रेश्मा राईकवार
दाक्षिणात्य चित्रपटांची लोकप्रियता ही आजची नाही. ‘प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट’ शैलीतील त्यांचे नायक आणि त्यांचे देमार चित्रपट याआधीही लोकप्रिय होते. त्यामुळे हिंदी भाषेत डब केलेल्या त्यांच्या आवृत्तींनी अनेक चित्रपट वाहिन्यांवर कधीकाळी लागणारे हिंदी चित्रपट पूर्णपणे हटवून त्यांची जागा घेतली. चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग पाहता चित्रपट वाहिन्यांनीही दाक्षिणात्य चित्रपटांच्या बाबतीत हात कधीच आखडता घेतला नाही. करोना काळात तर ओटीटी माध्यमांमुळे नवे काही पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या मल्याळम, कन्नड चित्रपटांचा खजिनाच खुला झाला. आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन झाले. ओटीटीवर सध्या तमीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपट पाहणारे ५० टक्के प्रेक्षक हे दक्षिणेतर राज्यांमधील आहेत, अशी माहिती विश्लेषक देतात.

ओटीटीवर दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा कसा वाढला?

करोनापश्चात चित्रपटगृहे असोत वा ओटीटी माध्यम सगळीकडे दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रेक्षकसंख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. ओटीटी (ओव्हर द टॉप) या नव्याने आलेल्या माध्यमांना करोना काळात खुली झालेली बाजारपेठ आणि प्रेक्षकसंख्या वाढवण्यातून आपापसात सुरू झालेली स्पर्धा यामुळे प्रादेशिक चित्रपट विविध भाषेतील डब आवृत्तींसह ओटीटीवर उपलब्ध झाले. हिंदीतही पाहण्यासारखे नवीन फार काही नसल्याने प्रेक्षकांनी ओटीटीवर उपलब्ध असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांकडे मोर्चा वळवला. यावेळी केवळ देमारपट नव्हे तर नेहमीपेक्षा वेगळ्या विषयांवरचे मल्याळम, कन्नड, तेलुगू भाषेतील चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. फहाद फासिलसारखा फारसा परिचित नसलेला चेहरा लोकांना ओळखीचा झाला होता. याची परिणती एकूणच दाक्षिणात्य चित्रपटांची प्रेक्षकसंख्या वाढण्यात झाली.

चित्रपटगृहांमध्येही तीच परिस्थिती…

२०२१ च्या सुरुवातीला करोनाचे प्रमाण कमी झाल्याने दक्षिणेकडील राज्यांत चित्रपटगृहांवरचे निर्बंध कमी करण्यात आले. त्यावेळी चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने कार्यरत नसतानाही प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य अभिनेता विजयच्या ‘मास्टर’ या चित्रपटाने न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची गर्दी अनुभवली. १३५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने २५० कोटींहून अधिक कमाई करत पहिला धक्का दिला. त्यानंतर पुन्हा एकदा करोनामुळे देशभरातील चित्रपटगृहांवर निर्बंध आले. २०२१च्या अखेरीस डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात अभिनेता अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट मूळ तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला. याशिवाय, मल्याळम, तमीळ, कन्नड आणि हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या बहुभाषिक आवृत्तींनी देशभरातून ३६५ कोटींची कमाई केली. तेलुगू भाषेत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून त्याची नोंद झालीच. शिवाय हिंदीतही या चित्रपटाने दोन ते तीन आठवड्यात ६२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. इतका प्रतिसाद त्यावेळी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांनाही मिळाला नाही.

जागतिक बाजारावरही ठसा…

२०२१ ते २०२२ या काळात जगभरातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पाच दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश होता. यापैकी २ तेलुगू, २ तमीळ तर एका कन्नड चित्रपटाचा समावेश आहे. याच दरम्यान तिकीटबारीवर यशस्वी ठरलेल्या हिंदी चित्रपटांचा उल्लेख करायचा झाल्यास ‘सूर्यवंशी’ २९१.८ कोटी,’, ‘भुलभुलैय्या २’ २६३.९ कोटी, ‘द काश्मिर फाईल्स’ ३४४ कोटी आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ २०३.९ कोटी यापलीकडे संख्या जात नाही. त्या तुलनेत अपयशी ठरलेल्या हिंदी चित्रपटांची यादी फार लांबलचक आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांत ‘जर्सी’, ‘जयेशभाई जोरदार’, ‘बच्चन पांडे’, ‘अटॅक’, ‘धाकड’, ‘रनवे ३४’, ‘हिरोपंती २’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ असे मोठ्या बजेटचे, मोठ्या कलाकारांचे चित्रपट तिकीटबारीवर सपशेल अपयशी ठरले आहेत.

हिट दाक्षिणात्य चित्रपटांची कमाई कशी होती?

