पृथ्वीवर जीवसृष्टीच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये महत्त्वाची भुमिका असलेले पाणी हे पृथ्वीवर आले कसे याबाबत शास्त्रज्ञ-अभ्यासक अजुन ठोकताळे बांधत आहेत, अंदाज लावत आहे, संशोधन करत आहेत. हे पाणी बाहेरुन आले, लघुग्रहांच्या माध्यमातून आले असावे असा एक गृहीतकही शास्त्रज्ञांकडून मांडलं जात आहे. याबाबत ठोस असे पुरावे मिळण्याबाबत संशोधन सुरु आहे. तेव्हा याबाबतची नवी माहिती ही जपानच्या Hayabusa-2 या मोहिमेच्या माध्यमातून पुढे आली आहे.

काय होती Hayabusa-2 मोहिम?

Hayabusa-2 हे सुमारे ६०० किलो वजनाचे यान डिसेंबर २०१४ मध्ये जपानने प्रक्षेपित केले. पृथ्वीच्या कक्षेशी काहीसे समांतर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या Ryugu या लघुग्रहाच्या दिशेने हे यान पाठवण्यात आले. Ryugu हा लघुग्रह सुमारे ८०० मीटर रुंदीचा काहीसा ओबडधोबड गोलाकार आकाराचा आहे. जून २०१८ मध्ये हे यान या लघुग्रहाच्या कक्षेत पोहचलं. त्यानंतर जुलै २०१९ पर्यंत या लघुग्रहावरील ५.४ ग्रॅम वजनाचे दगड-मातीचे नमुने विशिष्ट आघात पद्धतीने या यानाने गोळा केले. हे नमुने एका सुरक्षित कुपीत घेत हे यान पृथ्वीच्या दिशेने निघाले. ही कुपी डिसेंबर २०२० मध्ये पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरली. त्यानंतर या कुपीत असलेल्या लघुग्रहाच्या दगड मातीचा अभ्यास सुरु आहे.

अभ्यासातून कोणती माहिती समोर आली आहे?

४.६ अब्ज वर्षाच्या पृथ्वीवर पाणी नेमकं कसे निर्माण झाले किंवा हे कोठून आले याचा अभ्यास शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे करत आहेत. Hayabusa-2 मोहिमेच्या माध्यमातून एक नवीन माहिती समोर आली आहे. या यानाने जी ५.४ ग्रॅम वजनाची दगड-माती गोळा केली त्याचा सखोल अभ्यास करण्यात आला. यामध्ये अॅमिनो अॅसिडचे अंश सापडले आहेत. पाणी आणि जीवसृष्टी यामध्ये अॅमिनो अॅसिडचे अंश आहेत किंवा अॅमिनो अॅसिडने पाणी आणि जीवसृष्टी निर्मितीमध्ये महत्त्वाची भुमिका बजावली आहे असं संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे. तेव्हा पृथ्वीवर जे पाणी आलं ते अशा Ryugu प्रकारच्या लघुग्रहांवरुन आले असावे असा अंदाज Ryugu वरुन आणलेल्या ५.४ ग्रॅम वजनाच्या दगड-मातीच्या अभ्यासावरुन व्यक्त करण्यात आला आहे. तसंच या दगड-मातीमधील मलुभूत गोष्टींची जडणघडण ही पृथ्वीवरील पाण्याशी मिळतीजुळती आहे असा अंदाजही या अभ्यासातून व्यक्त करण्यात आला आहे.

लघुग्रह म्हणजे काय?

सूर्यमालेतील ग्रहांपेक्षा अत्यंत कमी आकाराचे विविध मुलद्रव्यांनी बनलेले दगड-मातीने बनलेले भाग म्हणजे लघुग्रह. काही लघुग्रह हे काही किलोमीटर आकाराचे असले तरी बहुतांश लघुग्रह हे एक किलोमीटरपेक्षा कमी आकाराचे आहेत. मुख्यतः लघुग्रह हे सूर्यमालेत मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये पसरले असून ते ग्रहांप्रमाणे सुर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. तर दोन लघुग्रहांचे मोठे समुह हे गुरु ग्रहाच्या कक्षेत फिरत आहेत. तर काही लघुग्रह हे पृथ्वीच्या कक्षेशी समांतर सुर्यभोवती फिरत आहेत. तर काही प्रमणात लघुग्रह हे सूर्यमालेत इतस्ततः, विस्कळीत स्वरुपात पसरले आहेत.

लघुग्रहांचा अभ्यास का केला जात आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लघुग्रह हे सूर्यमालेच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहेत. सूर्यमालेच्या निर्मितीच्या पाऊलखुणा-पुरावे जणु या लघुग्रहांवर आहेत असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. तसंच हे लघुग्रह हे खनिज संपत्तीने विशेषतः दुर्मिळ धातु आणि मुलद्रव्यांनी खचाखच भरलेले असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच लघुग्रहांचा अभ्यास केला जात आहे. जपानप्रमाणे नासानेही अशाच एका लघुग्रहावरुन दगड-माती आणणाऱ्या मोहिमेचे नियोजन केले असून नासाचे यान हे लघुग्रहाजवळ २०२३ मध्ये पोहचणार आहे.