scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण : रोहिणी खडसे विरुद्ध शिवसेना…; जळगावात नक्की घडलंय काय?, जाणून घ्या

शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे

Shivsena mla chandrakant patil ncp eknath khadse rohini khadse jalgaon

राजकारणात आपले वाढते वर्चस्व सहन होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या विरोधात सतत कट कारस्थान रचले जात असून, आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अस झालं तर त्याला खडसे परिवार जबाबदार असणार असल्याचे गंभीर आरोप मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे नक्की हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया.

जळगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंनी स्थानिक शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी देखील एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे.

त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी स्थानिक शिवसेना आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली.

नेमकं घडलं काय?

जळगावमध्ये बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक चकमक केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. मुक्ताईनगर मतदारसंघात अवैध धंदे हे शिवसेनावाल्यांचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देऊन केला होता. त्यानंतर शिवसेनेने देखील अशाच सर्वच्या सर्व अवैध धंदे राष्ट्रवादी वाल्यांचे असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांचा आम्ही आदर करतो आम्ही कुठल्या प्रकारे यांच्याशी शाब्दिक चकमक न केल्याचा खुलासा शिवसेनेने केला होता. या वादानंतर दोन्ही कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षांचा शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. “काल रात्री साडेदहाच्या सुमारास राष्ट्रवादीच्या मुक्ताईनगर शहराच्या शहर अध्यक्ष नीताताई यांचा मला फोन आला की काही गावगुंड त्यांच्या घराच्या जवळ जाऊन त्यांचा दरवाजा ठोकत आहेत, त्यांना बाहेर ओढत आहेत. अश्लील शिवीगाळ करत आहेत. त्यांनी विनंती केली की ताई तुम्ही तात्काळ इथे या नाहीतर आम्ही जिवंत राहणार नाही. मी जेव्हा त्यांच्या घराजवळ गेले, तेव्हा ते १० ते १५ लोकं पळून गेले”, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.

“आमच्या शहर अध्यक्षा म्हणाल्या, ताई आम्ही जिवंत राहणार नाही”, ‘त्या’ प्रकारावरून रोहिणी खडसेंचा शिवसेना आमदारांवर गंभीर आरोप!

या गावगुंडांनी आपण चंदूभाऊंचे (चंद्रकांत पाटील) कार्यकर्ते असल्याचं सांगितल्याचं रोहिणी खडसे म्हणाल्या. “शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील आणि इश्वर फाटकर या दोघांना आम्ही पकडू शकलो. त्यांची वागणूक चुकीची होती. मी तिथे असताना माझ्या समोर देखील त्या महिलेला अश्लील शिवीगाळ करणं सुरू ठेवलं होतं. मी त्यांना समजावलं, तेव्हा ते माझ्याही अंगावर धावून आले. मलाही त्यांनी सांगितलं की आम्ही चंदूभाऊंचे कार्यकर्ते आहोत. जर त्यांच्याविरोधात पोस्ट टाकली, तर आम्ही काय आहोत, हे शिवसेना स्टाईलने दाखवून देऊ. तेव्हा पोलीस आले. हा प्रकार पोलिसांच्या समोर घडला आहे”, असा दावा रोहिणी खडसे यांनी केला.

सगळ्यांना चोप देऊ- रोहिणी खडसे

त्यानंतर “माता भगिनींबाबत असा प्रकार कुणी करत असेल, तर आम्ही कुणीही ते सहन करणार नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते, चंद्रकांत पाटलांचे पदाधिकारी आहे, त्यांना जर आमदारांनी आवर घातला नाही, समजूत घातली नाही, तर आम्ही शेवटी सगळ्यांना चोप देऊ”, असं देखील त्या म्हणाल्या.

या घटनेबाबत एका स्थानिक वाहिनीच्या प्रतिनिधींशी फोनवर बोलताना रोहिणी खडसे यांनी आमदाराला चोप देणार असल्याची भूमिका घेतली असल्याच्या आरोपानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या ड्रायव्हरनेच ‘त्या’ महिलेशी अश्‍लील भाषेत संभाषण केले असून त्या ऑडिओ क्लिप्स आपल्याकडे आहेत. यामुळे आमदारांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खडसेंनाच उलट आव्हान दिले.

“त्या’ ऑडिओ क्लिप्स दाखवाच, संबंध आढळला तर राजीनामा देईन”, शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांचं एकनाथ खडसेंना आव्हान!

“एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. हेच चोर आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला व्यासपीठावर अश्लील बोलल्यामुळे यांच्यावर मुबईत गुन्हा दाखल आहे. त्यांनी एकदा ऑडिओ क्लिप वाजवून दाखवावी. पोलिसांत तक्रार केली तर पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही? मी माघार घ्यायला लावली असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांनी सीसीटीव्ही फूटेज दाखवावं, रेकॉर्ड दाखवावं. ३० वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी होता, पण तुमच्यासारखा खोटा माणूस या महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी झाला नाही”, असे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2021 at 17:34 IST