मास्टर – २५० कोटी

पुष्पा द राईज – ३६९.९ कोटी

आरआरआर – ११३१.१ कोटी

केजीएफ २ – १२२२.३ कोटी

विक्रम – ४००.२ कोटी

हिंदी चित्रपटांहून तिप्पट कमाई

करोनापूर्व काळात म्हणजे २०१९मध्ये देशभरात सर्वाधिक उत्पन्न हे हिंदी चित्रपटांचे होते. त्यावर्षी हिंदी चित्रपटांची वार्षिक उलाढाल ही ५,२०० कोटी रुपये एवढी होती. तर त्याच वेळी दाक्षिणात्य चित्रपटांची वार्षिक उलाढाल ४,००० कोटी रुपये होती. गेल्या दीड वर्षात दाक्षिणात्य चित्रपटांच्या कमाईचा आकडा २४०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर हिंदीत एकापाठोपाठ एक मोठे डझनावारी चित्रपट प्रदर्शित होऊनही हा आकडा कसाबसा ८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या काळात प्रदर्शित झालेल्या हॉलिवूडपटांनीही त्यातल्या त्यात ५०० कोटी रुपये कमाई करत आपली भारतातील स्थिती कायम ठेवली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

ओटीटीचेही दाक्षिणायन

करोनाकाळातील सगळे निर्बंध कमी झाल्यानंतर चित्रपट व्यवसायाची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही वाढली असली तरी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटांचे प्रमाण कमी झालेले नाही. किंबहुना, तिकीटबारीवर चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर मिळणारे यश म्हणजे अधिकाधिक चित्रपटांचे हक्क विकत घेऊन ते ओटीटीवर येणार हे समीकरण दाक्षिणात्य चित्रपटांबाबत निश्चित झाले आहे. दाक्षिणात्य चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर आला किंवा थेट ओटीटीवर प्रदर्शित झाला तरी त्यांना प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो हे गेल्या काही महिन्यातील आयएमडीबीच्या रेटिंग्जवरून दिसून येते आहे. जुलै २०२१ ते जून २०२२ या काळात नेटफ्लिक्सच्या जागितक स्तरावर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप टेन चित्रपटांच्या यादीत १३ दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे. अॅमेझॉन प्राईमच्याही सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटांमध्ये ६ दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे. यात दाक्षिणात्य सुपरस्टार्सच्या चित्रपटांबरोबरच ‘मिन्नल मुरली’, फहाद फासिल या मल्याळम अभिनेत्याचे ‘इरुल’ आणि ‘जोजी’ सारखे चित्रपट, तमीळ अँथॉलॉजीजचाही समावेश आहे. थेट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ चित्रपटालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अधिकाधिक दाक्षिणात्य चित्रपटांचे हक्क विकत घेऊन ते वेगवेगळ्या भाषेत डब करून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा सपाटाच ओटीटी माध्यमांनी लावला आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांच्या डब आवृत्तीला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर सारख्या मोठ्या राज्यांमधून ७५ टक्के प्रेक्षकवर्ग असल्याचे ओटीटी माध्यम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ‘जय भीम’, ‘सारपट्टा परम्बराई’ आणि ‘सोराराई पोट्रु’ हे तीन चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर सर्वाधिक हिट चित्रपट ठरले. तर नेटफ्लिक्सवरची ‘नवरस’ ही तमिळ अँथॉलॉजी भारतासह मलेशिया, श्रीलंकेसारख्या दहा देशांमध्ये सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप टेन चित्रपटांच्या यादीत होती. प्रदर्शित झाल्या झाल्या पहिल्या दिवशी ही अँथॉलॉजी भारताबाहेरील ४० टक्के प्रेक्षकांनी पाहिली. याचाच अर्थ दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग हा फक्त देशापुरता मर्यादित नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या संख्येने हे चित्रपट ओटीटी माध्यमावर पाहिले जातात.

ओटीटी प्रसारण हक्कासाठी मोठी किंमत…

ओटीटीवर १७० देशांमधून दाक्षिणात्य चित्रपट पाहिले जातात आणि या माध्यमावरचे कमीतकमी २० टक्के प्रेक्षक हे देशाबाहेरील असल्याचे आत्तापर्यंतच्या विविध पाहणी अहवालातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे ओटीटी प्रसारणासाठी दाक्षिणात्य चित्रपटांचे हक्क विकत घेण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. ओटीटी प्रसारण हक्कांसाठी या चित्रपटांना मिळणाऱ्या मानधनातही सातत्याने वाढ होते आहे. सध्या एका सर्वसाधारण मल्याळम चित्रपटालाही ओटीटी प्रसारण हक्कांपोटी २० ते ३० कोटी रुपये मोजले जातात. त्या-त्या चित्रपटाची लोकप्रियता, चित्रपटगृहातून मिळालेला प्रतिसाद, चित्रपटातील कलाकार या अनुषंगाने भविष्यात ही किंमत अधिकाधिक वाढत जाणार असल्याची माहितीही विश्लेषक देतात. एकूणच चित्रपटगृहे आणि ओटीटी माध्यमांवरचे हे दक्षिणायन भारतीय चित्रपट व्यवसायाचा चेहरामोहरा बदलणारे ठरले आहे.