भारतीय नौदल आणखी सक्षम होण्याच्या दृष्टीने आता एक पाऊल पुढे पडत आहे. कोच्ची शिपयार्ड तर्फे लवकरच ‘आयएनएस विक्रांत'(INS Vikrant) ही स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका (aircraft carrier) ही नौदलाकडे सुपूर्त केली जाणार आहे. त्यानंतर येत्या १५ ऑगस्टला नौदलाच्या सेवेत आयएनएस विक्रांत दाखल होणार आहे. याआधीच आयएनएस विक्रमादित्य विमानवाहू युद्धनौका नौदलात कार्यरत आहे आणि विक्रांतच्या रुपाने आणखी एका विमानवाहू युद्धनौकेच्या समावेशामुळे भारतीय नौदलाचा दबदबा वाढणार आहे यात शंका नाही. नव्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या मारक क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.

विमानवाहू युद्धनौकेचे महत्व

Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!

विमानवाहु युद्धनौकांवरील लढाऊ विमानांच्या सहाय्याने समुद्राच्या विस्तृत भागावर वर्चस्व ठेवता येते. विमानवाहु युद्धनौकेमुळे ५०० किमीपेक्षा जास्त परिघात समुद्रात किंवा किनाऱ्यापासून आत जमिनीवर खोलवरच्या भागापर्यंत वर्चस्व ठेवता येते. त्यामुळे नौदलात या युद्धनौकांना अनन्य साधारण महत्व आहे. यामुळे स्वदेशाच्या किनाऱ्यापासून कित्येक महिने दूर राहत शत्रू पक्षाच्या प्रदेशाजवळ जात नौदलाला-लष्कराला प्रत्यक्ष कारवाई करणे शक्य होते. त्यामुळेच जगावर वर्चस्व ठेवू पहाणारे चीन-अमेरिका सारखे देश हे विमानवाहू युद्धनौकांचा ताफा सेवेत बाळगत आहे. तर अशा युद्धनौकांच्या सहाय्याने इंग्लंड, रशिया, फ्रान्स सारखे देश जगात समुद्राच्या मोठया भुभागावर वर्चस्व ठेवू पाहत आहेत. आता या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. भारताच्या तिन्ही बाजूला विस्तृत समुद्र असून याच भागातून मोठ्या प्रमाणात जलवाहतूक-मालवाहतूक सुरु असते. तेव्हा पाकिस्तान आणि चीन अशा दोन शत्रूंवर आणखी जरब ठेवण्यासाठी, समुद्रातील व्यापारी मार्गावर निर्विवाद वर्चस्व ठेवण्यासाठी अशा विमानावाहू युद्धनौकांची नितांत आवश्कयता भारताला आहे.

हेही वाचा… INS Vikrant : स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल

तीन विमानवाहू युद्धनौकांची गरज

१९९० च्या दशकात जगातील चित्र मोठ्या प्रमाणात बदलले. शीत युद्ध संपले होते, रशियाची पूर्वीसारखी साथ भारताला मिळणे हे आता अशक्य झाले होते. तर दुसरीकडे चीनची घोडेदौड सुरु झाली होती. त्यातच कारगील युद्धप्रसंगाला समोरे जात असतांना तेव्हाची एकमेव विमानवाहू युद्दनौका आयएनएस विराट ही कोच्ची इथे दुरुस्तीसाठी दाखल झाली होती. कारगील युद्ध लांबल्यास आणि जमिनीवरील युद्ध समुद्रावर आलं तर विराट कार्यरत असणे अत्यंत आवश्यक होते. मात्र दुरुस्ती होत पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी विराटला काही आठवड्यांचा कालावधी लागणार होता. तेव्हा अशा विविध घटनामुंळे नौदलाने रणनिती बदलली आणि भविष्यकालीन उपाययोजनांसाठी पावले टाकायला सुरुवात केली. यापैकी एक प्रमुख निर्णय होता तो म्हणजे नौदलाच्या ताफ्यात किमान २४ पाणबुड्या असणे आणि दुसरा म्हणजे नौदलाकडे तीन विमानवाहू युद्धनौका असणे. यापैकी पाणबुड्यांबाबतचा निर्णय हा विविध कारणांमुळे अजुनही पूर्ण झालेला नाही. तर विमानवाहू युद्धनौकांच्या बाबतीत काही प्रमाणात पावले टाकण्यात आली आहेत.

