म्हणजेच आजपासून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची आहेत. 

या प्राचीन शहरांना स्मार्ट शहरे म्हणण्याचे कारण काय?

हडप्पा संस्कृतीतील सर्व शहरे ही आखीवरेखीव आणि सुनियोजित होती. प्रत्येक वस्तीची मानके ठरलेली होती. प्रत्येक शहराला एक मोठी तटबंदी होती आणि आतमध्ये शहरातील सर्वसामान्यांची वस्ती वेगळी, औद्योगिक वस्ती वेगळी आणि शहराचा कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची वस्ती बालेकिल्ल्यामध्ये अशी रचना होती. त्याचप्रमाणे औद्योगिक आस्थापनांची प्रवेशद्वारे पाहिल्यास असे लक्षात येते की, तिथे कामाहून घरी परतणाऱ्यांची तपासणी करण्याची सोय होती. आधुनिक दृष्टिकोनातूनही ती प्राचीन शहरे स्मार्टच ठरतात. 

हडप्पाकालीन शहरांकडून आधुनिक शहरांनीही शिकण्यासारखे काही आहे काय?

प्राचीन शहरांमध्ये सार्वजनिक वापराच्या व्यवस्था म्हणजेच तरणतलाव, पोहून झाल्यानंतरच्या स्वच्छतेसाठीची सोय बाजूलाच, शिवाय सार्वजनिकरित्या अन्नसाठवणुकीची चांगली सोय ज्यामध्ये कीटकांमुळे अन्नसाठ्याचे नुकसान होणार नाही, अशी काळजी घेण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे वाहतुकीचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. हडप्पाकालीन शहरांमध्ये शहराच्या मुख्य रस्त्यावर एकाही घराचा दरवाजा उघडत नाही, अशी रचना होती. घरांचे दरवाजे आतल्या गल्लीमध्ये किंवा लहान रस्त्यावर आतल्या बाजूला उघडत असत. त्यामुळे मुख्य रहदारीला कुठेही अडथळा येत नसे. सांडपाण्याची व्यवस्था रोगराई पसरू नये यासाठी बंदिस्त होती. तरणतलावामध्ये पाण्याची गळती होऊ नये यासाठी विशिष्ट प्रकारच्या दगडाचे तुकडे वॉटरप्रुफिंगसाठी बसविण्यात आले होते. हे सारे आधुनिक शहरांनी घ्यावयाचे धडे आहेत.

हडप्पाच्या विटांची चर्चा जगभर होते असे का म्हणतात?

होय, हे खरे आहे. जगभरात भाजक्या विटा या सर्वप्रथम हडप्पा संस्कृतीमध्ये वापरण्यात आल्या, असे संशोधकांना लक्षात आले आहे. भाजक्या विटांचे बांधकाम पक्के असते. अशाच विटा राखीगढी येथेही सापडल्या आहेत. म्हणूनच असे म्हणतात की, भाजक्या विटा ही भारतीयांनी जगाला दिलेली अनमोल देणगी आहे.

हडप्पा संस्कृतीतील शहरे आर्यांनी वसविली असे म्हटले जाते…

आर्य-अनार्य वाद आता निकालात निघाल्यासारखा आहे. कारण दोन वर्षांपूर्वी राखीगढी येथे सापडलेल्या महिलेच्या अस्थिपंजराची डीएनए चाचणी झाली आणि त्यात असे लक्षात आले की, ती अस्सल भारतीय महिलाच आहे. तिचा डीएनए ९९.९९ टक्के आजच्या भारतीयांशीच जुळणारा आहे. त्यामुळे ही शहरे अस्सल भारतीयांनीच वसवलेली शहरे आहेत.

हडप्पा, मोहेंजो-दारो तर आता पाकिस्तानात आहे. मग भारताकडे काय राहिले?

स्वातंत्र्यानंतर हाच प्रश्न महत्त्वाचा ठरला आणि भारतीय पुराविदांनी हडप्पाकालीन शहरांचा शोध भारतात घेण्यास सुरुवात केली. आता भारतात १०० हून अधिक हडप्पाकालीन शहरे सापडली आहेत. राखीगढी हे त्यापैकी एक, ते हरियाणामध्ये आहे.

सर्वसामान्य माणसाला ही शहरे पाहाता येतात का?

त्यासाठीच सध्या राखीगढीचे काम नियोजनपूर्वक सुरू आहे. इथेही आखीवराखीव रस्ते आणि नगररचना सापडली आहे. हे हडप्पापेक्षाही मोठे असे शहर आहे. सांडपाण्याची स्वतंत्र व्यवस्था हे याचेही वैशिष्ट्य आहे. इथे अलीकडच्या उत्खननामध्ये दोन महिलांचे अस्थिपंजर सापडले असून त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिनेही सापडले. राखीगढीला संग्रहालयही प्रस्तावित असून येत्या काही वर्षांत इथेही पर्यटकांना रीतसर भेट देता येईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-05-2022 at 16:50 IST

संबंधित बातम्या