नागपूर : काँग्रेस आणि इतर सर्व पक्षात अनेक वेळा उभी फूट पडली. मात्र भाजप असा एकमेव पक्ष आहे ज्यात पक्षाच्या स्थापनेपासून कधीही फूट पडली नाही, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. भाजपमध्ये कधीही फूट पडली नाही याचे एकमेव कारण म्हणजे पक्षातील नेते आत्मकेंद्रित नव्हते. या पक्षाचा कार्यकर्ता खुर्ची, पदासाठी काम करत नाही तर विचारांसाठी काम करतो. त्यामुळे आजपर्यंत पक्षामध्ये फूट पडली नाही, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >>>‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
महाविकास आघाडी म्हणजे तुटलेले इंजिन
महाविकास आघाडीमध्ये सगळे इंजिन एका रांगेत उभे आहेत. सर्व हात वर करून आम्ही एकत्र आहोत असे सांगायचे आणि पुन्हा आपापले इंजिन घेऊन वेगळय़ा दिशेने निघून जायचे. असे इंजिन काय कामाचे आहे? आता या तुटलेल्या इंजिनवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
जयंत पाटील पक्षनेतृत्वावर नाराज
जयंत पाटील हे पक्षातील नेतृत्वावर नाराज आहेत. त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापुरती मर्यादित झाली आहे. त्यामुळे जयंत पाटलांना तसेही पक्षात विचारले जात नाही, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा >>>बुलढाण्यातील भाजप बंडखोर विजयराज शिंदेंना नागपुरात पाचारण; प्रदेशाध्यक्षांशी करणार चर्चा
‘काँग्रेसचा जाहीरनामा खोटय़ा आश्वासनांचा दस्तऐवज’
काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे खोटय़ा आश्वासनाचा दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करणारा हा पक्ष देशात आता कमकुवत होत आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेच काँग्रेसमध्ये राहतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार दिनेश शर्मा यांनी केली.
भाजपच्या स्थापना दिननिमित्त शनिवारी शर्मा नागपुरात आले होते. ते म्हणाले, काँग्रेसने पुन्हा खोटे आश्वासन देत जाहीरनामा जनतेसमोर ठेवला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसने खोटी आश्वासने दिली मात्र अजूनही तेथील लोकांना लाभ मिळाला नाही. काँग्रेसवर अन्य पक्षांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे इंडिया आघाडी एकत्र येऊ शकत नाही.
‘ठाकरेंचा तर एकही खासदार येणार नाही’
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली दिली आहे. ते सनातन विरोधी इंडिया आघाडीत जाऊन बसले आहेत. महाविकास आघाडीला एका- एका ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे गटाचा तर एकही खासदार निवडून येणार नाही, असा दावा शर्मा यांनी केला.