कारगील युद्धातून मोठा धडा नौदलाला मिळाला. तीन विमानवाहू युद्धनौका ताफ्यात असणे नौदलाला आवश्यक वाटू लागले. म्हणजे वर्षाचे १२ महिने (पाकिस्तान आणि चीनसाठी) दोन बाजूंना प्रत्येकी एक अशा दोन विमानवाहू युद्धनौका कार्यरत असतील आणि तिसरीची गरज पडल्यास डागडुजी करता येईल. नाहीतर एकाच वेळी तीनही विमावाहू युद्धनौका कार्यरत असतील. भविष्यासाठी अशी योजना तयार केली गेली असून एकाच वेळी दोन शत्रुंचा सामना करण्यासाठी आवश्यक असा , विमानवाहू युद्धनौकांना सहाय्यक ठरेल अशा युद्धनौकांचा ताफाही उभारण्याचे काम युद्धपातळीवर देशात सुरु आहे. पुढील १० वर्षात ३० पेक्षा जास्त विविध युद्धनौका नौदलात दाखल होणार आहेत.

विमानवाहू युद्धनौकांबाबत सध्याची परिस्थिती काय?

सध्या रशियाकडून डागडुजी करत विकत घेतलेली आणि आपल्याला अपेक्षित असं नुतनीकरण केलेली ४५ हजार टन वजनाची आयएनएस विक्रमादित्य विमानवाहू युद्धनौका कार्यरत आहे. तर वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचे काय ?

चीनची वाढती ताकद लक्षात घेता वेळ भरुन काढण्यासाठी इंग्लंडकडून क्विन एलिझाबेथ वर्गातील तयार झालेली विमानवाहू युद्धनौका थेट विकत घेण्याबातची चर्चा सुरु असल्याचे म्हंटलं जात होते. मात्र यामध्ये नंतर तथ्य असल्याचे आढळले नाही. तिसरी विमानवाहू युद्दनौका ही अणु ऊर्जेवर चालणारी असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र वारेमाप खर्च लक्षात घेता ही शक्यता नंतर फेटाळण्यात आली. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेप्रमाणे नव्या विमानवाहू युद्धनौकेवर लढाऊ विमानांना हेवत झेपावण्यासाठी वेग आणि धक्का देणारी Electromagnetic Aircraft Launch System असण्याची शक्यता आहे. यामुळे विक्रमादित्य आणि विक्रांतचा एका टोकाकडचा डेक ४५ अंशात उंचावला आहे तसा तो असणार नाही, नव्या विमानवाहू युद्धनौकेचा डेक हा सपाट असणार आहे.

हेही वाचा… Navy Flag : नौदलाच्या नव्या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण!

नव्या विमानवाहू युद्धनौका बांधण्याबाबत अजुनही नौदलाकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हिचे नाव आयएनएस विशाल (INS Vishal) असं असेल अशी चर्चा आहे. ही विमानवाहू युद्धनौका भारताकडे असलेल्या विमानवाहू युद्धनौकांपेक्षा आणखी मोठी असेल, हिचे वजन सुमारे ६५ हजार टन असेल असा अंदाज आहे. म्हणजेच एकाच वेळी ५५ पेक्षा जास्त लढाऊ विमाने-हेलिकॉप्टर सामावण्याची क्षमता नव्या विमानवाहू युद्धनौकेत असेल.

आयएनएस विक्रांत बांधून पूर्ण व्हायला १३ वर्षांचा कालावधी लागला आणि एका अंदाजानुसार २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. तेव्हा या अनुभवावरुन नव्या विमानवाहू युद्धनौकेची बांधणी आणखी कमी कालवधीत होईल असा अंदाज आहे. असं असलं तरी अशा विमानवाहू युद्धनौका बांधणीचा अवाढव्य खर्च लक्षात घेता नव्या विमानवाहू युद्धनौकेच्या बांधणीबाबत अजुनही कोणतेही हालचाल सरकारी पातळीवर दिसत नाही. तेव्हा भविष्यातील चीनचे वाढचे नौदल सामर्थ्य लक्षात घेता तिसरी विमानवाहू युद्धनौकेची गरज पूर्ण करण्याकरता किती कालावधी खर्ची होणार हा खरा प्रश्न आहे.