संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची युवाजना श्रमिका रायतू काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) या पक्षाच्या तहहयात अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. यापूर्वी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. करुणानिधी यांची द्रमुकच्या सरचिटणीसपदी तहहयात निवड करण्यात आली होती. याशिवाय काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची अशीच निवड करण्यात आली होती. राजकीय पक्षांनी अंतर्गत निवडणुका घेऊन पक्षाचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवावा अशी निवडणूक आयोगाची अपेक्षा असते. प्रत्येक राजकीय पक्षाने पाच वर्षांच्या काळात अंतर्गत निवडणुका घ्याव्यात, अशी निवडणूक आयोगाने तरतूद केली आहे. यामुळेच मध्यंतरी काँग्रेस पक्षाला अंतर्गत निवडणुकींचा कार्यक्रम लवकर पार पाडण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती. पण तहहयात अध्यक्ष ही संकल्पनाच पक्षांतर्गत लोकशाहीच्या विरोधात जाणारी आहे.

पक्षाचे अध्यक्ष किंवा अन्य पदाधिकाऱ्यांबाबत तरतूद काय आहे?

१९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील २९ अ तरतुदीनुसार राजकीय पक्षांची नोंदणी व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती याबाबत स्पष्ट उल्लेख आढळतो. पक्षाला आपले अध्यक्ष, सरचिटणीस व अन्य पदाधिकारी नेमण्याचा अधिकार असतो. निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार पक्षाच्या एकूण पदाधिकाऱ्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक पदाधिकारी हे नियुक्त नसावेत. पदाधिकारी हे अंतर्गत निवडणूक प्रक्रियेतून निवडून आलेले असावेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याची मुदत ही पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ नसावी. तसेच पक्षांच्या अंतर्गत निवडणुका या पाच वर्षांच्या कालावधीत व्हाव्यात, अशी निवडणूक आयोगाची भूमिका आहे. यामुळेच नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील राजकीय पक्षांना अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागते. काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका लांबणीवर टाकण्याची विनंती निवडणूक आयोगाने मागे फेटाळली होती ती याच कारणाने. पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी बदलले तर ते निवडणूक आयोगाला लगेचच कळविण्याची तरतूद २९ अ मध्ये करण्यात आली आहे.

जगनमोहन यांना तहहयात पक्षाचे अध्यक्ष होता येईल का ?

जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने त्यांची तहहयात अध्यक्षपदी निवड केली आहे. यापुढे पक्षाला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. पक्षाच्या घटनेत तसा बदल करावा लागेल. ही सारी प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतरच जगनमोहन हे पक्षाचे तहहयात अध्यक्ष होऊ शकतील. तमिळनाडूतील द्रमुकचे माजी सर्वेसर्वा करुणानिधी हे पक्षाचे तहहयात सरचिटणीस होते. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती.

जगनमोहन यांनी तहहयात अध्यक्षपदी स्वत:ची नियुक्ती का केली असावी?

जगनमोहन रेड्डी यांचे वडील वाय. एस.आर. रेड्डी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असतानाच त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे, अशी जगनमोहन यांची इच्छा होती. पण काँग्रेस पक्षाने जगनमोहन यांना मुख्यमंत्रीपदी नेमण्यास विरोध केला होता. त्यातून जगनमोहन यांनी विरोधी भूमिका घेतली. २०११मध्ये त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली. पक्षाला वायएसआरपीसी असे नाव दिले. २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांच्या पक्षाला एकतर्फी यश मिळाले. जगनमोहन यांना पक्षांतर्गत तरी आव्हान नाही. पण भविष्यात कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास पक्षाचे नेतृत्व स्वत:कडे राहील याची त्यांनी खबरदारी घेतलेली दिसते, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष अधिक भक्कमपणे रिंगणात उतरविण्यासाठी त्यांनी आतापासूनच सारे प्रयत्न सुरू केले आहेत.

शिवसेनेत अंतर्गत निवडणुका होतात का?

निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार अतंर्गत निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाते. २०१७मध्ये झालेल्या अंतर्गत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख एकच म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख असे पद धारण केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख होेते पण निवडणूक आयोगाच्या नोंदी तहहयात पक्षाचे प्रमुख नव्हते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained jagan mohan reddy elected lifetime president of ysr congress print exp abn
First published on: 11-07-2022 at 07:51 IST